🚨 A convoy carrying Russia’s Ambassador to Pakistan hit a landmine. While diplomats from Russia, Bosnia, Vietnam, and others were unharmed, four police officers escorting them were injured in the IED blast and hospitalized. An investigation is ongoing. pic.twitter.com/Qlb8ifoGts
— BigBreakingWire (@BigBreakingWire) September 22, 2024
पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा ताफा मलाम जब्बा नावाच्या हिल स्टेशन आणि स्की रिसॉर्टकडे जात असताना बॉम्बस्फोट झाला.
भेट देणारे जवळपास डझनभर राजदूत सुरक्षित असून ते इस्लामाबादला परत जायला निघाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिस उप महानिरीक्षक मोहम्मद अली गंडापूर यांनी रॉयटर्सला सांगितले की, हल्ल्यात कोणत्याही राजदूताला इजा झाली नसून ते सर्वजण सुरक्षित आहेत. सध्या इस्लामाबादला रवाना होण्यापूर्वी त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.
हल्ला झाला त्यावेळी कोणकोणत्या देशांचे राजदूत गाडीत होते ते लगेच स्पष्ट झाले नाही. मात्र एपीच्या एका वृत्तानुसार ताफ्यात इंडोनेशिया, पोर्तुगाल, कझाकस्तान, बोस्निया आणि हर्झगोव्हिना, झिम्बाब्वे, रवांडा, तुर्कमेनिस्तान, व्हिएतनाम, इराण, रशिया आणि ताजिकिस्तानचे राजदूत होते. ते सर्व सुरक्षित असून सुरक्षा दलांनी घटनास्थळाचा ताबा घेतला आहे, असे पोलीस अधिकारी जावेद खान यांनी सांगितले.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने राजदूतांचे राष्ट्रीयत्व न देता प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राजदूत सुरक्षितपणे इस्लामाबादला परतले आहेत. अशा प्रकारच्या कृती पाकिस्तानला दहशतवादाविरोधातील लढ्याच्या वचनबद्धतेपासून रोखू शकणार नाहीत, असेही त्यात म्हटले आहे.
बऱ्याच काळापासून इस्लामी दहशतवादी बंडखोरीचे केंद्र असलेल्या स्वात खोऱ्यात पाकिस्तानी दहशतवादविरोधी दलांची भक्कम उपस्थिती आहे. सरकारशी शस्त्रसंधी तोडल्यानंतर 2022 च्या उत्तरार्धापासून दहशतवाद्यांनी त्यांचे हल्ले वाढवले आहेत.
नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाईवर 2012 मध्ये, इस्लामी अतिरेक्यांनी याच खोऱ्यात गोळ्या झाडून तिला जखमी केले होते.
रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सैनिक आणि पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम सुरू केली आहे. याशिवाय त्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले.
रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)