सलग १२ दिवस सुरु असलेल्या इस्रायलच्या हवाई हल्ल्यांनंतर, मंगळवारी अचानक जाहीर झालेल्या शस्त्रसंधीमुळे इराणी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रचंड प्रमाणात झालेल्या या हल्ल्यांमध्ये इराणमधील अनेक शहरे हादरली, शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो नागरिकांना आपली घरे सोडून पळ काढावा लागला.
इराणची राजधानी तेहरानमध्ये, नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडत संघर्षाच्या भीतीपासून सुटका झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच पुन्हा एकदा आपले दैनंदिन जीवन सुरळीत करण्याची आशा व्यक्त केली.
इस्रायली हल्ल्यांपासून बचावासाठी पळून गेलेले अनेक इराणी नागरिक, शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर दिलासा मिळाल्याचे सांगत होते. शहराबाहेर, नातेवाईकांकडे किंवा भाड्याच्या घरांमध्ये जाऊन राहणे- थकवणारे आणि न परवडणारे होते, असे सांगत त्यांनी पुन्हा घरी परतण्याचा आनंद व्यक्त केला.
इराणमध्ये तणावाची तीव्रता कमी
“मी अतिशय आनंदात आहे. संघर्ष अखेर संपला आहे आणि आता आपण शांततेत जगू शकतो. ही एक अनावश्यक लढाई होती आणि त्याची किंमत सामान्य जनतेला मोजावी लागली, सत्ताधाऱ्यांच्या धोरणांमुळे सामान्य नागरिकांना सहन करावे लागले,” असे शिराझ येथील एका 40 वर्षीय महिलेने सांगितले. त्यांनी आपल्या नावाचा खुलासा करण्यास नकार दिला, कारण तिला सूडाची भीती होती.
फक्त 24 तासांपूर्वी, इस्रायलने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स आणि त्यांच्या निमलष्करी बासीज मिलिशिया तसेच अल्बोर्झ पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एविन तुरुंगाला लक्ष्य केले होते, ज्यामुळे राजधानीच्या काही भागांत धुराचे लोट पसरले.
तेहरानमधील गजबजलेल्या रस्त्यावर उपस्थित एका व्यक्तीने, आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती करत सांगितले की,
“यामध्ये सर्वसामान्य लोक विनाकारण मरण पावले, मग ते आपले असोत की त्यांचे. दोन्ही बाजूंनी निरपराध लोकांची हानी झाली, त्यामुळे हे सगळे लवकरच थांबले ते बरे झाले.”
इस्रायलने हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना शहराच्या मोठ्या भागातून बाहेर जाण्याचा इशारा दिला होता, त्यामुळे तेहरानमधून बाहेर पडणाऱ्या महामार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
अनेक नागरिकांचे हाल
दरम्यान, स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळून गेलेल्यांपैकी काही लोक, आर्थिक चणचण भासू लागल्यामुळे शस्त्रसंधी जाहीर होण्याआधीच पुन्हा घरी परतू लागले होते.
39 वर्षीय अरश, जे सरकारी कर्मचारी आहेत, त्यांनी सुरुवातीला आपल्या कुटुंबाला तेहरानपासून 35 मैल दूर डॅमावंद येथे नेले, जिथे सहसा लोक सुट्टीमध्ये पर्यटनासाठी जातात, मात्र पुरेशा पैशांअभावी त्यांना परतावे लागले.
“माझी पत्नी आणि दोन मुले बॉम्बस्फोटांमुळे प्रचंड घाबरली होती, पण डॅमावंदमध्ये अगदी छोटी खोली भाड्याने घेऊन राहणंही माझ्या मर्यादित उत्पन्नाच्या पलीकडील होते,” असे त्यांनी सांगितले.
तर 35 वर्षीय नोशीन, आपल्या पती आणि मुलीसह सुमारे पाच तास प्रवास करून ‘सारी’ (कॅस्पियन समुद्राजवळील एक शहर) येथे आपल्या सासूकडे गेल्या, मात्र तिथे आधीच नातेवाईकांनी आसरा घेतला असल्यामुळे घर खचाखच भरलेले होते, त्यामुळे शेवटी त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला.
“माझी मुलगी तिची खोली मिस करते, मलाही माझे घर प्रिय आहे. असे कितीवेळी आणि कुठे पळून जाणार… पुन्हा हल्ला झाला तरी चालेल, मी माझ्याच घरी मरायला तयार आहे,” अशा भावना नोशीन यांनी व्यक्त केल्या.
लोकांमध्ये संमिश्र भावना
13 जून रोजी, इस्रायलने अचानक हवाई युद्ध सुरू केले, ज्यामध्ये अणुउर्जा केंद्रांवर हल्ले झाले आणि लष्करी कमांडरसह, शेकडो लोक मारले गेले. 1980 मध्ये, इराकने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जाते. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी, “सत्ताबदल घडवून आणू शकणारे” असा या हल्ल्यांना उल्लेख केला.
तथापि, इस्लामिक प्रजासत्ताकविरोधात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून लोकांनी निदर्शने केल्याची, कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसली नाहीत.
पूर्वी सरकारविरोधात निदर्शने करणाऱ्या काही इराणी नागरिकांनी, रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, “या हल्ल्यांमुळे ‘परकीय आक्रमणाची’ तीव्रता लोकांना समजली असून, त्यांच्यामध्ये आता राष्ट्रभावना बळावली आहेत.
तरीही अनेक इराणी नागरिकांनी त्यांच्या देशाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे.
“हे आमच्यावरील अत्याचार आहेत, जे आम्हाला अजिबात मान्य नाहीत.. राजकीय अधिकारी सुरक्षित ठिकाणी लपून बसले आहेत, मग आम्ही सामान्य लोकांनी विनाकारण का मरायचे?” असा सवाल, ६३ वर्षीय मोहम्मद यांनी उपस्थित केला आहे.
“मी या देशाच्या धोरणकर्त्यांनाच जबाबदार धरतो. त्यांच्या निर्णयांमुळेच आपल्यावर युद्ध आणि विनाश ओढवले आहे,” असे त्यांनी फोनवरी संभाषणात सांगितले.
इस्रायलने सातत्याने, IRGC (Islamic Revolutionary Guard Corps) आणि अंतर्गत सुरक्षा संस्थांच्या नेत्यांना आणि ठिकाणांना लक्ष्य केले असून, इराणी राज्य प्रसारमाध्यमांनी शंभरहून अधिकजण हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाल्याची घोषणा केली आहे.
मंगळवारी, तेहरानच्या रस्त्यांवर काळ्या रंगातील सुरक्षा वाहने पाहायला मिळाली, ज्यामुळे सरकारविरोधी निदर्शने रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाईल, अशी भीती पसरली होती.
त्याच दिवशी शस्त्रसंधी उल्लंघनाच्या आरोपांमुळे युद्ध पुन्हा पेटू शकते, अशीही भीती निर्माण झाली होती.
“माझी अशी आशा आहे, की इस्रायल या शस्त्रसंधीचे नीट पालन करतील. इतिहास सांगतो की, त्यांनी यापूर्वी कधीही पूर्णत: शस्त्रसंधी मान्य केलेली नाही, पण तरीही यावेळी तरी त्यांनी ती पाळावी, कारण हे त्यांच्या आणि आपल्याही हिताचे आहे,” असे तेहरानमधील एका व्यक्तीने सांगितले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)