चिनी माध्यमांची माहिती: सेनकाकू बेटांच्या परिसरात प्रत्यक्ष शस्त्रांसह सराव
दि. ०७ जून: पूर्व चीन समुद्रातील जपानच्या ताब्यात असलेल्या सेनकाकू बेटांच्या किनाऱ्यालगत चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या स्पीड बोटी आणि तटरक्षकदलाच्या नौकांनी युद्धसराव केला. या सरावादरम्यान प्रत्यक्ष शस्त्रांचाही वापर करण्यात आला, अशी माहिती चिनी साम्यवादी पक्षाच्या सरकारी वृत्तवाहिनीने शुक्रवारी दिले आहे.
पूर्व चीन समुद्रात असलेल्या सेनकाकू बेटांवरून जपान आणि चीनदरम्यान जुनाच वाद आहे. ही बेटे जपानच्या इशिगाकी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येतात, असे जपानचे म्हणणे असले, तरी चीनकडून या बेटांना दिओयू असे नाव देण्यात आले आहे. या बेटांच्या मालकीवरून उभय देशांत सातत्याने विवाद सुरु असतो. या भागातील देशांना आपल्या लष्करी ताकदीच्या दबावाखाली ठेवण्याचा चीनकडून प्रयत्न करण्यात येत असतो. त्याचाच एक भाग म्हणून चिनी लष्कर आणि तटरक्षदलाकडून हा सराव करण्यात आला असल्याचे मत व्यक्त होत आहे. ‘राष्ट्रीय हिताची जपणूक करण्याच्या उद्देशाने चीनकडून आपल्या क्षेत्रीय समुद्रात युद्धसराव करण्यात आला,’ असे चिनी तटरक्षकदलाच्या पत्रकात म्हटले आहे, असे वृत्त या वाहिनीने दिले आहे.
चीनकडून या बेटांच्या परिसरात २०२२पासून युद्धसराव करण्यात येत आहे. चीनकडून २०२२मध्ये १५ वेळा या भागात युद्धसराव करण्यात आला होता. यंदा १५८ दिवस या भागात चीनकडून सराव करण्यात आला. चीनच्या नौदलाने मात्र जपानकडून करण्यात आलेल्या आरोपांचा इन्कार केला आहे. आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियमानुसारच हा सराव करण्यात आला, असे चिनी नौदलाने म्हटले आहे. चीनबरोबरच तैवानकडूनही सेनकाकू बेटांवर दावा सांगितला जातो. सुमारे आठ बेटांचा समूह असलेल्या सेनकाकू बेटांवर १९४०पसुन मानवी वस्ती नाही. या बेटांच्या मालकीवरून असलेला वाद १९६८ पासून विकोपाला गेला आहे. या बेटांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असल्याचा अहवाल संयुक्त राष्ट्राकडून आल्यानंतर या बेटांच्या मालकीवरून चीन आणि जपानमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. पंधराव्या शतकात हा भाग चिनी रयुक्यू साम्राज्याचा भाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात येतो. त्यासाठी त्यांच्याकडून ऐतिहासिक दाखले देण्यात येतात. चीन आणि जपान यांच्यात २०१२ मध्ये या बेटांवरून वाद विकोपला गेल्यानंतर या बेटाच्या भोवताली असलेल्या बेटांची खरेदी जपान सरकारने खासगी मालकांकडून केली होती. त्यामुळे चीनमध्ये जपानविरोधात मोठी निदर्शने झाली होती.
तर विवादित जागेवर जाण्यासाठी फिलिपिन्सला परवानगी
दक्षिण चीन समुद्रात असलेल्या सेकंड थॉमस शोलवर रसद पुरवठा करण्याची पूर्वसूचना दिल्यास फिलिपिन्सला तेथे जाण्याची परवानगी देण्यात येईल, असे चीनकडून शुक्रवारी सांगण्यात आले. मात्र, चीनकडून देण्यात आलेली हे सवलत तेथे कायमस्वरूपी बांधकाम करण्याची परवानगी आहे, असा समज फिलिपिन्सने करून घेऊ नये, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनी म्हटले आहे.
विनय चाटी
(रॉयटर्सच्या ‘इनपुट्स’सह)