भविष्यातील संघर्षासाठी संयुक्तता, तांत्रिक सक्षमीकरण आवश्यक: संरक्षणमंत्री

0
राजनाथ सिंह
वेलिंग्टन येथील डीएसएससी दीक्षांत समारंभात, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपस्थितांना संबोधित करताना

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी, भारतीय सशस्त्र दलांनी भविष्यातील आव्हानांसाठी तयार राहण्याचे आणि सायबर, अवकाश (space) आणि माहिती युद्ध अशा नव्या युद्धक्षेत्रांमध्ये संयुक्तरित्या कार्य करण्याचे आवाहन केले.

तामिळनाडूतील वेलिंग्टन येथे, डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (DSSC) मध्ये पार पडलेल्या, 80व्या स्टाफ कोर्सच्या दीक्षांत समारंभात भारत आणि 26 मैत्रीपूर्ण राष्ट्रांतील अधिकाऱ्यांना संबोधित करताना, सिंह यांनी जागतिक सुरक्षेच्या वेगाने बदलणाऱ्या परिदृश्याशी जुळवून घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ते म्हणाले की, “आजच्या सतत बदलणाऱ्या बहुआयामी वातावरणात, सशस्त्र दलांनी संयुक्तपणे कार्य केले पाहिजे आणि भविष्यातील युद्धासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे, कारण सायबर, अवकाश आणि माहिती युद्धही पारंपरिक युद्धाइतकेच प्रभावी ठरत आहेत.”

राजनाथ सिंह यांनी, जागतिक भू-राजकारणात होत असलेल्या तीन मुख्य बदलांकडे लक्ष वेधले. राष्ट्रीय सुरक्षेला नव्याने मिळालेली प्राधान्यता, ‘तंत्रज्ञानाच्या त्सुनामी’चा प्रभाव आणि नाविन्यपूर्णतेत झालेली प्रचंड वाढ, यावर त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी अधिकाऱ्यांना या प्रवाहांचा सखोल अभ्यास करण्याचे आवाहन करतेवेळी सांगितले की, “मोदी सरकार भारतीय सैन्याला तंत्रज्ञानाच्या आघाडीवरचे, युद्धासाठी सदैव सज्ज आणि बहुआयामी एकत्रित ऑपरेशन्ससाठी सक्षम बनवण्यास वचनबद्ध आहे.”

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नव्याने उदयास येणाऱ्या तंत्रज्ञानामुळे युद्धभूमीचे स्वरूप कसे बदलत आहे, यावर भाष्य करताना त्यांनी, याला “थक्क करणारे” परिवर्तन म्हणत नाविन्यपूर्णतेचे महत्त्व अधोरेखित केले. युक्रेन-रशिया संघर्षाचे उदाहरण देताना ते म्हणाले की ड्रोन हे एक निर्णायक शस्त्र बनले असून, मानव व साधनसामग्रीच्या नुकसानीस मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरत आहेत, पारंपरिक तोफा किंवा रणगाड्यांपेक्षा अधिक प्रमाणात.

“तसेच, लो अर्थ ऑर्बिटमधील अवकाश-आधारित क्षमतांमुळे लष्करी गुप्तचर, पाळत ठेवणे, लक्ष्य निर्धारण आणि संप्रेषण यामध्ये क्रांती घडत आहे, ज्यामुळे युद्धक्षमता नव्या उंचीवर पोहोचली आहे,” असेही त्यांनी सांगितले.

संरक्षण मंत्र्यांनी, हायब्रीड व ग्रे-झोन युद्धाच्या वाढत्या प्रभावावरही भर दिला.. जिथे सायबर हल्ले, दिशाभूल करणारी माहिती आणि आर्थिक दडपशाहीसारख्या साधनांद्वारेही कोणतेही थेट शस्त्र न वापरता धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करता येतात. भारताच्या स्वतःच्या सुरक्षा वातावरणात सततचे सीमावाद आणि दहशतवाद व प्रॉक्सी युद्धाचे आव्हान असल्याचे त्यांनी नमूद केले.

आत्मनिर्भरतेवर (Atmanirbhar) भर देताना सिंह म्हणाले की, पश्चिम आशिया आणि युरोपमधील सध्याच्या संघर्षांनी स्थानिक संरक्षण उत्पादन प्रणाली मजबूत करण्याचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले आहे. “कमी खर्चात, उच्च तंत्रज्ञानयुक्त उपाययोजना विकसित करणे आणि आपल्या सैन्याची लढाई क्षमता वाढवणे ही पर्यायी गोष्ट नाही — ती अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहण्यासाठी सिंह यांनी, अधिकाऱ्यांना पाच मूलभूत गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले. जागरूकता, कौशल्य, जुळवून घेण्याची क्षमता, चपळता आणि परिवर्तनाचे प्रतिनिधी असणे. “उद्या युद्धभूमीवर असे नेते लागतील जे लवचिक, तंत्रज्ञान-सज्ज आणि नाविन्यपूर्ण असतील. तुम्ही केवळ तांत्रिक बदलाशी जुळवून घेत बसू नका, तर त्यांना पूर्णपणे स्विकारुन, प्रभावीपणे त्याचे नेतृत्व करा,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

या वर्षीच्या स्टाफ कोर्समध्ये, एकूण 479 अधिकारी सहभागी आहेत, ज्यामध्ये 26 मैत्रीपूर्ण परदेशांतील 38 परदेशी अधिकारी आणि 3 महिला अधिकारी यांचा समावेश आहे. 1948 मध्ये स्थापन झालेले DSSC (डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज) हे भारतातील एक अग्रगण्य त्रिसेवांतील (tri-service) प्रशिक्षण संस्था आहे, जी मध्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांना उच्चस्तरीय नेतृत्व व कर्मचारी जबाबदाऱ्यांसाठी तयार करते.

आजपर्यंत या संस्थेतून 19,000 हून अधिक भारतीय आणि 2,000 आंतरराष्ट्रीय अधिकारी पदवीधर झाले आहेत — यापैकी बरेच जण आपल्या देशांचे राष्ट्रप्रमुख किंवा सैन्यदलांचे प्रमुख म्हणून कार्यरत राहिले आहेत.


Spread the love
Previous articleAUKUS Nuclear Submarines Deal For Australia Under Lens
Next articleभारताने बांगलादेशची मालवाहतूक सवलत रद्द करण्यामागचे कारण काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here