इराण आणि इस्रायल यांनी, गुरुवारी एकमेकांवर नव्याने हवाई हल्ल्यांची मालिका सुरु केली. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक संभ्रम कायम ठेवत, हे अजूनही हे स्पष्ट केलेले नाही की, अमेरिका इस्रायलच्या इराणमधील अणुउपक्रमांवरील हल्ल्यांना पाठिंबा देणार की नाही.
गेल्या आठवड्यात, इस्रायलने इराणवर केलेल्या क्षेपणास्त्र आणि हवाई हल्ल्यांमध्ये इराणी लष्करातील वरिष्ठ नेतृत्वाचा मोठ्या प्रमाणात नाश झाला आहे, अणुउपक्रमांचे नुकसान झाले आहे आणि शेकडो लोकांचा यात मृत्यू झाला आहे. त्याच्या प्रत्युत्तरात इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये इस्रायलमधील सुमारे दोन डझन नागरिक ठार झाले आहेत.
“कोणालाच माहिती नाही मी काय करणार आहे” – ट्रम्प
इराण-इस्रायलमध्ये झालेल्या आतापर्यंतच्या या सर्वात गंभीर संघर्षात, जागतिक महासत्ता ओढल्या जातील का आणि यामुळे गाझा युद्धाच्या परिणामांनी आधीच अस्थिर झालेल्या मध्यपूर्वेतील समतोल आणखी ढासळेल का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
बुधवारी, व्हाईट हाऊसबाहेर पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी, इस्रायलच्या हवाई मोहिमेत सामील होण्याबाबत काही निर्णय घेतला आहे का, यावर बोलण्याचे टाळले. त्यांनी फक्त एवढेच सांगितले: “मी हे करुही शकतो आणि कदाचित नाही देखील… कोणालाच माहिती नाही मी काय करणार आहे.”
ट्रम्प पुढे म्हणाले की, “इराणचे काही अधिकारी वॉशिंग्टनला भेट देण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. ते शक्य आहे, पण आता त्यासाठी थोडा उशीर झाला आहे.”
‘कधीही भरून न येणारे नुकसान’
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई, यांनी ट्रम्प यांच्या इराणने आत्मसमर्पण करावे या आधीच्या आवाहनाला फेटाळले. शुक्रवारी प्रथमच त्यांनी दूरदर्शनवर एक रेकॉर्डेड भाषण दिले.
“अमेरिकेच्या लष्करी हस्तक्षेपामुळे निश्चितच कधीही भरुन न येणारे नुकसान होईल, याची अमेरिकेने जाण ठेवावी,” असे त्यांनी सांगितले. “इराणी जनता आत्मसमर्पण करणार नाही,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
इराणने अण्वस्त्र तयार करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचा पुनरुच्चार केला असून, त्यांचा अणुउपक्रम पूर्णपणे शांततामय उद्दिष्टांसाठी असल्याचा दावा केला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) ने मागील आठवड्यात सांगितले की, इराणने 20 वर्षांनंतर प्रथमच अण्वस्त्र प्रसार प्रतिबंध कराराचे उल्लंघन केले आहे.
दरम्यान, जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जिनीव्हा येथे शुक्रवारी इराणी परराष्ट्र मंत्र्यांसोबत बैठक घेणार असून, इराणने पुन्हा वाटाघाटींच्या टेबलवर यावे, यासाठी प्रयत्न करतील, अशी माहिती जर्मन मुत्सद्दीनी रॉयटर्सला दिली.
गोंधळ आणि पलायन
एकीकडे राजकीय प्रयत्न सुरू असताना, बुधवारी तेहरानमधील लाखो रहिवाशांनी इस्रायली हल्ल्यांपासून वाचण्यासाठी शहर सोडले.
31 वर्षीय रहिवासी अरेझू यांनी Reuters ला सांगितले की, “त्या जवळच्या लवासान या पर्यटनस्थळी पोहोचल्या आहेत.
