गेल्या आठवड्यात झालेल्या तीव्र लष्करी संघर्षानंतर तणाव कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारत आणि पाकिस्तानने सीमेपलीकडून सर्व लष्करी कारवाईवरील तात्पुरता विराम वाढवण्यावर औपचारिक सहमती दर्शविली आहे.
दोन्ही देशांच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यात 10 मे रोजी झालेल्या संवादानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या प्रत्युत्तराला तोंड देताना पाकिस्तानच्या नाकी नऊ आले. त्यामुळे त्यांनी हा सगळा प्रकार थांबावा यासाठी भारताबरोबर संपर्क साधायला सुरू केला आणि अनेक दिवसांच्या तीव्र शत्रुत्वानंतर तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला.
“10 मे 2025 रोजी दोन्ही डीजीएमओंमध्ये झालेल्या सामंजस्य करारानंतर, सतर्कतेची पातळी कमी करण्यासाठी परस्परांबाबत विश्वास निर्माण करणारे उपाय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले. “परिस्थिती जसजशी अधिक विकसित होईल तसतसे आम्ही तुम्हाला कळवू.”
दुसरीकडे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी गुरुवारी संसदेत सांगितले की, लष्कराने रविवार, 18 मेपर्यंत संघर्ष विराम वाढवण्यास सहमती दर्शविली आहे. “बुधवार आणि गुरुवारी लष्कर-ते-लष्कर संवाद झाले,” ते म्हणाले. “आज आमची चर्चा झाली आणि आता 18 मे पर्यंत संघर्ष विराम सुरू रहाणार आहे.”
घटनाक्रम
सुरुवातीचा विराम 10 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता लागू झाला, त्यानंतर लगेचच पाकिस्तानच्या डीजीएमओने दुपारी 3.30 वाजता त्यांच्या भारतीय समकक्षांशी संपर्क साधला आणि जमीन, हवाई आणि समुद्रातील सर्व लष्करी हालचाली थांबवण्याचा प्रस्ताव दिला. भारत सरकारने त्याच दिवशी नंतर कराराला मान्यता दिली. थेट लष्करी पातळीवरील चर्चेनंतर हा “परस्पर निर्णय” असल्याचे वर्णन केले.
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी त्या दिवशी पत्रकार परिषदेत घोषणा केली: “हा विराम अंमलात आणण्यासाठी दोन्ही बाजूंना सूचना देण्यात आल्या आहेत. लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक 12 मे रोजी पुन्हा चर्चा करतील.”
त्या पुढील चर्चेमुळे आता विराम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जो स्थिर तणावपूर्ण आणि नाजूक शांततेत सावध आशावाद दर्शवितो.
तणावात वाढ आणि ऑपरेशन सिंदूर
6 मे रोजी रात्री भारताने सीमेपलीकडील दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर आक्रमकतेत नाट्यमय वाढ झाली. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली होती. या हल्ल्यात 26 नागरिक मारले गेले, ज्यापैकी बहुतेक पर्यटक म्हणून तिथे आले होते. लष्कर-ए-तैयबाशी (LeT) संबंधित असल्याचे मानले जाणारे रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.
अधिकाऱ्यांच्या मते, ऑपरेशन सिंदूरमध्ये सुमारे 100 दहशतवादी आणि सुमारे 40 पाकिस्तानी सैनिक ठार झाले, परंतु सीमेपलीकडून जोरदार प्रत्युत्तरात्मक गोळीबारही झाला. या वाढत्या संघर्षात तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला, ड्रोनचे हल्ले दिसले आणि दोन्ही बाजूंनी air patrol alerts दिले गेले होते.
अर्थात संघर्षविराम हा द्विपक्षीय निर्णय असला, तरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या यशाचे श्रेय घेतले आणि सोशल मीडियावर म्हटले की अमेरिकन मध्यस्थीने दोन्ही बाजूंना चर्चेच्या टेबलावर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मध्यस्थाची भूमिका बजावल्याचा ट्रम्प यांचा दावा
भारतीय आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी संघर्षविराम हा द्विपक्षीय निर्णय असल्याचे म्हटले असले तरी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करारात मध्यस्थी केल्याचे श्रेय घेतले.
“अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रभरातील दीर्घ चर्चेनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ संघर्षविरामावर सहमती दर्शविली आहे,” असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट केले.
भारताने या दाव्याचा पूर्णतः इन्कार केला आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले: “भारत आणि पाकिस्तानने गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक समझोता केला आहे. भारताने दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे – आणि ती पुढेही ठेवेल.”
राजनैतिक सूत्रांनी सांगितले की अमेरिकेने इस्लामाबादवर अप्रत्यक्षपणे दबाव आणला असावा, असे वृत्त आहे. त्यामुळेच पाकिस्तानने संघर्षविरामाच्या अटी स्वीकारल्या आहेत.
दृष्टीकोन
संघर्षविराम वाढवणे हे संयमाचे स्वागतार्ह लक्षण असले तरी, विश्लेषकांनी इशारा दिला आहे की परिस्थिती अस्थिर राहते. “ही परिस्थिती तोडगा निघावा असे संकेत देत नाही,” असे एका संरक्षण विश्लेषकाने म्हटले आहे. “पण हे सूचित करते की दोन्ही बाजू किमान सध्या तरी, आणखी वाढ रोखण्यासाठी तयार आहेत.”
टीम भारतशक्ती