
शांघाय सहकार्य संघटनेच्या (SCO) संरक्षण मंत्र्यांची चीनमध्ये पार पडलेली बैठक, संयुक्त निवेदनावर एकमत न झाल्यामुळे निष्फळ ठरल्याची माहिती, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी दिली.
SCO ही 10 देशांची मिळून युरेशियन सुरक्षा आणि राजकीय संघटना आहे. यामध्ये चीन, रशिया, भारत, पाकिस्तान आणि इराण यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्र्यांची ही बैठक, या वर्षीच्या शरद ऋतूमध्ये होणाऱ्या वार्षिक नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती.
सदस्य देशांमध्ये मतभेद
“काही सदस्य देश काही मुद्द्यांवर एकमताने निर्णय घेऊ शकले नाहीत, त्यामुळे दस्तऐवज अंतिम स्वरुपात स्विकारला गेला नाही,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी साप्ताहिक पत्रकार परिषदेत सांगितले.
“भारताला दहशतवादाशी संबंधित चिंतेचा उल्लेख दस्तऐवजामध्ये असावा असे वाटत होते, परंतु एका विशिष्ट देशाला तो स्विकारार्ह नव्हता. त्यामुळे संयुक्त निवेदन स्विकारले गेले नाही,” असे जैस्वाल यांनी त्या देशाचे नाव न घेता स्पष्ट केले.
भारताचा आक्षेप
भारतीय वृत्त-माध्यमांनुसार, भारताने दस्तऐवजावर सही करण्यास नकार दिला कारण, त्यामध्ये 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख नव्हता, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता.
भारताने या हल्ल्याबद्दल पाकिस्तानला दोषी धरले होते, परंतु इस्लामाबादने हा आरोप फेटाळला होता. या जीवघेण्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमध्ये दशकांतील सर्वात तीव्र संघर्ष झाला. भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (PoK) दहशतवादी तळांवर कारवाई केली होती.
पाकिस्तानने मात्र या ठिकाणांचा दहशतवादाशी काहीही संबंध नसल्याचे सांगत, त्या सर्वसामान्य नागरी सुविधा असल्याचा दावा केला.
पाकिस्तान व चीनचा प्रतिसाद नाही
भारताच्या या विधानावर, चीन व पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नव्हती.
याआधी गुरुवारी, जेव्हा पत्रकारांनी संयुक्त निवेदनाबद्दल विचारले, तेव्हा चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने, “बैठकीत यशस्वी परिणाम मिळाले” असे सांगितले, मात्र त्याबाबत अधिक माहिती दिली नाही.
मे महिन्यात झालेल्या संघर्षानंतर, भारत आणि पाकिस्तानच्या वरिष्ठ मंत्र्यांनी एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ होती.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)