
अमेरिकेचे अंतराळवीर बुच विलमोर आणि सुनिता विल्यम्स, बोइंगच्या नुकसानग्रस्त स्टारलाइनर कॅप्सुलमुळे गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकले होते. ते मार्चमध्ये पृथ्वीवर परतले आणि काही आठवड्यांच्या फिजिकल थेरपीनंतर आता ते पुन्हा बोइंग आणि नासाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हायला सज्ज आहेत.
बुधवारी, ६२ वर्षीय विलमोर यांनी रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “सध्या आम्ही आमच्या पुनर्वसनाच्या टप्प्यातून नुकतेच बाहेर आलो आहोत. गुरुत्वाकर्षण काही काळासाठी त्रासदायक असते आणि तो काळ वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा असतो, पण शेवटी तुम्ही त्या न्यूरोव्हेस्टिब्युलर समतोलाच्या समस्या पार करता आणि पुन्हा नॉर्मल होण्याकडे प्रवास सुरु करता.”
8 दिवसांचे उड्डाण बनले, 9 महिन्यांचा मुक्काम
विलमोर आणि विल्यम्स यांनी गेल्यावर्षी, स्टारलाइनरच्या 8 दिवसांच्या चाचणी उड्डाणासाठी सुरुवात केली होती, पण ते उड्डाण तब्बल 9 महिन्यांच्या अंतराळ मुक्कामात बदलले. पृथ्वीवर परत आल्यानंतर, त्यांनी त्यांच्या स्नायूंना, समतोलाच्या जाणीवेला आणि अन्य मूलभूत क्षमतांना 45 दिवसांच्या कालावधीत पुन्हा जुळवून घेतले. साधारणत: हा कालावधी लांब मुदतीच्या अंतराळ प्रवासानंतरच्या पुनर्वसनासाठी निश्चीत केलेला असते.
या दोन्ही अंतराळवीरांनी, दररोज किमान दोन तास नासाच्या वैद्यकीय विभागातील स्ट्रेंथ आणि रिकंडिशनिंग अधिकाऱ्यांसोबत घालवले. त्याचवेळी, बोइंगच्या स्टारलाइनर कार्यक्रमासोबत, नासाच्या ह्युस्टनमधील अंतराळ स्थानक विभागात आणि एजन्सीच्या संशोधकांबरोबर त्यांनी वाढती जबाबदारी सांभाळली.
“मी परत आले!”
“ही सगळी प्रक्रिया थोडी झपाटल्यासारखी वाटली, कारण आम्हाला आमच्यासोबत काम करणाऱ्या सर्व लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या होत्या,” असे मत ५९ वर्षीय सुनिता विल्यम्स यांनी व्यक्त केले.
विल्यम्स म्हणाल्या की, “अंतराळ प्रवासानंतरचे काही परिणाम दूर होण्यास वेळ लागला आणि पुनर्प्राप्तीच्या शेवटच्या टप्प्यात थकलेल्यासारखे वाटत होते, कारण शरीरातील अनेक स्नायू पुन्हा सक्रिय होत होते. त्यामुळे मी सकाळी लवकर उठू शकत नव्हते, जे खरे तर त्यांना आवडते, पण ही अवस्था तात्पुरत्या काळासाठीच होती.”
“अखेर जेव्हा मी सकाळी चार वाजता उठले तेव्हा मला वाटले की, आहा! मी परत आले,” असे त्या म्हणाल्या.
मानदुखीचा त्रास
विलमोर म्हणाले की, “अंतराळात जाण्यापूर्वी त्यांना मान आणि पाठीत थोडा त्रास होता, ज्यामुळे ते मान पूर्णपणे वळवू शकत नव्हते. पण अंतराळात, जिथे शरीरावर कोणताही ताण राहत नाही, तिथे त्यांचा तो त्रास नाहीसा झाला.”
“मार्चमध्ये परतल्यावर, गुरुत्वाकर्षणाने मला तीच मानदुखी पुन्हा दिली,” ते हसत म्हणाले. “आम्ही अजूनही समुद्रात कॅप्सूलमध्ये तरंगत होतो आणि माझी मान दुखायला लागली होती, तेव्हा आम्हाला बाहेरही काढलेले नव्हते,” असे ते म्हणाले.
“माणसाचे शरीर लाखो वर्षांत पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात विकसित झाले आहे आणि त्यामुळे ते अंतराळ प्रवासासाठी सुसंगत नाही. गुरुत्वाकर्षणाच्या अनुपस्थितीत अनेक शारीरिक परिणाम होतात, जसे की स्नायू सुकणे, रक्ताभिसरणात बदल, ज्यामुळे इतर आरोग्य समस्यांची साखळी सुरू होते. लहान जागेत confinement आणि पृथ्वीच्या वातावरणाच्या अभावामुळे होणारी सूर्यप्रकाशातील किरणोत्सर्गाची तीव्रता हे देखील शरीरावर प्रभाव टाकतात.
स्टारलाइनरची अडचण
बोइंगच्या स्टारलाइनरच्या प्रणोदन प्रणालीतील अडचणींमुळे, NASA ने कॅप्सूल मागील वर्षी क्रूशिवाय परत आणले आणि या दोन्ही अंतराळवीरांना ISS वरील नेहमीच्या दीर्घकालीन शेड्यूलमध्ये समाविष्ट केले.
स्टारलाइनरच्या विकासात बोइंगने, सुमारे $2 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन केले आहे. आता नासाकडून निर्णय अपेक्षित आहे की, ही कॅप्सूल पुन्हा एकदा मानवी क्रूविना स्वतंत्रपणे चाचणीसाठी पाठवायची की नाही. याआधी, 2019 मधील अपयशानंतर, 2022 मध्ये अशाच प्रकारची क्रू-विरहीत कॅप्सूल $410 दशलक्ष खर्चून पाठवण्यात आली होती.
“तसे करणेच योग्य”
“स्टारलाइनर पुन्हा क्रूशिवाय पाठवणे हेच योग्य वाटते,” असे विल्यम्स म्हणाल्या. त्यांनी यावेळी स्पेसएक्स आणि रशियन कॅप्सूल्सच्या मिशन्सचा संदर्भ दिला, ज्यांनी आधी क्रूशिवाय उड्डाण केले आहे.
“मला वाटते हाच योग्य मार्ग आहे आणि मी आशा करते की बोइंग आणि नासा लवकरच यावर निर्णय घेतील,” असे विल्यम्स म्हणाल्या.
“स्टारलाइनरच्या पुढील चाचण्यांचे निकाल ठरवतील, की ही कॅप्सूल पुढच्या उड्डाणात माणसांना घेऊन जाऊ शकते की नाही,” असे नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)