भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ, यांच्यात मंगळवारी दूरध्वनीवरद्वारे सविस्तर चर्चा झाली. या चर्चेद्वारे, दोन्ही नेत्यांनी आतंकवादविरोधी कारवाई, सैनिकी प्रशिक्षण, आणि औद्योगिक सहकार्य अशा विविध क्षेत्रांमधील, ‘धोरणात्मक संरक्षण भागीदारी’ बळकट करण्याच्या निर्धाराची पुनःपुष्टी केली.
जानेवारीपासून तिसऱ्यांदा पार पडलेल्या या बैठकीत, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये विशेषतः भारतीय लढाऊ विमानांसाठी आवश्यक असलेल्या अमेरिकन इंजिनांचा विलंब आणि सीमापार दहशतवादावरील चिंता यांचा समावेश होता.
अधिकृत सूत्रांनुसार, राजनाथ सिंह यांनी अमेरिकन समकक्षांकडे GE F404 जेट इंजिनांचा पुरवठा लवकरात लवकर करण्याची विनंती केली. ही इंजिने भारताच्या ‘तेजस’ लढाऊ विमानासाठी आवश्यक असून, या पुरवठ्यात दोन वर्षांहून अधिकचा विलंब झाला आहे.
तसेच, सिंह यांनी Hindustan Aeronautics Limited (HAL) च्या सहकार्याने F414 प्रगत इंजिनांचे संयुक्त उत्पादन करण्यासाठीचा करार, लवकरात लवकर अंतिम करण्याची मागणीही केली. ही इंजिने भारताच्या पुढील पिढीच्या लढाऊ विमान कार्यक्रमाचा कणा ठरणार आहेत.
“हा विलंब आपल्या संरक्षण सज्जतेवर परिणाम करत आहे,” असे चर्चेशी संबंधित एका भारतीय अधिकाऱ्याने सांगितले.
“संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले की, F414 करार लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे.”
याशिवाय, दोन्ही नेत्यांमध्ये लॉजिस्टिक सहकार्य वाढवणे, संयुक्त लष्करी सरावांचे प्रमाण वाढवणे आणि संरक्षण पुरवठा साखळ्या मजबूत करणे यावरही चर्चा झाली.
राजनाथ सिंह यांनी, दहशतवादविरोधी लढ्यात अमेरिकेच्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचे कौतुक केले आणि भारताच्या पश्चिम सीमेपासून उद्भवणाऱ्या दहशतवादी धोक्यांचा सामना करण्यासाठी सहकार्य सुरू ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
पीट हेगसेथ यांच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत, राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्याला मंजुरी दिली, जिथे आगामी संरक्षण प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा होणार आहेत.
दरम्यान, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही पेंटागॉनमध्ये पीट हेगसेथ यांची भेट घेतली. त्यांनी भारत-अमेरिका संरक्षण संबंधांची वाढती गरज अधोरेखित करताना म्हटले:
“मी आज पेंटागॉनमध्ये आहे कारण आमचे संरक्षण सहकार्य आज खरोखरच अत्यंत निर्णायक ठरत आहे.”
हेगसेथ यांनीही या मताशी सहमती दर्शवली आणि सांगितले की, “भारतीय लष्करात अमेरिकन संरक्षण प्रणालींचा यशस्वी समावेश झाला असून, याआधारे सहउत्पादन व औद्योगिक सहकार्य वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.”
“आम्ही भारतासोबत अनेक प्रलंबित संरक्षण करार अंतिम करण्याच्या दिशेने काम करत आहोत आणि दोन्ही देशांची औद्योगिक संजाळे अधिक बळकट करण्याचा आमचा मानस आहे,” असे हेगसेथ म्हणाले.
हेगसेथ यांनी, भारत-अमेरिका प्रमुख संरक्षण भागीदारीसाठी एक नवीन सहकार्य चौकट तयार करण्याचा प्रस्तावही मांडला, जेणेकरून संरक्षण संबंध अधिक व्यावसायिक आणि धोरणात्मक स्तरावर नेले जाऊ शकतील.
वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही राष्ट्रे इंडो-पॅसिफिकमध्ये त्यांचे धोरणात्मक सहकार्य अधिक दृढ करण्याचा आणि प्रादेशिक स्थिरता वाढविण्याचा प्रयत्न करत असताना, नवीनतम उच्च-स्तरीय देवाणघेवाण झाली आहे.
टीम भारतशक्ती