इराणमध्ये गेलेल्या तीन भारतीय नागरिकांचा संपर्क सध्या पूर्णपणे तुटला आहे, अशी माहिती तेहरानमधील भारतीय दूतावासाने दिली आहे.
दूतावासाने म्हटले की, ‘या नागरिकांचा तातडीने शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’
“इराणमधून बेपत्ता झालेल्या तिनही नागरिकांच्या नातेवाईकांनी, तेहरानच्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधत, आपला त्यांच्यासोबतचा संपर्क तुटल्याची खबर दिली,” असे दूतावासाच्या निवेदनात म्हटले आहे.
“दूतावासाने ही बाब इराणी अधिकाऱ्यांकडे गांभीर्याने मांडली असून, या नागरिकांचा त्वरित शोध घेऊन त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे,” असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
दूतावासाने सांगितल्यानुसार, संबंधित भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांना शोधकार्याची नियमित माहिती दिली जात आहे.
हरवलेले तिघेही पंजाबमधील
मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या तिनही भारतीय नागरिक पंजाब राज्यातील आहेत.
त्यांची नावे हुषणप्रीत सिंग (संगरूर), जसपाल सिंग (एसबीएस नगर) आणि अमृतपाल सिंग (होशियारपूर) अशी आहेत.
हे तिघेही 1 मे रोजी, इराणच्या तेहरानमध्ये पोहोचले आणि त्यानंतर बेपत्ता झाले, असे सांगितले जात आहे.
मीडिया अहवालांनुसार, पंजाबमधील एका एजंटने त्यांना दुबई-ईराण मार्गे ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचे आश्वासन दिले होते.
कुटुंबीयांचा ‘अपहरणाचा’ आरोप
बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, “संबंधित व्यक्तींना त्यांची इराणमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल असे सांगण्यात आले होते, मात्र ते शहरात पोहोचताच त्यांचे अपहरण करण्यात आले आणि आता अपहरणकर्त्यांनी त्यांची सुटका करण्यासाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे.”
“अपहरणकर्त्यांनी पीडितांचे पिवळ्या दोऱ्यांनी हात बांधलेला आणि त्यांच्या हातातून रक्त सांडत असलेला व्हिडिओ पाठवला,” असे कुटुंबियांकडून माध्यमांना सांगण्यात आले.
अपहरणकर्त्यांनी धमकी दिली आहे की, ‘खंडणी न दिल्यास त्या तिघांना ठार केले जाईल.’
कुटुंबीयांनी सांगितले की, “सुरुवातीला हे तिघे अपहरणकर्त्यांसोबत फोनवरून संपर्कात होते. मात्र 11 मे पासून त्यांचा संपर्क पूर्णतः तुटला आहे.
या तिघांना इराणला पाठवणारा होशियारपूरमधील एजंट सध्या बेपत्ता आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)