केरळजवळ सिंगापूरच्या मालवाहू जहाजाला आग, मदतकार्याला सुरूवात

0

कोचीच्या किनाऱ्यापासून फक्त 42 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) सिंगापूरच्या ध्वजांकित कंटेनर जहाज MV Wan Hai 503 ला आग लागल्याने अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात आपत्कालीन मदत कार्य सुरू आहे.

आंतरराष्ट्रीय सागरी धोकादायक वस्तू (IMDG) कोड अंतर्गत वर्गीकृत 2 हजार 128 मेट्रिक टन धोकादायक माल वाहून नेणाऱ्या या जहाजाला आठवड्याच्या सुरुवातीलाच आग लागली आहे. मालाच्या ज्वलनशील स्वरूपामुळे आणि 10 ते 15 अंशांतून जहाज कलंडल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे. याशिवाय जहाज उलटण्याचा आणि पर्यावरणीय धोका वाढला आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात भारतीय हवाई दलाचा सहभाग

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांमध्ये आता भारतीय तटरक्षक दल आणि नौदलासोबत भारतीय हवाई दल (IAF) देखील सामील झाले आहे. रासायनिक इंधनामुळे भडकलेल्या आगीवर पाण्याचा वापर करून नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरल्यामुळे, गुरुवारी IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरने हवाई उड्डाणे करत 2 हजार 600 किलोपेक्षा जास्त ड्राय केमिकल पावडर (DCP) या आगीवर फवारण्यात आली.

आग आटोक्यात आणण्यासाठी आणि जहाज थंड करण्यासाठी जमीन आणि समुद्रातील युनिट्सना मदत करण्यासाठी आता सलग दोन उड्डाणे केली जात आहेत.

क्रूची सुटका आणि बेपत्ता कर्मचारी

घटनेच्या वेळी जहाजावर असलेल्या 22 क्रू मेंबर्सपैकी 18 जणांना वाचवण्यात आले आहे. तर दोन तैवानी, एक इंडोनेशियन आणि एक म्यानमार नागरिक असे चार खलाशी अजूनही बेपत्ता आहेत. घटनास्थळाभोवती जहाजे आणि विमानांद्वारे शोध मोहीम राबविली जात आहे.

सुटका केलेल्या क्रूमध्ये आठ चिनी नागरिक तसेच तैवान, म्यानमार आणि इंडोनेशियातील इतर नागरिकांचा समावेश आहे. त्यांना लाईफबोट्स वापरून बाहेर काढण्यात आले. याशिवाय भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांनी त्यांना उचलून बाहेर काढले. सध्या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

समन्वित सागरी प्रतिसाद

सोमवारी सकाळी 9.20 ला आगीची पहिली बातमी आली, त्यावेळी जहाज कोलंबोहून महाराष्ट्रातील न्हावा शेवा बंदराकडे प्रवास करत. मात्र कोचीच्या नैऋत्येस सुमारे 130 नॉटिकल मैल अंतरावर जहाज असताना त्याला आग लागली. जहाजावर एक हजारांहून अधिक कंटेनर होते, त्यापैकी बरेच कंटेनर धोकादायक रसायनांनी भरलेले होते.

जवळच्या मालवाहू जहाज एमव्ही व्हॅलेन्सियाकडून अलर्ट मिळाल्यानंतर सागरी बचाव समन्वय केंद्र (एमआरसीसी) मुंबईने तातडीने कारवाई केली. भारतीय तटरक्षक दलाने पाच जहाजे – आयसीजीएस सचेत, अभिनव, समुद्र प्रहारी, राजदूत आणि अर्ण्वेश – तसेच अग्निशमन आणि प्रदूषण नियंत्रण प्रणालींनी सुसज्ज इंटरसेप्टर बोट सी-144 तैनात केली. दोन डोर्नियर पाळत ठेवणारी विमाने आणि तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर हवेत तैनात केली असून, ती या संपूर्ण प्रतिसाद मोहिमेत समन्वय साधत आहेत.

त्याच वेळी, भारतीय नौदलाने आयएनएस सुरत घटनास्थळी रवाना केले. याशिवाय हेलिकॉप्टर समर्थन आणि लॉजिस्टिक्स समन्वयासाठी आयएनएस गरुड तैनात केले.

पर्यावरणीय जोखीम आणि जहाज वाहतुकीत व्यत्यय

इंजिन बंद पडल्याने, एमव्ही वान है 503 हे जहाज समुद्राच्या प्रवाहाच्या प्रभावाखाली वाहून जात आहे, ज्यामुळे संभाव्य टक्कर किंवा रासायनिक गळतीची चिंता निर्माण झाली आहे. अनेक कंटेनर आधीच समुद्रात कोसळले आहेत तर जहाजातून धुराचे लोट उठत आहेत.

धोक्याच्या पार्श्वभूमीवर, जहाज वाहतूक मंत्रालयाने या प्रदेशात कार्यरत असलेल्या सर्व व्यापारी आणि मालवाहू जहाजांचा प्रवास मार्ग बदलला आहे. सिंगापूरमधील अधिकाऱ्यांना तसेच जहाजाच्या चालकांना सतर्क करण्यात आले आहे.

सागरी आपत्ती रोखणे

अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती म्हणजे अलिकडच्या काळातल्या सर्वात गुंतागुंतीच्या सागरी आपत्कालीन परिस्थितींपैकी एक असल्याचे म्हटले आहे. आग, धोकादायक साहित्य, संरचनात्मक अस्थिरता आणि वाहत्या मार्गामुळे भारतात बहु-एजन्सी, बहु-बल प्रतिसाद आवश्यक आहे.

आता जहाज सुरक्षित ठिकाणी ओढून आणणे, त्याचा कल स्थिर करणे आणि सागरी परिसंस्थेत कोणत्याही विषारी गळतीला प्रवेश करण्यापासून रोखणे यावर प्रयत्न केंद्रित आहेत. भारतीय तटरक्षक दल, नौदल आणि आता हवाई दल एकत्रितपणे काम करत असल्याने, अधिकारी सागरी आपत्ती पूर्णपणे टाळली जाईल अशी आशा व्यक्त करत आहेत.

टीम भारतशक्ती


+ posts
Previous articleटागोरांच्या बांगलादेशातील घरात तोडफोड; भारताचा निषेध, कारवाईचे आवाहन
Next articleएअर इंडिया विमान दुर्घटना : देव तारी त्याला कोण मारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here