भारतीय लष्करातील संयुक्तता, समाकलन आणि थिएटर कमांड संरचना यांना बळकटी देण्यासाठी, एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी, संरक्षण प्रमुख (CDS) आणि लष्करी व्यवहार विभागाच्या (DMA) सचिवांना, भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या वतीने, संयुक्त सूचना आणि संयुक्त आदेश जारी करण्याचे अधिकार दिले आहेत. लष्करी परिवर्तनाला गती मिळण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
हा निर्णय पारंपारिक पद्धतीमध्ये एक आमूलाग्र बदल दर्शवतो, जिथे दोन किंवा अधिक सेवेतील आदेश हे प्रत्येक सेवेद्वारे स्वतंत्रपणे दिले जात होते. मात्र, या निर्णयामुळे उच्च संरक्षण संघटनेचे आधुनिकीकरण करण्याच्या आणि तिन्ही सेवांचे कार्य अधिक सुसंगत करण्याच्या सरकारच्या दृढ संकल्पाला बळ मिळते.
पहिला संयुक्त आदेश आहे — ‘संयुक्त सूचना व संयुक्त आदेश मंजुर करणे, ते जाहीर करणे आणि त्याची क्रमवारी निश्चीत करणे’, 24 जून 2025 रोजी हा आदेश अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. यामुळे संयुक्त निर्देश जारी करण्यासाठी एकसंध प्रक्रिया चौकट उभी करण्यास मदत होणार आहे. कार्यातील पुनरावृत्ती टाळणे, सेवेतील समन्वय वाढवणे, तसेच पारदर्शकता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
हा पुढाकार भारताच्या एकात्मिक थिएटर कमांडच्या दिशेने एक मूलभूत पाऊल आहे, जे प्रयत्नांची एकता आणि कार्यात्मक समन्वय वाढवते. भविष्यातील युद्धासाठी संयुक्ततेवर असलेला भर यामुळे अधोरेखित होतो, तसेच भारतीय सशस्त्र दलांना अधिक सुसंगत व चपळ प्रतिसाद देण्यासाठी सक्षम बनवतो.
या विकासामुळे सशस्त्र दल अधिक सुसंगततेने कार्य करू शकतील, तसेच यामुळे राष्ट्राच्या सार्वभौमत्व आणि सीमेवरील अखंड रक्षणाच्या सामूहिक ध्येयाला बळकटी मिळेल.
टीम भारतशक्ती