भारत आणि ब्रिटनमध्ये LMM सह, £600 दशलक्ष किमतीचे संरक्षण करार

0

युनायटेड किंग्डम आणि भारताने त्यांच्या धोरणात्मक भागीदारीमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, संरक्षण आणि सुरक्षा विषयक अनेक प्रमुख करारांची घोषणा केली आहे. £600 दशलक्ष पेक्षा जास्त किमतीच्या (अंदाजे ₹7,120 कोटी रुपये) या करारांमध्ये प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली, नौदल प्रणोदन तंत्रज्ञान, लष्करी प्रशिक्षण आणि प्रादेशिक सागरी सहकार्याचा समावेश आहे.

यापैकी £350 दशलक्ष (4,154 कोटी रुपये) किमतीच्या एका करारानुसार, भारतीय सैन्याला ब्रिटीश बनावटीची हवाई संरक्षण क्षेपणास्त्रे आणि लाँचर्सचा पुरवठा केला जाईल. यामध्ये बेलफास्टमध्ये उत्पादित केलेले ‘लाइटवेट मल्टीरोल क्षेपणास्त्र (LMMs)’, ज्याला मार्लेट क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते त्याचा प्रामुख्याने समावेश असेल, जे भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत वाढ करेल आणि यामुळे ब्रिटनमध्ये 700 हून अधिक कुशल नोकऱ्यांना पाठिंबा मिळेल. हा करार दोन्ही देशांमध्ये सध्या चर्चेत असलेल्या, व्यापक जटिल शस्त्र भागीदारीला अधोरेखित करतो. हे LMMs क्षेपणास्त्र 2019 पासून ब्रिटीश सैन्याच्या सेवेत आहे, जे युक्रेनियन सशस्त्र दलांकडून रशियन सैन्याविरुद्ध देखील वापरले जात आहेत.

समांतर पातळीवर, £250 दशलक्ष मूल्याचा एक वेगळा उपक्रम यूके-भारत संरक्षण औद्योगिक सहकार्यात भर घालत आहे, ज्यामध्ये भारतीय नौदल जहाजांसाठी वीजेवर चालणाऱ्या प्रणोदन प्रणालींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा संयुक्त कार्यक्रम भारताच्या नौदल आधुनिकीकरणाच्या उद्दिष्टांना पाठिंबा देतो आणि सागरी संरक्षण तंत्रज्ञानातील नावीन्यता आणि शाश्वततेसाठी दोन्ही देशांची सामायिक वचनबद्धता प्रतिबिंबित करतो.

वाढत्या धोरणात्मक भागीदारीवरील नेत्यांचा भर

“हे करार म्हणजे, लंडन आणि नवी दिल्ली यांच्यातील विस्तारीत भागीदारीचे शक्तिशाली प्रतीक आहेत,” असे ब्रिटनचे पंतप्रधान किअर स्टारमर यांनी त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान सांगितले. ते म्हणाले की, “आम्ही संरक्षण, तंत्रज्ञान आणि प्रादेशिक सुरक्षेसाठी भारतासोबत सखोल सहकार्य करण्यास वचनबद्ध आहोत. हे करार स्थिर इंडो-पॅसिफिकमधील आमची सामायिक मूल्ये आणि परस्पर हितसंबंध प्रतिबिंबित करतात.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय संरक्षण संबंधांच्या वाढत्या सहकर्यांची नोंद घेत, या प्रगतीचे स्वागत केले. “आम्ही सह-उत्पादन आणि संरक्षण उद्योगांमधील आमच्या मजबूत संबंधांकडे वाटचाल करत आहोत. हे करार उच्च पातळीवरील विश्वास आणि संरेखनाचे प्रतीक आहेत,” असे मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

लष्करी सहकार्य आणि प्रशिक्षणाचे मजबूतीकरण

औद्योगिक सहकार्याबरोबरच, भारत आणि ब्रिटन यांच्यातील लष्करी सहकार्य अधिक बळकट करण्यावरही भर दिला जात आहे. एका नव्या व्यवस्थेमुळे, भारतीय हवाई दलाचे प्रशिक्षक आता ब्रिटनच्या रॉयल एअर फोर्सच्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील. यामुळे दोन्ही दलांमधील व्यावसायिक आदान-प्रदान आणि संचालनात्मक समज अधिक दृढ होईल.

दोन्ही देशांनी यावेळी, संयुक्त लष्करी सराव नियमितपणे घेण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुन:पुष्टी केली. यामध्ये कोकण सरावासह, अजेय वॉरिअर, कोब्रा वॉरिअर आणि तरंग शक्ती यांचा समावेश आहे.

याशिवाय, संरक्षण क्षेत्रातील शिक्षण, तंत्रज्ञान सहकार्य आणि तज्ज्ञांमधील आदान-प्रदान वाढवण्याचे नियोजनही करण्यात आले आहे.

इंडो-पॅसिफिक आणि सागरी सुरक्षा

दोन्ही देशांनी व्यापक प्रादेशिक रणनीतीचा भाग म्हणून,  इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचे वचन दिले आहे. सामायिक सागरी हितसंबंधांना समर्थन देण्यासाठी आणि संपूर्ण प्रदेशात माहितीची देवाणघेवाण वाढविण्यासाठी, एक नवीन प्रादेशिक सागरी सुरक्षा केंद्र देखील स्थापन केले जाईल.

अलीकडेच आयोजित करण्यात आलेला ‘कोकण 2025’ हा संयुक्त नौदल सराव आणि यूके कॅरियर स्ट्राइक ग्रुपचा त्यातील सहभाग, दोन्ही देशांमधील वाढत्या नौदल संबंधांना दर्शवतो.

दहशतवादाविरुद्ध एकजूट

स्टारमर यांच्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांच्या सरकारने ‘दहशतवादविरोधी त्यांच्या संयुक्त वचनबद्धतेचा’ पुनरुच्चार केला. एप्रिल 2025 मध्ये, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा दोन्ही नेत्यांनी निषेध केला. कट्टरतावाद, दहशतवाद्यांना केला जाणारा वित्तपुरवठा आणि सीमापार धोक्यांचा सामना करण्यासाठी, संयुक्त राष्ट्र आणि एफएटीएफ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत अधिक जवळून काम करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले.

भविष्यासाठी रोडमॅप

‘यूके-भारत डिफेन्स इंडस्ट्रियल रोडमॅपसाठी’ असलेली वचनबद्धता दोन्ही देशांनी यावेळी अधोरेखित केली. हा आराखडा संरक्षण प्रणालींचे सह-डिझाईन, सह-विकास आणि संयुक्त उत्पादनाला प्रोत्साहन देतो. रोडमॅपममधील विशेष केंद्रित क्षेत्रांमध्ये प्रगत प्रणोदन, नौदल तंत्रज्ञान आणि संशोधन-नेतृत्वाखालील संरक्षण नवोपक्रमांचा समावेश आहे.

भारत आणि युकेमध्ये लढाऊ विमान इंजिनांच्या सह-विकासावर वाटाघाटी सुरू असताना, देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठांना समर्थन देण्यासाठी उच्च-स्तरीय संरक्षण तंत्रज्ञानामध्ये दीर्घकालीन भागीदारी करण्याबाबत दोन्ही देशांनी आपली रूची दर्शवली.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleजैश-ए-मोहम्मदने स्थापन केली ‘महिला शाखा’, मसूद अझहरच्या बहिणीचे नेतृत्व
Next articleदक्षिण फिलीपिन्समध्ये 7.5 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप, त्सुनामीचा इशारा जारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here