संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल 11 मे, 2025 रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे ब्रह्मोस एकात्मिकीकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली केवळ 40 महिन्यांच्या आत प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
“ब्रह्मोस म्हणजे केवळ जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक नाही, तर ते भारतीय सशस्त्र दलांच्या सामर्थ्याचा संदेश आहे, तो शत्रूंना रोखणारा संदेश आहे तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करण्याच्या अतूट वचनबद्धतेचा संदेश आहे,” असे संरक्षणमंत्री म्हणाले.
लखनौमधील ब्रह्मोस एकात्मिकरण आणि चाचणी सुविधा केंद्र एकूण 200 एकर क्षेत्रात विस्तारले आहे. उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत (UP DIC) संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादन समूहांच्या वाढीस गती देण्यासाठी याची स्थापना करण्यात आली आहे, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
ही सुविधा उत्तर प्रदेश संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आत्मनिर्भर संरक्षण उत्पादनासाठी भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिनिधित्व करते.
यात केवळ क्षेपणास्त्र निर्मितीच नाही तर चाचणी, एकत्रीकरण आणि एरोस्पेस-ग्रेड घटकांसाठी सामग्री संकुल देखील समाविष्ट आहे.
भारत-पाकिस्तान संघर्षविराम
भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी जमीन, हवाई आणि समुद्रातील सर्व प्रकारच्या संघर्षविरामावर तात्काळ सहमती झाल्यानंतर इस्लामाबादसोबत लष्करी तणाव असताना या सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे.
22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर चार दिवसांच्या तीव्र लष्करी चकमकीनंतर भारत आणि पाकिस्तानने शनिवारी संध्याकाळी 5 वाजता संघर्षविरामावर सहमती दर्शविली.
उल्लंघन
मात्र करार झाल्यानंतर काही तासांतच, पाकिस्तानने रात्री उशिरा नियंत्रण रेषेवर अनेक ठिकाणी कराराचे उल्लंघन केले.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शनिवारी रात्री उशिरा सांगितले की युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने कराराचे उल्लंघन केले, ज्यामुळे भारताने इस्लामाबादला जबाबदारीने वागण्याची आणि उल्लंघनांवर लगाम लावण्याची मागणी केली.
“गेल्या काही तासांत, भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्सच्या महासंचालकांमध्ये आज संध्याकाळी झालेल्या सामंजस्य कराराचे वारंवार उल्लंघन झाले आहे,” असे मिस्री यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
भारत सरकारने हे स्पष्ट केले आहे की भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दहशतवादी कृत्याला युद्ध म्हणून मानले जाईल.
“आम्ही पाकिस्तानला या उल्लंघनांवर कारवाई करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आणि परिस्थितीला गांभीर्याने तसेच जबाबदारीने सामोरे जाण्याचे आवाहन करतो,” असे मिस्री म्हणाले.
“सशस्त्र दले परिस्थितीवर कडक नजर ठेवून आहेत,” असे सांगून ते म्हणाले की,” आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच नियंत्रण रेषेवर सीमेच्या उल्लंघनाची पुनरावृत्ती होण्याच्या कोणत्याही घटनांना कठोरपणे सामोरे जाण्याच्या सूचना भारतीय सशस्त्र दलांना देण्यात आल्या आहेत.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्ससह)