भारतात एम्ब्रेअरची नवीन सहाय्यक कंपनी; भारत-ब्राझील संरक्षण संबंध मजबूत

0

भारतामधील आपली उपस्थिती वाढवण्यासाठी, ब्राझीलची आघाडीची एरोस्पेस कंपनी- एम्ब्रेअर (Embraer) ने, एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीने नवी दिल्लीच्या एअरोकिटीमध्ये, पूर्ण मालकीची आपली नवीन सहाय्यक कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे भारत-ब्राझील संरक्षण भागीदारीला बळकटी मिळणार आहे.

या निर्णयामुळे, व्यावसायिक आणि संरक्षण एव्हिएशन क्षेत्रांमध्ये, भारताला एक धोरणात्मक बाजारपेठ म्हणून प्राधान्य देण्याच्या एम्ब्रेअरच्या दृष्टीकोनाची पुनःपुष्टी होते.

ही नवीन कंपनी, भारतामधील एम्ब्रेअरच्या कार्यपद्धतींना पाठबळ देणार असून, सध्या त्यांची व्यावसायिक जेट्सपासून ते संरक्षण आणि व्यवसायिक प्लॅटफॉर्मपर्यंत जवळपास 50 विमाने भारतात सेवा देत आहेत. हा विस्तार भारताच्या वाढत्या अवकाश व एव्हिएशन क्षेत्रातील भागीदारीला बळ देईल आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाशी सुसंगत असेल.

“भारत आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि हा विस्तार आमच्या भारताविषयी असलेल्या दृढ कटिबद्धतेचे प्रतीक आहे,” असे एम्ब्रेअरचे अध्यक्ष आणि CEO फ्रान्सिस्को गोम्स नेटो यांनी सांगितले.

“भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगासोबत आमचे सहकार्य अधिक दृढ करत, आमचा अनुभव व तंत्रज्ञान वापरून भारताच्या प्रगतीत योगदान देण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असेही ते म्हणाले.

भारतीय सहाय्यक कंपनीमध्ये इंजिनिअरिंग, खरेदी (procurement) आणि पुरवठा साखळी व्यवस्थापनासाठी (supply chain) समर्पित कार्यसंघ असतील. याशिवाय, ‘अर्बन एअर मोबिलिटी’ या उदयोन्मुख क्षेत्रावरही विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे, ज्यामुळे एम्ब्रेअरला भारतातील संपूर्ण विमानन संधींचा लाभ घेण्यास मदत होणार आहे.

भारत-ब्राझील संरक्षण भागीदारी

एम्ब्रेअरचा भारतातील वाढता सहभाग, हे भारत आणि ब्राझील यांच्यातील वाढत्या धोरणात्मक संरक्षण सहकार्याचे प्रतीक आहे. या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणजे एंब्रेअर डिफेन्स अ‍ॅण्ड सिक्युरिटी आणि महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्स यांच्यात गेल्या वर्षी झालेला सामंजस्य करार (MoU).

या कराराअंतर्गत, दोन्ही कंपन्या C-390 मिलेनियम, हे पुढच्या पिढीचे बहुउद्देशीय वाहतूक विमान (multi-mission transport aircraft) संयुक्तपणे विकसित करून, भारतीय हवाई दलाच्या ‘मध्यम वाहतूक विमान’ (Medium Transport Aircraft – MTA) कार्यक्रमासाठी सादर करणार आहेत.

यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे, हे सहकार्य मुख्यतः C-390 मिलेनियम या विमानावर केंद्रित आहे, आणि दोन्ही कंपन्या सैन्य वाहतूक विमानासाठीची अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणणार आहेत, तसेच एरोस्पेस क्षेत्रातही योगदान देणार आहेत.
या प्रकल्पाचे उद्दिष्ट म्हणजे भारताला C-390 उत्पादनाचे भविष्यातील प्रादेशिक केंद्र बनवणे.

ब्राझीलच्या या कंपनीने आधीच, भारतीय हवाई दलाच्या मध्यम वाहतूक विमान (MTA) कार्यक्रमासाठी Request for Information (RFI) ला प्रतिसाद दिला आहे. यावर्षीच्या एरो इंडिया शोमध्ये C-390 मिलेनियम हे बहुउद्देशीय सैन्य वाहतूक विमान उडवण्यात आले होते.

C-390 मिलेनियम हे विमान सध्या जगभरातील अनेक देशांच्या हवाई दलात कार्यरत असून, याची लवचिकता आणि बहुउद्देशीय क्षमता अतुलनीय आहे. यामध्ये एअर-टू-एअर इंधन भरणे (air-to-air refuelling), वैद्यकीय मदत (medical evacuation) आणि मालवाहतूक यासाठीची सोय असून २६ टन वजन वाहण्याची क्षमता आहे, जी आपल्या वर्गातील इतर विमानांपेक्षा अधिक आहे.

