अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत-मंगोलिया संयुक्त लष्करी सराव – ‘नोमॅडिक एलिफंट’ च्या 17 व्या आवृत्तीला 31 मे पासून मंगोलियाची राजधानी उलानबाटर येथे सुरुवात होईल. हा सराव 13 जूनपर्यंत चालणार आहे.
भारतीय लष्कराने, X वरील निवेदनात म्हटले आहे की: “इंडियन आर्मी आणि मंगोलियन आर्मी यांच्यातील संयुक्त लष्करी सराव #NomadicElephant 2025 ची 17 वी आवृत्ती, 31 मे ते 13 जून 2025 दरम्यान Ulaanbaatar, Mongolia येथे आयोजित करण्यात आली आहे.”
सरावाचा उद्देश
भारतीय लष्कराच्या निवेदनानुसार, या सरावाचा उद्देश अर्ध-शहरी/डोंगराळ भागात संयुक्त राष्ट्रांच्या अधिपत्याखाली नसलेल्या लष्करी मोहिमांमध्ये, दोन्ही देशांच्या लष्करांमधील सुसंवाद (interoperability) वाढवणे, हा आहे.
“या सरावामुळे द्विपक्षीय लष्करी सहकार्य अधिक मजबूत होईल, संयुक्त कार्यपद्धतींना बळकटी मिळेल आणि भारतीय लष्कर आणि मंगोलियन लष्कर यांच्यातील सौहार्द वृद्धिंगत होईल,” असेही या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
भारत-मंगोलिया हितसंबंध
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, यांच्या 5 ते 7 सप्टेंबर 2022, या कालावधीत झालेल्या मंगोलिया दौऱ्यात संरक्षण सहकार्याला मोठी चालना मिळाला.
“मंगोलियाचे राष्ट्रपती आणि MAF चे सर्वोच्च कमांडर यू. खुरेलसुख, संसदाध्यक्ष आणि मंगोलियाचे संरक्षणमंत्री जनरल साईखानबायर यांनी दिलेल्या असामान्य आत्मीयतेमुळे भारताच्या मंगोलियासाठीच्या धोरणात्मक महत्त्वाची पुष्टी झाली,” असे भारतीय दूतावासाच्या संकेतस्थळावर नमूद आहे.
संरक्षणमंत्र्यांनी यावेळी, दोन ALS भारतीय बनावटीच्या रुग्णवाहिका आणि 200 विशेष हिवाळी पोशाख भेट देण्याची तसेच गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या ITEC कार्यक्रमांतर्गत मंगोलियन लष्करासाठी संरक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रमांची घोषणा केली होती. सध्या या कोर्ससाठी दरवर्षी सुमारे 18-29 जागा दिल्या जातात. मंगोलियाच्या संरक्षण मंत्रालयाने ही घोषणा सकारात्मकपणे स्विकारली.
रजिनाथ सिंह यांच्या दौऱ्यानंतर लगेचच, ऑक्टोबर 2022 मध्ये मंगोलियाचे संरक्षण मंत्री जनरल साईखानबायर भारतात आले. त्यांनी आपल्या तीन सदस्यीय उच्चस्तरीय शिष्टमंडळासह गांधीनगर येथे पार पडलेल्या, डिफएक्स्पो 2022 मध्ये भाग घेतला आणि भारतीय संरक्षण मंत्र्यांशी द्विपक्षीय बैठक घेतली. त्यांनी भारताच्या उपराष्ट्रपतींचीही भेट घेतली.
भारतीय संरक्षण क्षमतांवर प्रभावित होत, मंगोलियाच्या संरक्षण मंत्र्यांनी मंगोलियामध्ये लघु शस्त्रास्त्रांचे दारुगोळा निर्माण करणाऱ्या कारखान्याची उभारणी करण्याची, MAF साठी हलकी बख्तरबंद वाहने खरेदी करण्याची आणि MAF च्या गणवेशासाठी साहित्य खरेदी करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. यासाठी प्राध्यापक उल्झीट लुव्सांजव यांना, DDP सोबत समन्वय साधण्याची जबाबदारी देण्यात आली.
याआधी मार्च 2018 मध्ये, मंगोलियाचे तत्कालीन संरक्षण मंत्री एन. एनखबोल्ड यांनी भारताला भेट दिली होती. त्यांनी त्यावेळी उपरक्षण मंत्री, संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि लष्करप्रमुख यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली होती.
भारत-मंगोलिया दरम्यान दरवर्षी बैठक घेणारा संयुक्त कार्यगट (JWG) देखील संरक्षण सहकार्यासाठी कार्यरत आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)