पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवली, भारतीय युट्यूबरसह 5 जणांना अटक

0

पाकिस्तानला संवेदनशील भारतीय लष्करी माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी हरियाणातील हिसार येथील एका युट्यूबरसह सहा जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या महिलेचे नाव ज्योती मल्होत्रा ​​उर्फ ​​ज्योती राणी असे आहे. ती ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचे युट्यूब चॅनल चालवते.हाती आलेल्या वृत्तानुसार, हेरगिरीच्या आरोपाखाली तिला इतर पाच जणांसह अटक करण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला सांगितले की, 33  वर्षीय ही महिला, जी तिच्या यूट्यूबवर स्वतःला “nomadic Leo girl wanderer”  ‘हरयाणवी+पंजाबी’ आणि ‘पुराने ख्यालो की मॉडर्न लडकी’ असे संबोधित करते, ती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एहसान-उर-रहीम उर्फ ​​दानिश या अधिकाऱ्याच्या संपर्कात आली होती आणि किमान दोनदा पाकिस्तानला जाऊन आली होती.

पर्सोना नॉन ग्राटा

गेल्या आठवड्यात दानिशला persona non grata (एखाद्या परदेशी राजदूताला यजमान देशाने “persona non grata” घोषित केल्यास, तो देश त्या राजदूताला आपल्या देशात परत जाण्यास सांगतो) म्हणून घोषित करण्यात आले आणि नवी दिल्लीने त्याला हेरगिरी केल्याबद्दल तसेच भारतीय लष्कराच्या हालचालींविषयी संवेदनशील माहिती लीक केल्याबद्दल 24 तासांच्या आत भारत सोडण्यास सांगितले. ऑपरेशन सिंदूरनंतर  भारत आणि पाकिस्तान यांच्यात नुकत्याच झालेल्या संघर्षादरम्यान दानिशला देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते.

भारतीय सशस्त्र दलांनी 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते आणि जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याला- ज्यामध्ये 22 एप्रिल रोजी 26 लोक, मुख्यतः हिंदू पर्यटक ठार झाले – प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि PoK मधील नऊ दहशतवादी केंद्रांना लक्ष्य केले होते.

ज्योती मल्होत्राने चौकशीदरम्यान तपास अधिकाऱ्यांसमोर कबुली दिली आहे की ती 2023 मध्ये व्हिसा मिळवण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात गेली होती, त्यावेळी ती रहीमला भेटली आणि त्याच्याशी बोलू लागली. तिने सांगितले की त्यानंतर तिने दोनदा पाकिस्तानला भेट दिली आणि रहीमचा परिचित अली अहवानला भेटली.

पाकिस्तानचा प्रवास

अहवानने तिच्या पाकिस्तानात राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केल्याचे तिने सांगितले.

“पाकिस्तानात अली अहवानने पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली आणि मी शाकिर तसेच राणा शहबाज यांना भेटले. मी शाकिरचा मोबाईल नंबर घेतला आणि कोणी संशय घेऊ नये यासाठी तो ‘जाट रंधावा’ या नावाने माझ्या फोनमध्ये सेव्ह केला. त्यानंतर मी भारतात परत आले आणि व्हॉटसअप, स्नॅपचॅट आणि टेलिग्रामसारख्या ॲपच्या माध्यमातून वरील सर्व लोकांशी सतत संपर्कात राहिले आणि राष्ट्रविरोधी माहितीची देवाणघेवाण करू लागले. मी रहीमलाही अनेक वेळा भेटले आहे,” असे ज्योती मल्होत्राने पोलिसांना सांगितल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मार्चमध्ये तिने तिच्या अलीकडील पाकिस्तान दौऱ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले.

तपास अधिकाऱ्यांनी हिंदुस्तान टाइम्सला सांगितले की तिने पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यासोबत (PIO) जिव्हाळ्याचे संबंधही प्रस्थापित केले आणि त्याच्यासोबत इंडोनेशियातील बाली येथे प्रवासही केला.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुट्सह)


+ posts
Previous articleयुक्रेनमधील मिनीबसवर रशियाचा ड्रोन हल्ला; 9 जणांचा मृत्यू
Next articleOperation Sindoor: Atmanirbhar Bharat’s Decisive Moment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here