माझ्या मैत्रिणीच्या घरावर हल्ला झाला आणि तिचा भाऊ जखमी झाला. आम्ही शासनाच्या अणुउपक्रमाच्या निर्णयाची फळे का भोगत आहोत?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Wall Street Journal च्या अहवालानुसार, ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्याच्या योजना मंजूर केल्या आहेत, मात्र अंतिम आदेश थांबवला आहे, कारण ते पाहत आहेत की इराण अणुउपक्रम सोडतो का नाही.
Bloomberg News ने बुधवारी सांगितले की, वरिष्ठ अमेरिकी अधिकारी इराणवरील संभाव्य हल्ल्यासाठी तयारी करत आहेत.
ड्रोन हल्ले
गुरुवारी पहाटे, तेहरानमध्ये हवाई संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आणि शहराच्या उपनगरांमध्ये ड्रोन पाडण्यात आले, असे SNN या अर्धसरकारी वृत्तसंस्थेने सांगितले.
इराणच्या वृत्तसंस्थांनी सांगितले की, इस्रायली हल्ल्यांसाठी ड्रोन तयार करणाऱ्या 18 “शत्रू एजंट्स” ना मशहद शहरात अटक करण्यात आली आहे.
इस्रायली लष्कराने सांगितले की, “गुरुवारी उत्तरेकडील भागांमध्ये आणि जॉर्डन व्हॅलीत सायरन वाजले आणि इराणने पाठवलेले दोन ड्रोन निष्क्रीय करण्यात आले.”
इराणने पाठवलेल्या मिसाईल्सचा हा असा पहिलाच हल्ला आहे, जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात डागलेली क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा चुकवून इस्रायलच्या नागरिकांवर आदळली आहेत.
“पायरी पायरीने प्रगती” – नेतन्याहू
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू, यांनी बुधवारी एका व्हिडिओमध्ये सांगितले की, “इस्रायल इराणच्या अणुउपक्रम आणि क्षेपणास्त्र शस्त्रास्त्र साठ्याच्या विरोधात पायरी पायरीने प्रगती करत आहे.”
“आपण अणुउपक्रम केंद्रे, क्षेपणास्त्रे, मुख्यालये आणि शासनाची प्रतीके यांना लक्ष्य करत आहोत,” असे त्यांनी सांगितले.
इस्रायल अण्वस्त्र प्रसार प्रतिबंध कराराचा भाग नाही, आणि तो मध्यपूर्वेतील एकमेव देश मानला जातो ज्याच्याकडे अण्वस्त्रे आहेत, मात्र इस्रायल याची पुष्टीही करत नाही आणि नकारही देत नाही.
नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचे आभार मानत, “इस्रायलचा खरा मित्र” त्यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले.
ट्रम्प यांनी एका बाजूने राजनैतिक तोडगा सुचवला, तर दुसऱ्या बाजूला युद्धात सामील होण्याची शक्यता व्यक्त केली.
मंगळवारी, सोशल मीडियावर त्यांनी खामेनेईला ठार मारण्याची शक्यता विचारात घेतल्याचाही संकेत दिला.
पुतिन यांचा इशारा
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना विचारण्यात आले की, जर इस्रायलने अमेरिका मदतीने इराणच्या सर्वोच्च नेत्याला ठार मारले, तर त्यांचा प्रतिसाद काय असेल?
त्यावर पुतिन म्हणाले की, “मी या शक्यतेबाबत चर्चाही करू इच्छित नाही.”
पुतिन म्हणाले की, “सर्व पक्षांनी असा मार्ग शोधायला हवा, ज्यात इराणचा शांततामय अणुउपक्रमाचा अधिकार आणि इस्रायलचा सुरक्षिततेचा अधिकार दोन्ही टिकून राहतील.”
इस्रायली अधिकाऱ्यांच्या मते, गेल्या शुक्रवारपासून इराणने सुमारे 400 क्षेपणास्त्र इस्रायलवर डागले असून त्यातील सुमारे 40 संरक्षण प्रणाली चुकवून गेले आहेत, ज्यात 24 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
इराणने इस्रायली हल्ल्यांमध्ये 224 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे, त्यात बहुतांश सामान्य नागरिक आहेत. त्यानंतर मात्र मृतांचा आकडा अद्याप अपडेट करण्यात आलेला नाही.
टीम स्ट्रॅटन्यूज
(Reuters च्या इनपुट्ससह)