भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात महत्वपूर्ण भर पडली आहे. सोमवारी, गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) कडून तयार करण्यात येत असलेल्या 8 फास्ट पेट्रोल व्हेसल्स (FPVs) मालिकेतील पाचव्या – ‘अचल’ (Achal) गस्ती नौकेचा लोकार्पण सोहळा पार पडला. हा प्रकल्प 473 कोटी रुपयांच्या करारांतर्गत राबवला जात आहे.
यावेळी तटरक्षक दलाच्या पश्चिम किनारपट्टीचे कमांडर, अतिरिक्त महासंचालक अनिल कुमार हरबोला उपस्थित होते. सोबतच भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि GSL चे वरिष्ठ अधिकारी, तसेच GSL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय देखील उपस्थित होते.
‘अचल’ ही, 52 मीटर लांब आणि 8 मीटर रुंद असून, तिचे वजन सुमारे 320 टन आहे. हे फास्ट पेट्रोल व्हेसल, विविध अत्यावश्यक सागरी भूमिकांसाठी तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये गस्त घालणे, प्रतिबंधात्मक कारवाई, किनारपट्टीवरील संपत्ती आणि बेटांचे संरक्षण आदींचा समावेश आहे. ही नौका ताशी/27 नॉट्स इतका उच्च वेग गाठू शकते आणि CPP (Controllable Pitch Propeller) आधारित प्रेरण प्रणालीने ती सुसज्ज आहे. याची निर्मिती अमेरिकन ब्युरो ऑफ शिपिंग व इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग या दोन प्रमाणन संस्थांच्या मानकांनुसार करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे अचलच्या निर्मितीमध्ये, 60% हून अधिक स्वदेशी घटकांचा वापर केला गेला आहे, जो संरक्षण उत्पादन क्षेत्रातील भारताच्या ‘आत्मनिर्भरतेला’ अधोरेखित करतो. GSL च्या अधिकाऱ्यांनी नमूद केले की, ‘या प्रकल्पामुळे देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना मिळाली असून, रोजगारनिर्मिती तसेच विविध पुरवठा साखळ्यांमधील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) आधार मिळाला आहे.’
‘अचल’ नौकेचे लोकार्पण, हे GSL आणि भारतीय तटरक्षक दल यांच्यातील सातत्यपूर्ण सहकार्याचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
या मालिकेतील उर्वरित तीन नौका लवकरच वितरित केल्या जाणार आहेत.
टीम भारतशक्ती