480 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांसह पाकिस्तानी बोट हस्तगत

0
Coast Guard

गुजरातच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रात नाट्यमय पाठलाग करून भारतीय तटरक्षक दलाने (ICG) सुमारे 480 कोटी रुपयांचे अमली पदार्थ वाहून नेणारी पाकिस्तानी मासेमारी बोट पकडली.

11 – 12 मार्च रोजी रात्रभर चाललेले हे ऑपरेशन भारतीय अधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण विजय मानला जात आहे. ICG, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) गेल्या तीन वर्षांत केलेली ही दहावी यशस्वी संयुक्त कारवाई आहे. आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थांचे एकत्रित मूल्य तब्बल 3,135 कोटी रुपये आहे.

गुप्तचर यंत्रणेकडून आलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, कोस्ट गार्डने आपली जहाजे आणि डॉर्नियर विमाने अरबी समुद्रात सखोल शोधासाठी तैनात केली आहेत. पाकिस्तानी नौकांकडून भारतीय जल सीमेत अंमली पदार्थांची तस्करी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे ही वाढीव दक्षता घेण्यात आली आहे.

अंधाराचा फायदा घेत ICG जहाजे अरबी समुद्रात गस्त घालत होती, त्यांचे रडार सगळ्या संशयास्पद हालचाली स्कॅन करत होते. डॉर्नियर विमाने डोक्यावरून सतत घिरट्या होती. शक्तिशाली सर्चलाइट्सच्या मदतीने पाण्यात शोध घेणं सुरू होतं. या सगळ्या प्रक्रियेत त्यांच्या रडार स्क्रीनवर एक ब्लीप दिसला जो एक जहाज अनियमितपणे हालचाल करत असल्याचा निर्देश होता. ICGची जहाजे आपल्या लक्ष्याकडे वळली आणि रात्रभर हे पाठलाग सत्र सुरू राहिले.

अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या पाकिस्तानी जहाजाला आपला पाठलाग केला जात असल्याचे लक्षात येताच, त्यांनी भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत भारतीय सीमेतून माघार घेतली. मात्र आयसीजीच्या जहाजांनी अविरतपणे हा तणावपूर्ण पाठलाग सुरूच ठेवला. पाकिस्तानी जहाजाने उसळणाऱ्या लाटांचा फायदा घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, परंतु तटरक्षक दलाकडे असणारी उत्कृष्ट लक्ष्यभेदी यंत्रणा आणि उत्तम नेतृत्व गुण यामुळे शेवटी पाकिस्तानी जहाजाचे सगळे मार्ग रोखून धरले.

आता सुटकेचा कोणताही मार्ग नाही हे लक्षात आल्यावर पाकिस्तानी बोटीने शेवटी हार पत्करली. आयसीजी, एनसीबी आणि एटीएसचे संयुक्त पथक जहाज आणि त्यावरील सहा क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानी जहाजावर उतरले. संपूर्ण जहाजाची बारकाईने तपासणी केल्यानंतर सुमारे 80 किलो अंमली पदार्थांचा साठा लपविलेला आढळून आला ज्याचे बाजार मूल्य अंदाजे 480 कोटी रुपये आहे.
जप्त केलेली बोट आणि अटक केलेले कर्मचारी पुढील तपास तसेच कायदेशीर कारवाईसाठी पोरबंदर येथे आणले जात आहेत. अंमली पदार्थांची तस्करी रोखणे आणि सागरी सुरक्षा कायम राखण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांच्या सुरू असणाऱ्या प्रयत्नांना मिळालेले यश म्हणून या घटनेकडे बघता येईल. 2022 मध्ये, भारतीय नौदलाने भारत-पाक सागरी सीमेजवळ अडवलेल्या एका पाकिस्तानी नौकेवर मोठ्या प्रमाणात हेरॉईन सापडले होते. त्यानंतर इतर अशा अनेक घटनांमुळे भारतीय अधिकाऱ्यांना पश्चिमेकडील सागरी सीमेवर अधिक सतर्कता वाढवण्यास प्रवृत्त केले.

रामानंद सेनगुप्ता


Spread the love
Previous articleसोशल मीडियाच्या दिग्गजांवर ट्रम्प यांची टीका; मेटा शेअर्सचे भाव घसरले
Next articleBharat Shakti Exercise Strengthens India’s Standing As Premier Weapon Manufacturer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here