इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षादरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली मध्यस्थी फळास आली असून, दोन्ही देशांनी मंगळवारी हवाई हल्ले पूर्णत: थांबवले, ज्यामुळे त्यांच्यातील शस्त्रसंधी अजूनही टिकून असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.
सलग 12 दिवस चाललेल्या Israel-Iran संघर्षानंतर, दोन्ही बाजूंनी “विजय” मिळाल्याचा दावा केला. यामध्ये अमेरिका इस्रायलच्या बाजूने सहभागी झाली होती आणि त्यांनी इराणच्या युरेनियम समृद्धी केंद्रांवर हवाई हल्ले केले होते.
‘आशादायक’ चर्चा
मंगळवारी उशिरा, डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्यपूर्वेतील दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी सांगितले की, “अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा ‘आशादायक’ आहेत आणि दीर्घकालीन शांतता करार होईल अशी आशा वॉशिंग्टनला आहे.”
“आम्ही आधीच संवाद सुरू केला आहे, थेटही आणि मध्यस्थांद्वारेही. या संवादातून सकारात्मक संकेत मिळत आहेत. आम्हाला वाटते की, हे चर्चासत्र इराणसाठी पुनरुत्थान घडवून आणणारा एक दीर्घकालीन शांतता करार बनू शकते,” असे विटकॉफ यांनी फॉक्स न्यूजवरील The Ingraham Angle या कार्यक्रमात सांगितले.
“आता आम्हाला इराणी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन, व्यापक शांतता कराराच्या दिशेने वाटचाल सुरु करायची आहे आणि मला खात्री आहे की आम्ही ते साध्य करू,” असेही ते पुढे म्हणाले.
अण्वस्त्रांबाबतचे दावे वादग्रस्त
ट्रम्प यांनी आठवड्याच्या शेवटी सांगितले होते की, “अमेरिकेच्या स्टेल्थ बॉम्बर्सनी इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा नायनाट केला आहे.” मात्र, इराणने स्पष्ट केले की, त्यांचे युरेनियम समृद्धी कार्यक्रम हे पूर्णपणे नागरी उपयोगासाठीच आहेत.
तथापि, ट्रम्प यांचा दावा त्यांच्या प्रशासनातील गुप्तचर संस्थेच्या प्राथमिक अहवालाशी सुसंगत दिसत नव्हता, असे तीन वेगवेगळ्या सूत्रांनी सांगितले.
त्यापैकी एका सूत्राच्या म्हणण्यानुसार, “इराणचा समृद्ध युरेनियम साठा पूर्णत: संपवण्यात आलेला नाही आणि देशाचा अणु कार्यक्रम, ज्यापैकी बराचसा भाग जमिनीखाली खोलवर गाडला गेला आहे, तो या हल्ल्यांमुळे कदाचित फक्त एक किंवा दोन महिने मागे पडला असण्याची शक्यता आहे.”
व्हाइट हाऊसने मात्र, या गुप्तचर अहवालास “पूर्णपणे चुकीचा अहवाल” असे संबोधले आहे.
प्रवेशद्वारे बंद
डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी (DIA) ने तयार केलेल्या अहवालानुसार, हल्ल्यांमुळे दोन अणुउद्योग केंद्रांचे प्रवेशद्वारे बंद करण्यात आले आहे, पण जमिनीखालील संरचना अबाधित असल्याचे अहवालाशी परिचित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले.
वॉशिंग्टन पोस्टच्या माहितीनुसार काही सेंट्रीफ्यूज अजूनही कार्यरत आहेत.
अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितले की, “हवाई हल्ल्यांमुळे इराणचा अणु कार्यक्रम नक्कीच कमकुवत झाला आहे, मात्र ट्रम्प यांनी म्हटल्यानुसार त्याचा “संपूर्ण नायनाट” झालेला नाही”
दुसरीकडे, इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी मंगळवारी म्हटले: “आम्ही आमच्यावरील दोन तातडीचे अस्तित्व धोके दूर केले आहेत — एक म्हणजे अण्वस्त्र नाशाचा धोका आणि दुसरा म्हणजे 20 हजार क्षेपणास्त्रांनी होणाऱ्या संहाराचा धोका.”
इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनीही, हा “महान विजय” असल्याचे म्हटले असून, इराणने हे युद्ध यशस्वीरित्या संपवले असल्याचे इराणी प्रसारमाध्यमांनी सांगतिले आहे.
IRNA या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसारस, पेझेश्कियन यांनी सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांना देखील कळवले की, ‘तेहरान अमेरिकेसोबत मतभेद सोडवण्यास तयार आहे.’
इस्रायल-इराण संघर्ष
13 जून रोजी, इस्रायलने अचानक हवाई युद्ध सुरू केले, ज्यामध्ये अणुउर्जा केंद्रांवर हल्ले झाले आणि लष्करी कमांडरसह, शेकडो लोक मारले गेले. 1980 मध्ये, इराकने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे.
इराण, जे अण्वस्त्र तयार करत असल्याचे नाकारते, त्यांनी इस्रायली लष्करी केंद्रांवर आणि शहरांवर क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले.
नूरन्यूज या सरकारी संलग्न संस्थेने बुधवारी सांगितले की, इराणने या 12 दिवसांच्या संघर्षात इस्रायलशी संबंधित असल्याच्या आरोपाखाली 700 लोकांना अटक केली.
मिझान न्यूज एजन्सीनुसार, इराणने इस्रायलच्या मोसाद गुप्तहेर संस्थेसोबत सहकार्य केल्याबद्दल आणि एका हत्याकांडातील वापरासाठी उपकरणांची तस्करी केल्याबद्दल तीन जणांना फाशी दिली आहे.
सामान्य जीवन पुन्हा सुरू
इस्रायली लष्कराने, मंगळवारी सायंकाळी ८ वाजता (स्थानिक वेळेनुसार) देशभरातील विविध निर्बंध हटवल्याचे आणि तेल अवीवजवळील बेन गुरियन विमानतळ पुन्हा उघडल्याचे अधिकाऱ्यांनी जाहीर केले.
त्याचप्रमाणे, इराणच्या हवाई हद्दीही पुन्हा सुरू होणार असल्याचे नूरन्यूजने सांगितले.
बुधवारी, तेलाच्या किमती किंचित वाढल्या असून, मागील दोन दिवसांत झालेल्या घसरणीनंतर ही वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांनी शस्त्रसंधीची शाश्वती आणि ‘हॉर्मूझ’ सामुद्रधुनीवरील इराणी बंदीची शक्यता कमी असल्याने ही घसरण सावरली आहे.
या संघर्षविरामाची स्थिती काहीशी अस्थिर आहे, कारण दोन्ही देशांनी शस्त्रसंधी स्विकारल्याचे उशिरा मान्य केले असून, एकमेकांवर शस्रसंधीच्या उल्लंघनाचे आरोप केले आहेच.
ट्रम्प यांचे शांततेचे आवाहन
ट्रम्प यांनी याप्रकरणी दोन्ही देशांना फटकारले, मात्र विशेषत: इस्रायलला “शांत व्हा” असे आवाहन केले. त्यांच्या याच आदेशावरूनच इस्रायलने पुढील हल्ले थांबवल्याचे, ट्रम्प यांचे म्हणणे आहे.
इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल कात्झ, यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांना सांगितले की, “इराण जोपर्यंत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नाही, तोपर्यंत इस्रायलही त्याचे पालन करेल.” इराणचे अध्यक्ष पेझेश्कियन यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली.
इराण-इस्रायल संघर्षामध्ये, इराणमधील 610 लोकांचा मृत्यू झाला आणि 4,746 लोक जखमी झाले. तर, इराणच्या क्षेपणास्त्रांनी प्रथमच मोठ्या प्रमाणात इस्रायलच्या संरक्षण यंत्रणेला भेदले, ज्यामध्ये इस्रायलचे 28 लोक मरण पावले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)