कॅप्टन एम. आर. हरीश यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाचे आघाडीचे स्टील्थ फ्रिगेट आयएनएस तबर हे डेन्मार्कमधील एस्बेर्ज येथील बंदरात पोहोचले असून दोन दिवसांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्याला सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांमधील आणि त्यांच्या नौदलातील संबंध दृढ करणे हा या भेटीचा उद्देश आहे.
एस्बेर्ज बंदरातील वास्तव्यादरम्यान, आयएनएस तबरवरील कर्मचारी डॅनिश सशस्त्र दलांबरोबर होणाऱ्या द्विपक्षीय व्यावसायिक संवादमालिकेत सहभागी होणार आहेत. दोन्ही नौदलांमध्ये अधिक सहकार्य आणि सामंजस्य यांना चालना मिळावी हा या संवादांचा उद्देश आहे. भारतीय नौदलाच्या निवेदनानुसार, व्यावसायिक सहभागाबरोबरच, भारत आणि डेन्मार्क यांच्यातील संबंधांची सखोलता अधोरेखित करणारी सांस्कृतिक देवाणघेवाण देखील यात अंतर्भूत आहे.
भारत आणि डेन्मार्क यांच्यातील राजनैतिक संबंध लोकशाही परंपरेच्या सामायिक इतिहासावर, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय शांतता तसेच स्थैर्यासाठी परस्परांच्या वचनबद्धतेवर आधारित आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डेन्मार्कचे पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिक्सन यांच्यात 28 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या आभासी शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील संबंध ‘हरित धोरणात्मक भागीदारी’ स्तरावर नेण्यात आले तेव्हा ते आणखी मजबूत झाले.
भारतीय नौदलाच्या सर्वात जुन्या युद्धनौकांपैकी एक असलेली आयएनएस तबर ही अनेक प्रकारची शस्त्रे आणि सेन्सर्ससह सुसज्ज असून भारताच्या सागरी सुरक्षेसाठी लागणारी जहाजाची महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसून येते. ही युद्धनौका वेस्टर्न फ्लीटचा भाग असून मुंबईत स्थित वेस्टर्न नेव्हल कमांड अंतर्गत कार्यरत आहे.
डेन्मार्कच्या या दौऱ्यामुळे जगभरातील नौदलांसोबत मजबूत भागीदारी निर्माण करणे आणि ती कायम राखणे, भारताचे धोरणात्मक हितसंबंध वाढवणे तसेच जागतिक सागरी सुरक्षेत योगदान देणे यासाठी भारतीय नौदलाची वचनबद्धता कायम असल्याचे दिसून येते.
आयएनएस तबर अलीकडेच 7 ते 11 ऑगस्ट दरम्यान लंडनच्या भेटीवर गेले होते. लंडनमध्ये असताना एचएमएस बेलफास्टच्या बाजूला आयएनएस तबर उभे करण्यात आले होते. लंडनमधील प्रतिष्ठित टॉवर ब्रिज उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही दोनही जहाजे डौलाने उभी होती. याशिवाय भारतीय नौदलाची ही आघाडीची युद्धनौका आयएनएस तबर हिचे शहरात स्वागत करण्यासाठी भारतीय डायस्पोराचे सदस्यही जमले होते. सांस्कृतिक दरी भरून काढणाऱ्या तसेच परस्पर सामंजस्याला चालना देणाऱ्या उपक्रमांना त्यांचा सामूहिक पाठिंबा दर्शवत असताना या कार्यक्रमातून लंडनमधील भारतीय डायस्पोराची ताकद आणि एकता बघायला मिळाली.