इराण आणि इस्रायलदरम्यान गेल्या काही आठवड्यांत वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, तिथे अडकलेल्या 4,200 हून अधिक नागरिकांना परत आणत, भारताने ‘Operation Sindhu’ अंतर्गत आपले अंतिम बचावकार्य यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.
हे मिशन पूर्ण झाल्याचे, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) गुरुवारी अधिकृतपणे जाहीर केले. मंत्रालयाने सांगितले की, ‘ही बचाव मोहीम अलीकडच्या काळातील भारताची सर्वात गुंतागुंतीची आणि राजनैतिक समन्वय साधणारी बचाव मोहीम ठरली आहे.’
ही बचाव मोहीम, पश्चिम आशियातील विविध शहरांमधून 18 विशेष उड्डाणांच्या माध्यमातून पार पाडली गेली. यामध्ये इराण, आर्मेनिया, तुर्कमेनिस्तान, जॉर्डन आणि इजिप्त यांचा मोलाचा सहभाग होता.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रंधीर जैस्वाल यांनी, साप्ताहिक पत्रकार परिषदेत StratNewsGlobal च्या प्रश्नाला उत्तर देताना, बचाव कार्यातील अंतिम आकडेवारी सादर केली. “आम्ही आतापर्यंत इराणमधून 3,426 भारतीय नागरिक, 11 OCI कार्डधारक, 9 नेपाळी नागरिक, 4 श्रीलंकन नागरिक आणि 1 भारतीय नागरिकाचा इराणी जोडीदार या सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे,” असे त्यांनी सांगितले.
या महिन्याच्या सुरुवातीस इराणच्या हवाई हद्दीवर निर्बंध होते, त्यामुळे मषहद (इराण), येरेवन (आर्मेनिया) आणि अश्गाबात (तुर्कमेनिस्तान) येथे बाहेर पडण्याचे पर्यायी मार्ग तयार करण्यात आले. 20 जून रोजी, इराणने हवाई निर्बंध उठविल्यानंतर, याच मार्गांवरून 14 चार्टर्ड फ्लाइट्सच्या माध्यमातून आपत्कालीन उड्डाणे सुरू झाली.
इराणमधून बाहेर काढलेल्यांमध्ये विद्यार्थी, यात्रेकरू, कामगार आणि दक्षिण इराणमध्ये अडकलेले तामिळनाडूचे 50 मच्छीमार यांचा समावेश होता. क्षेपणास्त्र हल्ल्यांचा धोका आणि प्रादेशिक अस्थिरता यामुळे त्यांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक होते.
“इराण, आर्मेनिया आणि तुर्कमेनिस्तान सरकारांनी हवाई परवानग्या आणि लॉजिस्टिक समर्थन पुरविणे ही आमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बाब होती,” असे जैस्वाल यांनी सांगितले.
भारताने इस्रायलमधूनही बचाव मोहीम राबवली, ज्याअंतर्गत 818 भारतीय नागरिकांना सुरक्षित आणले गेले. यामध्ये विद्यार्थी, व्यावसायिक आणि केअरगिव्हर्स यांचा समावेश होता. त्यांना प्रथम जॉर्डन आणि इजिप्तमार्गे स्थलांतरित करून नंतर चार विशेष उड्डाणांद्वारे भारतात आणण्यात आले.
भारतीय वायुदलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाने, या मोहिमेत एक महत्त्वाची भूमिका पार पाडली. या विमानाने जॉर्डनमधून 400 हून अधिक लोकांना मायदेशी परत आणले. तसेच अमानहून 161 भारतीय नागरिकांना आणणाऱ्या चार्टर्ड फ्लाइटसाठीही इस्रायलमधून आवश्यक समन्वय साधला गेला.
‘ऑपरेशन सिंधू’ ही मोहीम, इराण-इस्रायल यांच्यातील लष्करी संघर्ष तीव्र झाल्यावर सुरू करण्यात आली होती. या संघर्षाची सुरुवात, इस्रायलने इराणच्या अणु व लष्करी पायाभूत सुविधांवर केलेल्या हल्ल्यांपासून झाली. त्यानंतर इराणने क्षेपणास्त्र हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले आणि आपले आकाश क्षेत्र काही काळासाठी बंद केले. यानंतर युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीमुळे एक नाजूक शस्त्रसंधी झाली, ज्यामुळे बचाव मोहिमेच्या अंतिम टप्प्याला गती मिळाली.
भारतीय बचाव उड्डाणांपैकी पहिले विमान, गेल्या शुक्रवारी 290 प्रवाशांना घेऊन नवी दिल्लीमध्ये उतरले. त्यानंतरच्या उड्डाणांनी शनिवार-रविवारी आणि या आठवड्यात बाकी नागरिकांना मायदेशी परत आणले.
या संपूर्ण मोहिमेत, कोणतेही विदेशी लष्करी विमान वापरले गेले नाही. मात्र इराण, जॉर्डन आणि इजिप्तसह अनेक देशांबरोबर प्रबळ क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय समन्वय साधल्यामुळेच भारत या मोहिमेत यशस्वी ठरला.
भारताने नेपाळ आणि श्रीलंकेच्या विनंतीवरून त्यांच्या काही नागरिकांनाही सुरक्षित बाहेर काढले.
या मोहिमेचा समारोप झाल्याचे जाहीर करताना जैस्वाल यांनी सांगितले की, “जर शस्त्रसंधी संपुष्टात आली किंवा आमच्याकडे बचावासाठीच्या नवीन विनंती आल्या, तर पुढील उड्डाणांचा विचार केला जाईल.”
‘Operation Sindhu’ ही मोहीम, भारताच्या आजवरच्या रेस्क्यू ऑपरेशन्सच्या यादीत आणखी एक मैलाचा दगड ठरली आहे. यामध्ये लॉजिस्टिक नियोजन व राजकीय समन्वय यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो, जो अशांत प्रदेशांमधील भारताच्या वाढत्या भूमिकेचे प्रतीक आहे.
by- Huma Siddiqui