एम्ब्रेअरने भारतीय ERJ145 आधारित ‘नेत्रा AEW&C’ (Airborne Early Warning and Control) प्रणालीच्या विकासासाठी संबंधित भागधारकांबरोबर जवळून काम केले आहे, आणि ही प्रणाली सध्या भारतीय हवाई दलाकडून वापरली जात आहे.

हेही वाचा: वाढत्या सागरी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर India-EU चा संयुक्त नौदल सराव

भारतशक्तीच्या आधीच्या अहवालानुसार, दक्षिण अमेरिकेतील ब्राझील देश सध्या भारतात विकसित केलेल्या ‘आकाश’ क्षेपणास्त्र प्रणालीचे मूल्यांकन करत आहे, जे त्यांच्या Medium/High Altitude Air Defence Artillery System उपक्रमाचा एक भाग आहे.

DRDO द्वारे विकसित करण्यात आलेली ‘आकाश’ ही एक प्रणाली, तर अंतिम दोन स्पर्धकांपैकी दुसरी आहे– चीनची Sky Dragon 50.

ब्राझीलच्या लष्करी अधिकाऱ्यांनी, हा व्यवहार गव्हर्नमेंट-टू-गव्हर्नमेंट (G2G) पद्धतीने पूर्ण करण्याची सूचना दिली आहे, जेणेकरून खरेदी प्रक्रिया जलद गतीने पार पाडता येईल.

संरक्षण व्यापारासाठी आर्थिक पायाभूत सुविधा

भारत आणि ब्राझीलमधील वाढत्या आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारीचे निदर्शक म्हणून, भारताची एक्झिम बँक पुढील महिन्यात ब्राझीलमध्ये आपले पहिले लॅटिन अमेरिकन कार्यालय सुरू करणार आहे.

या निर्णयामुळे संयुक्त उपक्रमांना व संरक्षण निर्यातींना, दीर्घकालीन आर्थिक पाठबळ मिळणार आहे आणि भारताचे 2029 पर्यंत, संरक्षण निर्यात $6 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.

औद्योगिक भागीदारी

अवकाश (aerospace) आणि क्षेपणास्त्रे यापलीकडे, भारत आणि ब्राझील नौदल प्लॅटफॉर्म्स आणि लघु शस्त्रास्त्रांच्या संयुक्त उत्पादनाच्या संधींचा शोध घेत आहेत. Taurus Armas S.A. आणि CBC यांसारख्या ब्राझीलच्या आघाडीच्या शस्त्रनिर्माता कंपन्यांनी भारतात आपली उपस्थिती निर्माण केली आहे, आणि SSS डिफेन्स आणि जिंदाल डिफेन्स यांसारख्या भारतीय कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे.

या औद्योगिक सहकार्याचा विस्तार ‘स्कॉर्पियन क्लब’ सारख्या उपक्रमांपर्यंत झाला आहे, जिथे दोन्ही देश स्कॉर्पीन-वर्गातील पाणबुड्यांचे ऑपरेशन आणि देखभाल यासंदर्भातील ज्ञानाची देवाणघेवाण करत आहेत.

व्यावसायिक विमानवाहतुकीतील संधी

एम्ब्रेअरचे भारतातील विस्तार हे अशा वेळी होत आहे जेव्हा त्याचे E-Jet कुटुंबीय विमानं भारतातील प्रादेशिक विमानसेवा वाढीस चालना देत आहेत, विशेषतः टियर-2 आणि टियर-3 प्रकारातील शहरांमध्ये.

भारतीय विमान सेवा कंपनी Star Air, ही पूर्णतः एम्ब्रेअरच्या विमानांवर आधारित फ्लीट चालवते, जे लहान आणि कमी व्यस्त मार्गांवर फायदेशीर सेवा देण्यास अधिक उपयुक्त आहेत. 150 सीट्सपेक्षा कमी क्षमतेची ही E-Jet विमाने भारताच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमधील अंतर भरून काढण्यासाठी आणि भारताला जागतिक विमान वाहतूक केंद्र बनवण्याच्या उद्दिष्टासाठी उपयुक्त पर्याय आहेत.

नवीन सहाय्यक कंपनी, संरक्षण क्षेत्रातील भागीदारी, आणि व्यावसायिक विमान वाहतूक क्षेत्रातील पुढाकारांद्वारे, एम्ब्रेअर भारताच्या एरोस्पेस भविष्यात एक महत्त्वाचा भागीदार होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे—ज्यामुळे ही धोरणात्मक भागीदारी उद्योगापलीकडे जाऊन भू-राजकीय क्षेत्रातही प्रतिध्वनीत होत आहे.

By-Huma Siddiqui


+ posts
Previous articleनाटोच्या विस्ताराबाबत रशियाला वाटणारी चिंता रास्त : केलॉग
Next articleOperation Sindoor Not Over, Just Paused: India Sends Stern Warning to Pakistan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here