इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी सांगितले की, ‘इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाच्या निकालामुळे शांततेच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत, ज्या देशाने अवश्य साध्य करायला हव्यात.
नेतान्याहू यांनी एका निवेदनात म्हटले की: “या विजयामुळे शांतता करारांचा व्यापक विस्तार करण्याची संधी निर्माण झाली आहे. आम्ही या संधीचा लाभ घेण्यासाठी उत्साहाने काम करत आहोत.”
“बंधकांची सुटका आणि हमासचा पराभव यासोबत, एक अशी संधी उपलब्ध झाली आहे जी गमवून चालणार नाही. आपण एकही दिवस वाया घालवू शकत नाही.”
आदल्या दिवशी, इस्रायलच्या हायोम वृत्तपत्राने एका अज्ञात सूत्राचा हवाला देत सांगितले की, ‘नेतन्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवड्यात फोनवरून गाझामधील युद्ध लवकरात लवकर संपवण्यावर सहमती दर्शवली आहे, कदाचित पुढील दोन आठवड्यांत.’
हायोम वृत्तपत्रानुसार, या करारामुळे इस्रायलच्या अरब शेजाऱ्यांसोबतच्या अब्राहम करारांचा विस्तार होऊन, त्यात सौदी अरेबिया आणि सीरियाचा समावेश होऊ शकतो.
या करारानुसार, इस्रायल भविष्यातील दोन राष्ट्रांच्या उपायावर सहमती दर्शवेल, पण त्यासाठी पॅलेस्टिनी अथॉरिटीमध्ये सुधारणा करणे आवश्यक असेल.
पंतप्रधान कार्यालयाने इस्रायल हायोमच्या अहवालावर कोणतीही टिप्पणी केली नाही. व्हाईट हाऊसनेही त्वरित प्रतिसाद दिला नाही.
अमेरिकेच्या मध्यस्थीने झालेल्या इस्रायल-इराण शस्त्रसंधीने पॅलेस्टिनियन लोकांमध्ये आशा निर्माण केली आहे की, गेल्या 20 महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेले गाझामधील युद्ध लवकरच संपेल. हे युद्ध गाझा भागात मोठ्या प्रमाणावर विध्वंस घडवून आणणारे ठरले असून बहुतेक रहिवाशांना स्थलांतर करावे लागले आहे. कुपोषणही सामान्य झाले आहे.
इस्रायल-हमास संघर्ष
हे युद्ध 7 ऑक्टोबर 2023 रोजी, हमास या पॅलेस्टिनियन कट्टरपंथी गटाने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याने सुरू झाले, ज्यामध्ये अनेक बंधक पकडले गेले. यापैकी 50 जण अजूनही गाझामध्ये आहेत आणि त्यामधील फक्त 20 जण जिवंत असल्याचा विश्वास आहे.
इस्रायलमधील उजव्या विचारसरणीचे कॅबिनेट मंत्री- इतामार बेन-गव्हीर आणि बेझालेल स्मोट्रिच यांनी, गाझाचा कायमस्वरूपी ताबा घेण्याची आणि 2005 मध्ये इस्रायलने जेथे वसाहती सोडल्या, त्या पुन्हा स्थापन करण्याची मागणी केली आहे, ही कल्पना नेटन्याहूंनी फेटाळली आहे.
गुरुवारी स्मोट्रिच यांनी एका निवेदनात म्हटले की: “माननीय पंतप्रधान, हे स्पष्ट असावे: तुमच्याकडे असा कोणताही अधिकार नाही, ना लेखी ना तोंडी. जर काही देशांना शांततेच्या बदल्यात फक्त शांतता हवी असेल तर त्यांचे स्वागत आहे, पण जर त्यांना पॅलेस्टिनियन राष्ट्र हवे असेल, तर त्यांनी ती कल्पना विसरावी, तसे होणे शक्य नाही.”
रविवारी नेतान्याहू यांनी सांगितले की, “इराण आता कमकुवत झाला आहे आणि त्यामुळे आणखी देश अब्राहम करारात सामील होतील अशी त्यांना अपेक्षा आहे.”
“आम्ही ‘अॅक्सिस’ (अधिकार रेषा) मोडून टाकली आहे,” असे नेतान्याहू यांनी पत्रकारांना सांगितले. “ही एक प्रचंड मोठी बदलाची वेळ आहे आणि यामुळे इस्रायलचा दर्जा फक्त मध्यपूर्वेतच नव्हे तर संपूर्ण जगात उंचावला आहे. ही एक हादरवून टाकणारी घटना आहे.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)