इंडो-पॅसिफिक डिप्लोमसीतील एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर, भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान व संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स, यांच्यात आज नवी दिल्ली येथे व्यापक चर्चा पार पडली. या बैठकीत दोन्ही देशांनी धोरणात्मक आणि संरक्षण सहकार्य बळकट करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी केली.
ही महत्वपूर्ण बैठक, भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पाचव्या वर्धापन दिनी झाली असून, अलीकडील ऑपरेशन सिंदूर व जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ला यासारख्या घडामोडींनंतर झाली आहे. या पार्श्वभूमीवर, उच्चस्तरीय संवादाने दोन्ही इंडो-पॅसिफिक लोकशाही देशांमधील नव्या एकात्मतेचे संकेत दिले.
दहशतवादाविरुद्ध एकसंघ लढा
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही कालावधीतच ही चर्चा पार पडली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, यांनी या क्रूर घटनेचा तीव्र निषेध करताना, ऑस्ट्रेलियाने भारताला दाखवलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानले.
“काश्मीरमधील या अमानवी हल्ल्यानंतर आम्ही आवश्यक ती पावले उचलली आहेत. या मुद्द्यावर भारतासोबत ठामपणे उभे राहिल्याबद्दल मी ऑस्ट्रेलियाचे आभार मानतो,” असे सिंह म्हणाले.
“आपले द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक पुढे गेले आहे, हे पाहून समाधान वाटते. ही चर्चा आगामी सखोल सहकार्याची पायाभरणी ठरेल,” असेही ते म्हणाले.
रिचर्ड मार्ल्स यांनी, पहलगाम हल्ल्यातील पीडितांबद्दल शोक व्यक्त करत म्हटले की, “हल्ल्यातील पीडितांप्रती आमच्या भावना आणि प्रार्थना आहेत. ऑस्ट्रेलिया भारतासोबत आणि दहशतवादाविरोधात लढणाऱ्या सर्व देशांसोबत उभा आहे. या घटनेनंतर भारताने दाखवलेला संयम हे परिपक्व नेतृत्वाचे उदाहरण आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आमच्या दृष्टीने भारतासोबत याआधी आमचा धोरणात्मक संबंध इतका दृढ कधीच नव्हता.”
धोरणात्मक आणि संरक्षण सहकार्याचा विस्तार
मंत्र्यांनी मागील भारत-ऑस्ट्रेलिया 2+2 मंत्रीस्तरीय संवादातील प्रगतीचा आढावा घेतला आणि पुढील सहकार्याचा मार्ग आखला. चर्चेतील प्रमुख मुद्दे:
- सागरी सुरक्षा: महत्त्वाच्या समुद्री मार्गांचे रक्षण व हिंद व पॅसिफिक महासागरात स्थिरता राखणे.
- सायबर व नवोदित तंत्रज्ञान: सायबरसुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर नव्याने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवणे.
- संरक्षण उद्योग व संशोधन: ऑस्ट्रेलिया-भारत संयुक्त संशोधन प्रकल्पाचे उद्घाटन, व औद्योगिक सहकार्य वाढवण्याचा संकल्प.
- हायड्रोग्राफी: नौदल मॅपिंग, डेटा सामायिकरण आणि सागरी डोमेन जागरुकतेत वाढीव सहकार्य.
- दहशतवादविरोधी उपाय: दहशतवादाच्या सर्व स्वरूपांशी लढा देण्यासाठी सामायिक वचनबद्धता आणि संयुक्त क्षमता वृद्धी.
सांकेतिक आणि सांस्कृतिक डिप्लोमसी
मार्ल्स यांनी, राष्ट्रीय युद्धस्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून भारताच्या शहीद जवानांना मानवंदना दिली, ज्याला संरक्षण मंत्रालयाने “सामायिक बलिदान आणि वाढते परस्पर आदराचे प्रतीक” असे संबोधले.
याशिवाय, मार्ल्स यांनी दिल्लीच्या स्थानिक संस्कृतीशी संवाद साधत नेहरू पार्कमध्ये धावण्याने आपला दौरा सुरू केला आणि नंतर परिसरातील बाजारात चहा घेतला.
बैठकीपूर्वी मार्ल्स यांनी, “भारतातील पहिली भेट, स्थानिक बाजाराचा फेरफटका आणि चहा..,” अशी X (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत, सांस्कृतिक संबंधांची जाणीव करुन देणारा एक उबदार संदेश दिला.
इंडो-पॅसिफिक दृष्टीकोन
दोन्ही देशांच्या मंत्र्यांनी मुक्त, खुल्या आणि नियमाधारित इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी सामायिक दृष्टिकोन पुन्हा अधोरेखित केला. त्यांनी संरक्षण, तंत्रज्ञान आणि सागरी सहकार्य क्षेत्रांमध्ये अधिक सखोल भागीदारीचा संकल्प केला, जेणेकरून प्रादेशिक शांतता, स्थिरता आणि समृद्धी सुनिश्चित होईल.
आजच्या संवादाने बदलत्या जागतिक सुरक्षाव्यवस्थेत भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांना अधिक भक्कम केले आहे आणि हे भागीदारी क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचे रक्षणात्मक संबंध ठरले आहे.
– टीम भारतशक्ती