भारतीय हवाई दलाचा (IAF) एक फ्रंटलाईन ताफा, संयुक्त अरब अमिरातीतील अल धाफरा एअर बेसवर दाखल झाला आहे, जिथे तो ‘Desert Flag-10‘ या प्रमुख बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सरावात सहभागी होणार आहे. UAE हवाई दलाच्या वतीने आयोजित केलेला हा सराव, 21 एप्रिल ते 8 मे दरम्यान पार पडणार असून, 12 विविध राष्ट्रांची वायुसेनादल एकत्रितपणे या उच्च तीव्रतेच्या प्रशिक्षण आणि संयुक्त ऑपरेशन्समध्ये सहभागी होणार आहेत.
भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी, भारतीय हवाई दलाने आपली मिग-29 आणि जॅग्वार फायटर विमाने तैनात केली आहेत, जी ऑस्ट्रेलिया, बहरीन, फ्रान्स, जर्मनी, कतार, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, तुर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि यजमान यूएई या देशांतील सहभागी दलांसोबत आपली लढाऊ क्षमता दाखवणार आहेत.
गुंतागुंतीच्या हवाई युद्धाच्या परिस्थितीचे अनुकरण करण्यासाठी तयार करण्यात आलेला ‘Desert Flag’ सराव हा सामरिक ज्ञान, मोहिमेचे नियोजन आणि प्रगत हवाई दलांकडून सर्वोत्तम पद्धती यांची देवाणघेवाण करून ऑपरेशनल समन्वय वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित केला जातो.
“अशा बहुराष्ट्रीय सरावांमध्ये सहभाग घेतल्याने केवळ भारताची लढाऊ कौशल्यं विकसित होत नाहीत, तर याशिवाय भागीदार राष्ट्रांसोबतची सुसंगतता आणि लष्करी सहकार्य अधिक बळकट होते,” असे भारतीय हवाई दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
‘Desert Flag-10’ सरावातील भारताचा सहभाग, हा पश्चिम आशिया व इतर महत्त्वाच्या भागांतील संरक्षण भागीदारी मजबूत करण्याच्या भारताच्या वाढत्या धोरणात्मक दृष्टिकोनाचे प्रतिक आहे.
टीम भारतशक्ती