स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत इस्रायली गोळीबार आणि हवाई हल्ल्यांमध्ये गाझामध्ये किमान 140 लोक ठार झाले आहे, तर काही पॅलेस्टिनी लोकांनी चिंता व्यक्त केली आहे की, इस्रायल-इराण संघर्षाकडे संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित झाल्यामुळे, त्यांच्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, बुधवारी झालेल्या इस्रायली गोळीबार आणि हवाई हल्ल्यांमध्ये एका दिवसात किमान 40 लोक ठार झाले. मृतांमध्ये मदतीच्या शोधात असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांचाही समावेश आहे. इस्रायलने गाझावरील संपूर्ण नाकाबंदी काही अंशी उठवल्यानंतर, गेल्या तीन आठवड्यांपासून ते जवळजवळ रोजच मारले जात आहेत.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, मगाझी निर्वासित छावणी, झेइतौन परिसर आणि गाझा सिटीमधील घरांवर वेगवेगळ्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 21 जणांचा मृत्यू झाला, तर दक्षिण गाझामधील खान युनूसमधील एका छावणीवर झालेल्या हवाई हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला.
तसेच, मध्य गाझामधील सलाहुद्दीन रस्त्यावर संयुक्त राष्ट्रांच्या मदत ट्रकांची वाट पाहणाऱ्या पॅलेस्टिनींच्या गर्दीवर इस्रायली गोळीबार झाल्यामुळे आणखी 14 लोक ठार झाले.
“नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करत आहोत” – IDF
सालाहुद्दीन रस्त्यावरील घटनेबाबत विचारले असता, इस्रायली संरक्षण दल (IDF) ने सांगितले की, “हा परिसर सक्रिय युद्धक्षेत्र असल्याचा इशारा जरी वारंवार देण्यात आला असला तरी, तरीही काही व्यक्तींनी मध्य गाझामधील नुसेरत भागात काम करत असलेल्या इस्रायली सैनिकांच्या दिशेने असे पाऊल उचलले, जे त्यांच्या दृष्टीने धोका निर्माण करणारे होते.”
IDF ने सांगितले की, सैनिकांनी इशारादर्शक गोळ्या झाडल्या, आणि त्यांना कोणतीही जखम झाल्याची माहिती नाही. इतर हल्ल्यांबाबत बोलताना, IDF ने म्हटले की, “ते हमासच्या लष्करी क्षमतेचा नाश करण्यासाठी कारवाई करत आहेत आणि त्याचवेळी नागरिकांचे नुकसान टाळण्यासाठी शक्य ते सर्व उपाय करत आहेत”.
मंगळवारी, गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मे महिन्याच्या अखेरपर्यंत मदत पोचवण्याचे काम पुन्हा सुरू झाल्यापासून, अन्नसहाय्यासाठी वाट पाहणाऱ्या 397 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि 3,000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
मृत्यू अटळ आहे…
गाझामधील काही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे की, ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या नव्या टप्प्याकडे दुर्लक्ष होईल, कारण आता सर्वांचे लक्ष इस्रायल-इराण संघर्षाकडे वळले आहे.
“गाझामध्ये लोक दिवस-रात्र मारले केले जात आहेत, पण आता सगळे लक्ष इस्रायल-इराण युद्धाकडे वळल्यामुळे, अलीकडे गाझाबाबत कुणी फारशी दखलही घेत नाहीये,” असे गाझा सिटीतील रहिवासी आदेल यांनी सांगितले.
“परिस्थिती इतकी विदारक आहे की, जे लोक इस्रायली बॉम्बपासून वाचत आहेत, ते उपासमारीने मरत आहेत. दररोज आपला जीव धोक्यात घालून लोकं अन्न मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यात बहुतांशी जणांना आपला जीव गमवावा लागत आहे आणि त्यांचे रक्त त्याच पिठाच्या पोत्यावर सांडते आहे, जे मिळवण्यासाठी ते धडपड करत आहेत,” असेही आदेल यांनी एका चॅट अॅपद्वारे Reuters या वृत्तसंस्थेला सांगितले.
