सरकारी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इस्रायलच्या गाझामधील युद्धाला विरोध आणि अमेरिका-विरोधी भावनेमुळे उफाळलेल्या आंदोलनादरम्यान, पाकिस्तानातील KFC ब्रँडच्या 10 हून अधिक शाखांवर जमावाने हल्ले केले, ज्यानंतर काही आठवड्यांत पोलिसांनी 170 हून अधिक जणांना अटक केली आहे.
कराची (दक्षिण बंदरनगरी), लाहोर (पूर्वेकडील शहर) आणि इस्लामाबाद (राजधानी) यासारख्या प्रमुख शहरात, आंदोलकांनी हल्ला करून नुकसान केलेल्या KFCच्या किमान 11 शाखांची, पोलिसांनी पुष्टी केली आहे. याप्रकरणी एकूण 178 जणांना अटक करण्यात आल्याचे, अधिकाऱ्यांनी याच आठवड्यात सांगितले.
KFC आणि त्याची अमेरिकास्थित पॅरेंट कंपनी Yum Brands यांनी या प्रकरणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
KFC कर्मचारी गोळीबारात ठार
एका पोलिस अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर सांगितले की, “लाहोरच्या उपनगरातील KFC शाखेत या आठवड्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून एका KFC कर्मचाऱ्याची हत्या केली. त्यावेळी कोणतेही आंदोलन सुरू नव्हते, त्यामुळे या हत्येमागे राजकीय कारण आहे की अन्य काही, याचा तपास सुरू आहे.”
‘लाहोरमध्ये सुरुवातीच्या दोन हल्ल्यांनंतर आणि त्यानंतरचे पाच हल्ले परतवून लावल्यानंतर, शहरातील 27 KFC शाखांभोवती सुरक्षा वाढवण्यात आली आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.
“या हल्ल्यांमध्ये वेगवेगळ्या व्यक्ती आणि गटांचा नेमका काय सहभाग होता, याचा तपास सुरू आहे,” असे वरिष्ठ पोलिस अधिकारी फैसल कमर यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, लाहोरमध्ये 11 जणांना अटक करण्यात आली असून त्यात तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (TLP) या इस्लामी धार्मिक पक्षाचा एक सदस्यही आहे. मात्र, या निदर्शनांचे अधिकृत आयोजन TLP कडून करण्यात आलेले नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘इस्रायलचा बहिष्कार करा’
TLP चे प्रवक्ते रेहान मोहसिन खान यांनी सांगितले की, “या संघटनेने मुस्लिमांना इस्रायली उत्पादनांचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले आहे, मात्र त्यांनी KFC बाहेर निदर्शन करण्याचे कोणतेही आवाहन केलेले नाही.”
“जर स्वतःला TLP चा नेता किंवा कार्यकर्ता म्हणवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अशा प्रकारच्या कृतीत सहभाग घेतला असेल, तर ती त्याची वैयक्तिक कृती मानावी, ज्याचा पक्षाच्या धोरणाशी काही संबंध नाही,” असे खान यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानात KFC ला दीर्घ काळापासून अमेरिकेचे प्रतीक मानले जाते आणि गेल्या काही दशकांत अमेरिका-विरोधी भावनांमुळे अनेक निदर्शने आणि हल्ल्यांचे लक्ष्य बनले आहे.
गेल्या काही महिन्यांत, इस्रायली लष्करी कारवाईच्या विरोधात पाकिस्तानसह अनेक मुस्लिमबहुल देशांमध्ये पश्चिमी ब्रँड्सवर बहिष्कार टाकला आहे आणि विविध प्रकारच्या निदर्शनांचा परिणाम झाला आहे.
गाझा युद्ध
हे युद्ध 7 ऑक्टोबर 2023 रोजी, हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने, दक्षिण इस्रायलवर केलेल्या हल्ल्याने सुरू झाले. इस्रायली आकडेवारीनुसार, त्या हल्ल्यात 1,200 लोक ठार झाले आणि 251 जणांना गाझामध्ये बंधक म्हणून नेले.
त्यानंतर, स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इस्रायली कारवाईत आतापर्यंत 51,00 पेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत.
Yum Brands ने सांगितले आहे की, त्याच्या दुसऱ्या ब्रँडपैकी एक असलेल्या Pizza Hut ला गाझा युद्धाशी संबंधित बहिष्कारांमुळे दीर्घकालीन परिणाम भोगावे लागत आहेत.
पाकिस्तानचे Cola मार्केट
पाकिस्तानात, काही ग्राहक अमेरिकन ब्रँड्सपासून दूर राहू लागल्याने, स्थानिक कंपन्यांनी झपाट्याने वाढणाऱ्या कोला मार्केटमध्ये स्थान मिळवले आहे.
GlobalData च्या माहितीनुसार, 2022 मध्ये कोका-कोलाचा बाजार हिस्सा 6.2% होता, जो 2023 मध्ये घसरून 5.7% झाला. पेप्सीकोचा वाटा 10.8% वरून 10.04 टक्क्यांवर घसरला.
याच महिन्याच्या सुरुवातीला, पाकिस्तानातील काही धार्मिक नेत्यांनी इस्रायल किंवा अमेरिकन अर्थव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या उत्पादनांचा किंवा ब्रँड्सचा बहिष्कार करण्याचे आवाहन केले होते, मात्र लोकांना शांत राहण्याचे आणि मालमत्तेचे नुकसान न करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)