2022 मध्ये न्यूयॉर्क आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान लेखक सलमान रश्दी यांच्यावर चाकूचे वार करत अंशतः अंधत्व आणणाऱ्या हल्लेखोराला शुक्रवारी 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे सरकारी वकिलांनी जाहीर केले. या हल्ल्यात मंचावरील आणखी एक व्यक्तीही जखमी झाली होती.
77 वर्षीय रश्दी यांना 1988 मध्ये ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या त्यांच्या कादंबरीच्या प्रकाशनापासून जीवे मारण्याच्या धमक्यांना सामोरे जावे लागले आहे. इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी ईश्वरनिंदा म्हणून या पुस्तकाचा निषेध केला होता. आणि रश्दी यांना मारण्याचा ‘फतवा’ जारी केला होता.
फेअरव्यू, न्यू जर्सी येथील अमेरिकन नागरिक असलेल्या 27 वर्षीय हादी मतार याला फेब्रुवारीमध्ये न्यूयॉर्कच्या मेव्हिल येथील चौटॉक्वा काउंटी कोर्टात रश्दींवर हल्ला केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्याला जास्तीत जास्त 25 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
लेखकांना कोणत्याही धोक्यापासून सुरक्षित ठेवणे या विषयावरील भाषणासाठी रश्दींची प्रेक्षकांना ओळख करून दिली जात असताना झालेला हा हल्ला व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झाला. त्यात मतार चौटौक्वा संस्थेच्या मंचावर धावताना दिसत आहे. सात दिवसांच्या सत्रादरम्यान या व्हिडिओतील काही भाग ज्युरीला दाखवण्यात आला.
‘मोठा धक्का’
“त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यांनी जे अनुभवले त्याबद्दल त्यांना रात्री स्वप्ने पडतात,” असे चौटौक्वा काउंटीचे जिल्हा वकील जेसन श्मिट यांनी रश्दी यांना काय काय सहन करावे लागले याचा संदर्भ देत शिक्षा सुनावल्यानंतर सांगितले.
“निःसंशयपणे हा त्या व्यक्तीसाठी एक मोठा धक्का आहे जी फतव्यानंतर अनेक वर्षे लपून राहिल्यानंतर त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात समाजात परत मिसळायला लागली होती.”
निर्वासित लेखकांना मदत करणाऱ्या पिट्सबर्गच्या सिटी ऑफ एसायलम या ना-नफा संस्थेचे सह-संस्थापक हेन्री रीस हे देखील या हल्ल्यात जखमी झाले. त्या दिवशी सकाळी ते रश्दी यांच्याशी चर्चा करत होते.
श्मिट म्हणाले की, रश्दींवरील हल्ल्यामुळे सेकंड-डिग्री हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली मतारला 25 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि रीस यांच्यावरील सेकंड-डिग्री चाकूहल्ल्यासाठी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. या दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत कारण घटना एकाच वेळी एकाच ठिकाणी घडली होती.
अनेक जखमा
भारतातील एका मुस्लिम काश्मिरी कुटुंबात जन्मलेल्या रश्दी या नास्तिक लेखकाच्या डोक्यात, मानेवर, धडावर आणि डाव्या हातावर अनेक वेळा चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यानंतर त्यांचा उजवा डोळा निकामी झाला तर त्यांचे यकृत आणि आतडे खराब झाले होते, त्यामुळे त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. नंतर अनेक महिने त्यांना बरे होण्यासाठी लागले.
मतारने त्याच्या खटल्यात साक्ष दिली नाही. त्याच्या बचाव पक्षाच्या वकिलांनी ज्युरींना सांगितले की, खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपासाठी आवश्यक असलेल्या खुनाच्या गुन्हेगारी हेतूची खात्री करण्यामध्ये सरकारी वकिल निःसंशयपणे अपयशी ठरले असून त्याच्यावर केवळ हल्ल्याचा आरोप असायला हवा होता, असा युक्तिवाद केला.
मतार याचिका दाखल करणार
मतारचे वकील नॅथेनिएल बारोन यांनी सांगितले की त्यांचा अशील अपील दाखल करणार आहे. “मला माहित आहे की जर त्याला संधी मिळाली असती तर तो आज जिथे बसला आहे तिथे बसला नसता. आणि जर तो गोष्टी बदलू शकला, तर तो नक्की बदलेल,” असे बॅरोन म्हणाले.
रश्दी यांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा म्हणजे दहशतवादी कृत्यच आहे असा आरोप करत, पश्चिम न्यूयॉर्कमधील अमेरिकी वकिलांच्या कार्यालयात सरकारी वकिलांनी आणलेल्या फेडरल आरोपांनाही मतारला सामोरे जावे लागत आहे. अमेरिकेने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेल्या लेबनॉनच्या अतिरेकी हिजबुल्ला गटाला भौतिक पाठबळ पुरवल्याचा आरोप सरकारी वकिलांनी त्याच्यावर केला आहे.
बफेलोमध्ये वेगळ्या खटल्याअंतर्गत मतारला या आरोपांनाही सामोरे जावे लागणार आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्सह)