तैवान या आपल्याच प्रदेशावर आक्रमण करणार नसल्याचा बीजिंगचा दावा

0

चीन आणि तैवानमधील तणाव पुन्हा एकदा वाढला कारण दोन्ही बाजूंनी ऐतिहासिक घटनांवरून वादाला सुरुवात झाली आहे. तैवान सरकार चीनच्या विरोधात चिथावणीखोर कृती करत असल्याचा बीजिंगचा आरोप आहे. चीनने असा दावा केला की ते आधीच आपल्या देशाचाच भूभाग मानत असलेल्या जमिनीवर म्हणजेच तैवानवर “आक्रमण” करू शकत नाही.चीन लोकशाही पद्धतीने शासित तैवानला स्वतःचा प्रदेश मानतो आणि गेल्या पाच वर्षांत त्याने तैवानवरील लष्करी आणि राजकीय दबाव वाढवला आहे. चीनला तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते यांचा विशेष तिरस्कार आहे, ते त्यांना “अलिप्ततावादी” संबोधतात.

लाई यांनी रविवारपासून “देशाची एकजूट करणे” या विषयावर 10 भाषणांच्या मालिकेत दोन भाषणे दिली आहेत. या भाषणांमध्ये त्यांनी तैवान हा “अर्थातच एक स्वतंत्र देश” आहे आणि चीनला त्यावर दावा करण्याचा कोणताही कायदेशीर किंवा ऐतिहासिक अधिकार नसल्याचा वारंवार खुलासा केला आहे.

बुधवारी बीजिंगमध्ये नियमित पत्रकार परिषदेत बोलताना, तैवान व्यवहार कार्यालयाचे प्रवक्त्या झू फेंगलियान म्हणाल्या की, लाई आणि त्यांच्या प्रशासनाकडून व्यक्त होणाऱ्या कोणत्याही “स्वातंत्र्यासाठीच्या  चिथावणीला” “दृढ प्रतिकार” करावा लागेल.

“तैवान सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजू अद्याप पूर्णपणे एकत्र आलेल्या नसल्या तरी, दोन्ही बाजूंचे देशबांधव एकाच भूमीचे  आहेत आणि दोन्ही बाजूंचे देशबांधव चिनी आहेत ही ऐतिहासिक आणि कायदेशीर वस्तुस्थिती कधीही बदललेली नाही,” असे प्रतिपादन त्यांनी केले.

चीन आणि तैवानमधील तणाव, ज्यामध्ये चिनी युद्ध सरावांच्या अनेक फेऱ्यांचा समावेश आहे, यामुळे अशी शक्यता निर्माण झाली आहे की बीजिंग एके दिवशी तैवानला बळजबरीने ताब्यात घेण्याच्या धमक्या देऊ शकते ज्यामुळे प्रादेशिक युद्ध पेटू शकते.

युद्ध सराव

चीनचा शेवटचा युद्ध सराव एप्रिलमध्ये झाला होता आणि त्यांचे हवाई दल आणि नौदल दररोज तैवानभोवती घिरट्या घालत असतात, कधीकधी त्यात डझनभर युद्धविमानांचा केला जाणारा वापर याचीही भर पडते, असे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

हल्ल्याची तयारी मजबूत करण्यासाठी चिनी सरावांबद्दल अमेरिकेच्या टीकेबाबत विचारले असता, झू यांनी पत्रकाराला उत्तर देताना त्यात दुरुस्ती केली

“तैवान हा चीनचा एक भाग आहे; तिथे कोणतेही आक्रमण नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तैवानच्या स्थिती आणि भविष्याबद्दल लाई यांचे वेगळे मत आहे.

मंगळवारी रात्री उशिरा दिलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की तैवानचे भविष्य केवळ इथले नागरिकच ठरवू शकतात, लोकशाही पद्धतीने, कोणत्याही पक्षाच्या किंवा राष्ट्रपतीच्या निर्णयाने नाही आणि “तैवान स्वातंत्र्य” म्हणजे आपला देश पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा भाग नसणे.

शेवटच्या सम्राटाला पदच्युत करणाऱ्या 1911 च्या क्रांतीनंतर स्थापन झालेले पराभूत चीन प्रजासत्ताक, माओ झेडोंग यांच्या कम्युनिस्टांकडून गृहयुद्धात पराभव झाल्यानंतर 1949 मध्ये तैवानला पळून गेले आणि तेच बेटाचे औपचारिक नाव राहिले.

“चीन प्रजासत्ताक किती जुने आहे? ते 113 वर्षे जुने आहे आणि या वर्षी 114 वर्षे जुने होईल. पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना? ते फक्त 70 वर्षे जुने आहे, बरोबर? हे सोपे आणि स्पष्ट आहे,” लाई म्हणाले.

या वर्षी दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीचा 80वा वर्धापन दिन हा आणखी एक संवेदनशील विषय आहे आणि चीनने सप्टेंबरच्या सुरुवातीला बीजिंगमध्ये होणाऱ्या लष्करी परेडसाठी चीन प्रजासत्ताकासाठी लढणाऱ्या काही जुन्या सैनिकांना आमंत्रित केले आहे.

या सैनिकांनी चीनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे तैवानला वाटत नाही. बुधवारी त्यांचे संरक्षण मंत्री वेलिंग्टन कू यांनी सांगितले की बीजिंग इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.

“या युद्धाचे नेतृत्व आणि मिळालेला विजय चीन प्रजासत्ताकाचे होते, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे नाही – हे निःसंशय आहे,” असे त्यांनी संसदेत पत्रकारांना सांगितले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleदोन्ही बाजूंनी हवाई हल्ले थांबल्याने, Israel-Iran शस्त्रसंधी अद्याप टिकून आहे
Next articleUK To Buy Fighter Jets Capable Of Carrying Tactical Nuclear Weapons

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here