जैश-ए-मोहम्मदने स्थापन केली ‘महिला शाखा’, मसूद अझहरच्या बहिणीचे नेतृत्व

0

पाकिस्तानस्थित कुप्रसिद्ध दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद (JeM) ने, आपल्या पारंपरिक धोरणात बदल करत, “जमात-उल-मोमिनात” नामक एका महिला शाखेची स्थापन केली आहे. संयुक्त राष्ट्रांनी जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलेला, JeM प्रमुख मौलाना मसूद अझहरच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रातून ही घोषणा करण्यात आली आहे. 8 ऑक्टोबर 2025 पासून, पंजाबच्या बहावलपूर येथील मर्कझ उस्मान-ओ-अली येथे, या नव्या महिला शाखेसाठीची भरती सुरू झाली आहे.

भारताच्या गुप्तचर सूत्रांनी आणि JeM चे प्रचार माध्यम ‘अल-कलाम मीडिया’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या महिला शाखेचे नेतृत्व सादिया अझहर करणार आहे. सादिया ही मसूद अझहरची बहीण असून, ती युसूफ अझहर यांची विधवा आहे. 7 मे रोजी, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानातील मर्कझ सुभानअल्लाह येथे JeM च्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्यात युसूफ अझहरचा मृत्यू झाला.

मदरसा आणि कमांडरच्या कुटुंबातून महिलांची भरती

सूत्रांच्या माहितीनुसार, ही संघटना आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतून येणाऱ्या महिलांना लक्ष्य करत आहे, विशेषतः बहावलपूर, कराची, मुजफ्फराबाद, कोटली, हरीपूर आणि मनसेहरा येथील मदरसांमध्ये शिकणाऱ्या महिलांना. या शाखेने, विद्यमान आणि माजी JeM कमांडरांच्या पत्नी तसेच अन्य कार्यकर्त्यांच्या कुटुंबातून महिलांची भरती सुरू केली आहे.

संघटनेने भरती संदर्भात जारी केलेल्या एका पत्रकात, धार्मिक चिन्हे आणि मक्का-मदीना यासारख्या इस्लामिक पवित्र स्थळांची चित्रे समाविष्ट आहेत. या पत्रकात, संभाव्य भरतीसाठी भावनिक आवाहन करत, धार्मिक कर्तव्य आणि शहादतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ही रणनीती विशेषतः शिक्षित, शहरी मुस्लिम महिलांना आकर्षित करण्यासाठी आखलेली आहे.

आत्मघातकी कारवायांमध्ये धोरणात्मक बदलाची शक्यता

जैश-ए-मोहम्मद या संघटनेने, पूर्वीपासूनच महिलांना लढाई किंवा सशस्त्र जिहादमध्ये सहभागी होण्यास मनाई केली होती. मात्र, ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेला महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू आणि प्रचंड नुकसानीनंतर, संघटना आपल्या कार्यपद्धतीत बदल करत असल्याचे दिसून येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मसूद अझहर आणि त्याचा भाऊ तसेच वरिष्ठ रणनीतिकार तल्हा अल-सैफ यांनी, महिलांना संघटनेच्या प्रत्यक्ष कारवायांमध्ये सामील करण्याचा निर्णय  घेतला आहे.

‘महिलांच्या विंगची निर्मिती, भविष्यात महिला आत्मघातकी हल्लेखोरांचा वापर वाढण्याची शक्यता निर्माण करते,’ असा इशारा अधिकाऱ्यांनी केला आहे. याआधी ISIS, बोको हराम, हमास आणि LTTE सारख्या संघटनांमध्ये अशाप्रकारे महिलांचा समावेश करण्यात आला होता. भारतीय सुरक्षा यंत्रणांचे मत आहे की, JeM जेंडर-आधारित सुरक्षा त्रुटींचा गैरफायदा घेऊन भविष्यात महिलांमार्फत हल्ल्यांची योजना आखू शकते.

या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या एका गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले की: “या हालचालींमुळे JeM गटासाठी भरतीची नवीन क्षेत्रे खुली होतात, याच्या साहाय्याने ते शहरी तसेच कमी देखरेख असलेल्या भागांमध्ये आपला विस्तार करू शकतात.”

भारतामध्ये प्रभाव वाढवण्यावर लक्ष

या नव्या महिला ब्रिगेडच्या माध्यमातून, JeM सीमारेषा ओलांडून भारतात घुसखोरी करत आहे का, याकडे भारतीय सुरक्षा यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्राथमिक अहवालांनुसार, या महिला विंगद्वारे जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि दक्षिण भारतामध्ये एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप्स आणि सोशल मीडिया नेटवर्क्सद्वारे, त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवणाऱ्या महिलांची भरती करण्याचा प्रयत्न करू शकते.

या सर्व हालचाली, भारताच्या दहशतवादविरोधी कारवाया आणि पाकिस्तास्थित दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर वाढत असलेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर घडत आहेत.

 जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा भारतातील अनेक गंभीर दहशतवादी हल्ल्यांशी संबंध राहिला आहे, ज्यामध्ये 2001 मधील संसदेवरचा हल्ला आणि 2019 मधील पुलवामा येथील आत्मघातकी बॉम्बस्फोट यांचा समावेश आहे.

मसूद अझहर याला 1999 मध्ये, इंडियन एअरलाईन्सच्या IC-814 विमानाच्या अपहरण प्रकरणी झालेल्या तडजोडींमध्ये, बंधकांच्या बदल्यात सोडण्यात आले होते आणि तो अद्याप फरार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर, त्याने असा दावा केला की- त्याच्या विस्तारित कुटुंबातील अनेक सदस्य, जसे की त्याची मोठी बहीण, तिचा पती युसूफ अझहर आणि इतर काही सदस्य भारतीय हवाई हल्ल्यात मारले गेले.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleJeM Forms Women’s Wing ‘Jamaat-ul-Mominaat’ Under Masood Azhar’s Sister
Next articleभारत आणि ब्रिटनमध्ये LMM सह, £600 दशलक्ष किमतीचे संरक्षण करार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here