गाझामध्ये एका आठवड्यात युद्धबंदी शक्य – ट्रम्प

0

इस्रायल आणि इराण समर्थित हमास दहशतवाद्यांमध्ये सुरू असणाऱ्या गाझा संघर्षात एका आठवड्याच्या आत युद्धबंदी होण्याची शक्यता असल्याचे संकेत शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले.

कांगो-रवांडा करार साजरा करणाऱ्या एका कार्यक्रमात ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले त्यांच्या मते  युद्धबंदी जवळ आली आहे. त्यांनी सांगितले की ते पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये इस्रायल आणि हमास यांच्यातील शत्रुत्व संपवण्याच्या प्रयत्नात सहभागी असलेल्या काही लोकांशी चर्चा करत आहेत.

हमासने म्हटले आहे की ते युद्ध संपवण्यासाठी कोणत्याही करारानुसार गाझामधील उर्वरित ओलिसांची सुटका करण्यास तयार आहेत, तर इस्रायलचे म्हणणे आहे की जर हमास पूर्णपणे नि:शस्त्र झाले आणि विघटित केले तरच ते हे युद्ध संपवू शकतात. हमासने शस्त्रे खाली ठेवण्यास नकार दिला आहे.

इस्रायली आकडेवारीनुसार, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या नेतृत्वाखालील दहशतवाद्यांनी इस्रायलवर हल्ला केला तेव्हा गाझामधील युद्ध सुरू झाले, ज्यामध्ये बाराशे लोक मारले गेले तर 251 जणांना ओलिस ठेवण्यात आले.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की 7 ऑक्टोबरनंतर इस्रायलने केलेल्या लष्करी हल्ल्यात 56 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामुळे उपासमारीचे संकट निर्माण झाले असून, गाझाची संपूर्ण नागरी वस्ती अंतर्गतरित्या विस्थापित झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नरसंहाराचे आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात युद्ध गुन्ह्यांचे आरोप लावले आहेत. इस्रायलने अर्थातच हे आरोप नाकारले आहेत.

अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या आण्विक सुविधांवर केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गाझा संघर्ष सोडवण्यातील रस वाढला आहे. 12 दिवसांच्या इस्रायल-इराण संघर्षात या आठवड्याच्या सुरुवातीला युद्धबंदी लागू झाली आहे.

“मला वाटते की ते जवळ आले आहे. मी नुकतेच काही सहभागी लोकांशी बोललो,” ट्रम्प म्हणाले. “आम्हाला वाटते की पुढील आठवड्यात आपण युद्धबंदी करणार आहोत.”

त्यांची कोणाशी चर्चा सुरू आहे हे मात्र सांगितले नाही. पण आपण इस्रायल-इराण संघर्षादरम्यान इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी जवळजवळ दररोज संपर्कात होतो हे मात्र त्यांनी पत्रकारांना सांगितले.

येत्या काही दिवसांत युद्धबंदी करार होईल ही ट्रम्प यांची आश्चर्यकारक भविष्यवाणी अशा वेळी आली जेव्हा युद्धग्रस्त पक्ष गंभीर वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यास किंवा त्यांच्या मजबूत भूमिकेतून मागे हटण्यास तयार असल्याचे कोणतेही संकेत नव्हते.

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की ट्रम्प यांच्या टिप्पण्यांव्यतिरिक्त त्यांच्याकडे सामायिक करण्यासाठी कोणतीही माहिती नाही.

ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये पदभार स्वीकारण्यापूर्वी विटकॉफ यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सहाय्यकांना युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेचा करार करण्यास मदत केली होती परंतु लवकरच हा करार गुंडाळला गेला.

या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका सूत्रानुसार, इस्रायलचे धोरणात्मक व्यवहार मंत्री रॉन डर्मर सोमवारपासून वॉशिंग्टनला भेट देण्याची योजना आखत आहेत जेणेकरून ते गाझा, इराण आणि नेतान्याहू यांच्या संभाव्य व्हाईट हाऊस भेटीबद्दल ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू शकतील, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्राने सांगितले.

गुरुवारी नेतान्याहू म्हणाले की इस्रायलच्या इराणशी झालेल्या युद्धाच्या निकालामुळे शांततेच्या संधी निर्माण झाल्या आहेत ज्या आमच्या देशाने वाया घालवू नयेत.

“हा विजय शांतता करारांच्या नाट्यमय विस्ताराच्या संधीसाठी महत्त्वपूर्ण असून आम्ही यावर उत्साहाने काम करत आहोत,” असे नेतान्याहू यांनी एका निवेदनात म्हटले आहे. इराणकडून मिळणारी मदत बंद करण्यात आली आहे, इराणचा पाडाव झाला आहे, त्यामुळे सध्या हमासकडे कोणतेही पर्याय नाहीत.

टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 


+ posts
Previous articleIndia and France Bolster Military Ties through Joint Exercise SHAKTI-VIII
Next articleभारत आणि फ्रान्स यांच्यात SHAKTI-VIII संयुक्त सराव संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here