पाकिस्तानातील हिंदू राज्यमंत्री खियाल दास कोहिस्तानी यांच्यावर हल्ला

0

पाकिस्तानातील ठट्टा शहरात काही अज्ञात हल्लेखोरांनी, स्थानिक हिंदू राज्यमंत्री खियाल दास कोहिस्तानी यांच्यावर हल्ला केला. एका कार्यक्रमासाठी झोक शरीफ येथे जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला.

खियाल दास कोहिस्तानी, सध्या पाकिस्तानचे धार्मिक व्यवहार आणि आंतरधर्मीय सलोखा राज्यमंत्री (Religious Affairs and Interfaith Harmony) म्हणून कार्यरत आहेत.

समा न्यूजच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी काठी, खुर्च्या, टोमॅटो आणि अंडी वापरून त्यांच्या वाहनावर हल्ला केला. हा हल्ला नॅशनल बँकेजवळ झाला असून, एका स्थानिक राष्ट्रवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे. हल्ल्यात वाहनाचे नुकसान झाले असले तरी, मंत्री कोहिस्तानी सुखरूप बचावले आहेत.

या घटनेमुळे सिंध प्रांतातील सरकारी अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे, तसेच या घटनेने राजकीय वादविवादालाही सुरुवात झाली आहे.

पाकिस्तानी पंतप्रधानांकडून निषेध

पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, त्यांनी कोहिस्तानी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत सहानुभूती व्यक्त केली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

शहबाज शरीफ म्हणाले की, “लोकप्रतिनिधींवर होणारे हल्ले आम्ही सहन करणार नाही. दोषींवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई होईल आणि त्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही.”

त्यांनी या हल्ल्याची सखोल चौकशी करण्याचे आश्वासनही दिले आहे.

पाकिस्तानचे संघीय माहिती मंत्री अताउल्ला तारार, यांनीही या घटनेची दखल घेत सिंधचे पोलीस महासंचालक गुलाम नबी मेमन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या हल्ल्याबाबत अंतर्गत मंत्रालयाकडून सविस्तर अहवाल देखील मागवला आहे.

सिंध सरकारची प्रतिक्रिया

सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, हैदराबाद विभागाच्या पोलीस महासंचालकांना याबाबत त्वरित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री शाह म्हणाले की, “कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही.” त्यांनी दोषींना तातडीने अटक करून संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पाकिस्तानातील मुस्लिम लीग-नवाज (PML-N) चे अध्यक्ष नवाज शरीफ, यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी दोषींना त्वरित अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी केल्याचे, डुनिया न्यूजने म्हटले आहे.

हल्ल्यानंतर कोहिस्तानी यांनी PML-N नेतृत्वाचे आभार मानले असून, या हल्ल्याविषयी आपली चिंता व्यक्त केली आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज (IBNS च्या माहितीनुसार)


+ posts
Previous articleUAE मध्ये होणाऱ्या Desert Flag-10 हवाई लढाऊ सरावात, भारताचा सहभाग
Next articlePutin’s Easter Ceasefire Ends: Russia Launches Missiles, Drones

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here