टागोरांच्या बांगलादेशातील घराची तोडफोड
नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या बांगलादेशातील वडिलोपार्जित घरात अलिकडेच झालेल्या तोडफोडीचा भारताने निषेध केला आहे. हे कृत्य या प्रदेशाच्या सामायिक सांस्कृतिक आणि तात्विक वारशाचा थेट अपमान असल्याचेही भारताने नमूद केले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत, प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी बांगलादेशच्या सिराजगंज जिल्ह्यात 8 जून रोजी घडलेल्या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली. रवींद्र कचरीबारी म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण टागोरांच्या जीवनाशी आणि कार्याशी जवळून जोडलेले एक ऐतिहासिक निवासस्थान आहे.
“आम्ही परिसरावरील हल्ला आणि तोडफोडीचा तीव्र निषेध करतो, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या चिरंतन वारशावर झालेला हा हल्ला आहे,” असे जयस्वाल म्हणाले. “असा हिंसाचार म्हणजे त्यांनी मांडलेल्या समावेशक तत्वज्ञानाचा तसेण भारत आणि बांगलादेश दोघांनाही जपणाऱ्या समन्वित सांस्कृतिक रचनेचा अपमान आहे.”
ही घटना म्हणजे अतिरेकी घटकांकडून या प्रदेशातील सहिष्णुता आणि सांस्कृतिक सौहार्दाचे प्रतीक खराब करण्याच्या प्रयत्नांच्या “विस्तृत स्वरूपाचा” भाग असल्याचे जयस्वाल म्हणाले. त्यांनी बांगलादेशी अधिकाऱ्यांना या प्रकरणी ठोस कारवाई करण्याचे आवाहन केले.
“आम्हाला अपेक्षा आहे की बांगलादेश सरकार गुन्हेगारांवर त्वरित आणि कठोर कारवाई करेल. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पावले उचलावीत,” असेही जयस्वाल पुढे म्हणाले. भारताचे अधिकारी ढाका येथील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे याची त्यांनी पुष्टी केली.
टागोरांच्या घराची तोडफोड कशामुळे झाली?
पार्किंग शुल्काच्या वादावरून एका पर्यटक आणि संग्रहालय कर्मचाऱ्यामध्ये झालेल्या संघर्षानंतर टागोरांच्या बांगलादेशातील घराची तोडफोड करण्यात आली. स्थानिक माध्यमांनी वृत्त दिले की संग्रहालय कर्मचाऱ्यांनी या पर्यटकाला ताब्यात घेऊन मारहाण केली. नंतर, जमावाने परिसरात हल्ला केला, संग्रहालयाच्या काही भागांचे, त्याच्या सभागृहाचे नुकसान केले. याशिवाय एका अधिकाऱ्यावर देखील हल्ला चढवला.
ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य असलेले हे ठिकाण आता जनतेसाठी बंद करण्यात आले आहे. बांगलादेशी पुरातत्व विभागाने एक चौकशी समिती स्थापन केली आहे जी कामकाजाच्या पाच दिवसांत अहवाल सादर करणार आहे.
शहजादपूरमध्ये असणारे, कचरीबारी हे टागोर कुटुंबाचे निवासस्थान आणि प्रशासकीय कार्यालय म्हणून कार्यरत होते.
1913 मध्ये पहिले आशियाई नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी या वास्तूमध्ये बराच काळ घालवला होता. इथेच त्यांनी अनेक प्रसिद्ध साहित्यिक आणि संगीतमय साहित्यकृतींची निर्मिती केली.
भारत-बांगलादेश संबंधांना आधार देणारा सामायिक वारसा आणि परस्पर आदर जपण्यासाठी अशा स्थळांचे संरक्षण करणे आवश्यक आहे यावर भारताने भर दिला आहे.
हुमा सिद्दीकी