जनरल एस. पद्मनाभन (निवृत्त) यांचे निधन

0

संसदेवरील हल्ल्यानंतर 2001 – 2002 मध्ये पाकिस्तानविरुद्ध सुरू असणाऱ्या ‘ऑपरेशन पराक्रम’च्यावेळी  लष्करप्रमुख असलेल्या जनरल सुंदरराजन पद्मनाभन (निवृत्त) यांचे आज निधन झाले. भारतीय सैन्यात जनरल पद्मनाभन यांनी 43 वर्षांची प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.
जनरल पद्मनाभन किंवा ‘पॅडी’ म्हणून त्यांना प्रेमाने संबोधले जायचे, पुण्याजवळील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) विद्यार्थी. त्याआधी त्यांनी शालेय शिक्षण डेहराडून येथील राष्ट्रीय भारतीय लष्करी महाविद्यालयातून (आरआयएमसी) पूर्ण केले. भारतीय लष्करी अकादमीमधील (आयएमए) वर्षभराच्या कामगिरीनंतर 13 डिसेंबर 1959 रोजी त्यांना आर्टिलरी रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले.
जनरल पद्मनाभन यांच्या लष्करातील त्यांच्या अनुकरणीय कारकीर्दीत अनेक प्रतिष्ठित कमांड, स्टाफ आणि अनेक महत्त्वाच्या पोस्टिंग मिळल्या. पॅडी यांनी नाशिकमधील देवळाली येथील स्कूल ऑफ आर्टिलरी येथे तोफखाना प्रशिक्षक म्हणून काम केले, ते पायदळ ब्रिगेडचे ब्रिगेड मेजर होते, त्यांनी माउंटन डिव्हिजनचे कर्नल जनरल स्टाफ म्हणूनही काम केले ज्यासाठी त्यांना विशिष्ट सेवा पदकाने (VSM) सन्मानित करण्यात आले.
दिवंगत लष्करप्रमुख प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या भारतीय लष्करी अकादमीमध्ये प्रशिक्षक म्हणून दोनदा कार्यरत होते. जनरल पद्मनाभन स्वतः  वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (डीएसएससी) आणि नवी दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेजचे (एनडीसी) पदवीधर होते.
दिवंगत लष्करप्रमुखांनी (सीओएएस) ऑगस्ट 1975 ते जुलै 1976 पर्यंत स्वतंत्र लाइट बॅटरीचे नेतृत्व केले आणि पुढे आर्टिलरी रेजिमेंटचे नेतृत्व केले. त्यानंतर पुढे त्यांनी आर्टिलरी आणि इन्फंट्री ब्रिगेड अशा दोन्हींचे नेतृत्व केले. पंजाबमध्ये इन्फंट्री विभागाचे नेतृत्व केल्यानंतर नागालँड स्थित 3 कॉर्प्सचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.
लेफ्टनंट जनरल पदावर पदोन्नती झाल्यानंतर त्यांनी काश्मीर खोऱ्यातील 15 कॉर्प्सची सूत्रे हाती घेतली. जुलै 1993 ते फेब्रुवारी 1995 पर्यंत ते कॉर्प्स कमांडर होते, त्या काळात लष्कराने काश्मीरमधील दहशतवादावर आपले वर्चस्व सिद्ध केले.
त्यानंतर सप्टेंबर 1996 पर्यंत लष्करी गुप्तचर महासंचालक (डीजीएमआय) म्हणून ते कार्यरत होते. याचा पदभार स्वीकारून ते उधमपूरला गेले. जानेवारी 1999 पर्यंत त्यांनी  या पदाचा कार्यभार सांभाळला, त्यानंतर त्यांची बदली पुण्यात  लष्कराच्या दक्षिण कमांडची सूत्रे हाती घेण्यासाठी करण्यात आली.
1 ऑक्टोबर 2000 रोजी जनरल पद्मनाभन यांनी जनरल व्ही. पी. मलिक यांच्याकडून पदभार स्वीकारला आणि ते 20वे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख म्हणून त्यांच्या कार्यकाळातच ऑपरेशन पराक्रमदरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात जवळजवळ वर्षभर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दिवंगत लष्करप्रमुखांनी 31 डिसेंबर 2002 रोजी निवृत्त होईपर्यंत एक वर्ष चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्षपदही भूषवले. नामांकित लेखक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनरल पद्मनाभन यांनी तीन पुस्तकेही लिहिली आहेत.
टीम भारतशक्ती


Spread the love
Previous articleGen S Padmanabhan (Retd) Passes Away
Next articleArmy Commanders Outline Roadmap For Modernization, Reorganization Of Key Formations

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here