“लाजीरवाणी बाब”
इस्रायल, गाझामध्ये मदत पोहोचवण्याचे बहुतांश काम आता ‘गाझा ह्युमॅनिटेरियन फाउंडेशन’ या नव्याने स्थापन झालेल्या, संस्थेद्वारे करत आहे. अमेरिका आणि इस्रायल समर्थित ही संस्था, खाजगी अमेरिकन सुरक्षा व लॉजिस्टिक्स कंपन्यांच्या मदतीने चालवली जाते आणि इस्रायली लष्कराच्या संरक्षणाखाली असलेल्या काही ठिकाणीच मदतवाटप केंद्रे चालवते.
इस्रायलने म्हटले आहे की, गाझामध्ये जिथे 20 लाखांहून अधिक लोक राहतात, तिथपर्यंत ही मदत पोहोचवली जाईलच, पण ती मदत हमासच्या हाती जाऊ नये याची खात्री करूनच. दुसरीकडे, हमासने मदत जप्त केल्याचे आरोप फेटाळले असून, इस्रायल उपासमारीला एक शस्त्र म्हणून वापरत असल्याचा आरोप केला आहे.
बुधवारी X (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट करताना, पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेचे प्रमुख फिलिप लाझारिनी यांनी सध्याच्या मदत वितरण व्यवस्थेला, “एक लाजिरवाणी गोष्ट आणि आपल्या सामूहिक सद्सद्विवेकावरील कलंक” असे संबोधले.
गाझामधील युद्ध ऑक्टोबर 2023 मध्ये त्या वेळी सुरू झाले, जेव्हा हमासच्या नेतृत्वाखालील अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला करून सुमारे 1,200 लोक ठार केले आणि सुमारे 250 जणांना बंदी बनवले, अशी माहिती इस्रायलच्या सहयोगी देशांनी दिली आहे.
गाझामध्ये त्यानंतर इस्रायलने सुरू केलेल्या लष्करी कारवाईत गाझाच्या आरोग्य मंत्रालयानुसार जवळपास 55,600 पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत, संपूर्ण परिसरातील लोकसंख्या जवळपास विस्थापित झाली आहे आणि एक गंभीर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे.
“संपूर्ण समाधानाची आशा”
वर्ल्ड फूड प्रोग्रॅम (WFP) ने, बुधवारी गाझामधील अन्नवाटपात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची मागणी केली. गेल्या चार आठवड्यांत गाझामध्ये पोहोचवलेले 9,000 मेट्रिक टन अन्न हे आवश्यकतेच्या तुलनेत “अतिशय नगण्य” प्रमाण असल्याचे त्यांनी सांगितले.
“भुकेची भीती आणि अन्नाची तीव्र गरज यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या मदत मिळवण्यासाठी वाहतुकीच्या ठराविक मार्गांवर एकत्र येत आहे. त्यांना वाटेतच अन्नसहाय्य रोखून मिळवायचे आहे,” असे WFP च्या निवेदनात म्हटले आहे.
“जीवनरक्षणासाठी मदत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भुकेलेल्या लोकांवर होणारे कोणतेही हिंसक प्रकार, ज्यात मृत्यू अथवा दुखापत होते, हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे,” असेही त्यात नमूद आहे.
गाझामधील पॅलेस्टिनी नागरिक इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या हवाई युद्धाकडे लक्ष ठेवून आहेत. इराण हा हमासचा दीर्घकालीन समर्थक आहे.
“आम्हाला कदाचित इराणी क्षेपणास्त्रांमुळे इस्रायलला त्रास होताना पाहून थोडे समाधान वाटते, पण शेवटी या युद्धातील प्रत्येक दिवस निष्पाप लोकांचा जीव घेतो आहे,” असे 47 वर्षांचे शाबान अबेद यांनी सांगितले, जे उत्तर गाझातील रहिवासी पाच मुलांचे वडील आहेत.
“आम्हाला फक्त एवढीच आशा आहे की या युद्धाचा शेवट करणारे एखादे सर्वसमावेशक समाधान लवकरच सापडेल” असेही ते म्हणाले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)