इराण आणि इस्रायलमध्ये हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ले होत असताना, सोमवारी संपूर्ण जगाचे लक्ष तेहरान त्यांच्या आण्विक सुविधांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांचा कसा बदला घेऊ शकते याकडे लागले आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्तापालट होण्याची शक्यता बोलून तणावात आणखी भर घातली आहे.
जगभरातून संयम बाळगून राजनैतिक चर्चेला परत एकदा सुरूवात करण्याचे आवाहन करूनही, 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर इस्रायलविरुद्धच्या सर्वात मोठ्या पाश्चात्य लष्करी कारवाईत अमेरिका सामील झाल्यानंतर, रविवारी इराणने स्वतःचे रक्षण करण्याचे वचन दिले.
व्यावसायिक उपग्रह प्रतिमांवरून असे दिसून आले आहे की शनिवारी इराणच्या भूगर्भातील फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यात जमिनीच्या आत खोलवर उभारण्यात आलेल्या जागेचे आणि त्यात असलेल्या युरेनियम-समृद्ध सेंट्रीफ्यूजचे गंभीर नुकसान झाले किंवा ते नष्ट झाले, परंतु त्या जागेची सद्यस्थिती अजूनही समजलेली नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले.
अमेरिकेच्या हल्ल्यांवरील त्यांच्या ताज्या सोशल मीडिया टिप्पण्यांमध्ये, ट्रम्प म्हणाले की, “इराणमधील सर्व आण्विक स्थळांचे अतोनात नुकसान झाले आहे.”
“सर्वात जास्त नुकसान जमिनीच्या खाली खोलवर असणाऱ्या स्थळांचे झाले. बुलसी (अचूक लक्ष्यवेध) !!!” असे त्यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर लिहिले.
ट्रम्प यांनी यापूर्वीच इराणला कोणत्याही प्रकारचा बदला घेण्याचे टाळावे असे आवाहन केले होते आणि म्हटले होते की सरकारने “आता शांतता प्रस्थापित केली पाहिजे” अन्यथा “भविष्यातील हल्ले खूप मोठे आणि खूप सोपे असतील.”
अमेरिकेने तीन इराणी आण्विक स्थळांना बंकर-बस्टर बॉम्ब आणि दोन डझनहून अधिक टोमाहॉक क्षेपणास्त्रांसह 75 अचूक-मार्गदर्शित मारा केला, असे जॉइंट चीफ ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांनी पत्रकारांना सांगितले.
रेडिएशन पातळी
यूएन न्यूक्लियर वॉचडॉग, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीने म्हटले आहे की अमेरिकेच्या हल्ल्यानंतर साइटबाहेरील रेडिएशन पातळीत कोणतीही वाढ झाल्याचे वृत्त नाही. एजन्सीचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी सीएनएनला सांगितले की भूगर्भात झालेल्या नुकसानाचे मूल्यांकन करणे अद्याप शक्य नाही.
इराणच्या एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की फोर्डो येथील बहुतेक अत्यंत समृद्ध युरेनियम हल्ल्यापूर्वीच इतरत्र हलवण्यात आले होते.
आपला अणुकार्यक्रम शांततापूर्ण हेतूंशिवाय इतर कोणत्याही दुसऱ्या गोष्टींसाठी नाही हे तेहरानने वारंवार सांगितले आहे. त्याने अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मोठा मारा केला, ज्यात अनेक लोक जखमी झाले असून तेल अवीवमधील इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
परंतु त्यांनी प्रत्युत्तर देण्याच्या त्याच्या मुख्य धमक्यांवर – अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी किंवा होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलाच्या शिपमेंटला रोखण्याच्या दृष्टीने – अद्याप कारवाई केलेली नाही.
तेलाच्या किमती
सामुद्रधुनी बंद करून आखातातील तेलाचा पुरवठा रोखण्याचा प्रयत्न इराणने खरोखरच अमलात आणला तर जागतिक तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात, जागतिक अर्थव्यवस्था रुळावरून घसरू शकते आणि आखातातील अमेरिकन नौदलाच्या विशाल पाचव्या ताफ्याशी संघर्षची शक्यता नाकारता येत नाही.
सोमवारी तेलाच्या किमती जानेवारीनंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्या. ब्रेंट क्रूड फ्युचर्स LCOc1 1.88 डॉलर्स किंवा 2.44 टक्के वाढून 78.89 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचला. यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड CLc1 1.87 डॉलर किंवा 2.53 टक्के वाढून 75.71 डॉलर्सवर पोहोचला.
इराणच्या संसदेने सामुद्रधुनी बंद करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे, जी इराण ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीसह सामायिक करतो. इराणच्या प्रेस टीव्हीने म्हटले आहे की अशा कोणत्याही हालचालीसाठी सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची मंजुरी आवश्यक असते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेचे कामकाज चालवले जाते.
केन म्हणाले की अमेरिकन सैन्याने इराक आणि सीरियासह या प्रदेशात सैन्याचे संरक्षण वाढवले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने परदेशात असलेल्या सर्व अमेरिकन नागरिकांसाठी सुरक्षा अलर्ट जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांना “जास्त सावधगिरी बाळगण्याचे” आवाहन केले आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी रविवारी चीनला इराणला सामुद्रधुनी बंद न करण्यास प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे, फॉक्स न्यूजच्या “संडे मॉर्निंग फ्युचर्स विथ मारिया बार्टिरोमो” या कार्यक्रमात असे सांगितले की ही एक “अत्यंत मोठी चूक” असेल.
त्यांनी असे केले तर ती त्यांच्यासाठी आर्थिक आत्महत्या ठरेल. आणि ते हाताळण्यासाठी आमच्याकडे पर्याय आहेत, परंतु इतर देशांनीही त्याकडे लक्ष दिले पाहिजे. यामुळे इतर देशांच्या अर्थव्यवस्थांना आपल्यापेक्षा खूप वाईट नुकसान होईल “, असे ते म्हणाले.
इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
सोमवारी पहाटे इराणकडून क्षेपणास्त्र हल्ला झाल्याचे वृत्त इस्रायली लष्कराने दिले असून ते इस्रायली संरक्षण दलांनी रोखल्याचे म्हटले आहे.
तेल अवीव आणि मध्य इस्रायलच्या इतर भागात हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. इराणने वारंवार ग्रेटर तेल अवीव – सुमारे 40 लाख लोकसंख्येचा महानगरीय भाग – इस्रायलचे व्यावसायिक आणि आर्थिक केंद्र – जिथे महत्त्वाची लष्करी मालमत्ता देखील आहे – यांना लक्ष्य केले आहे.
इराणी वृत्तसंस्थांनी वृत्त दिले आहे की “शत्रूंच्या लक्ष्यांना” तोंड देण्यासाठी मध्य तेहरानच्या जिल्ह्यांमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे आणि इस्रायली हवाई हल्ल्यांनी राजधानीच्या आग्नेयेला लष्करी संकुल असलेल्या पारचिनवर हल्ला केला आहे.
सत्ता बदल
रविवारी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणमधील सत्ता बदलाबाबतचा विचार मांडला.
“‘सत्ता बदल’ हा शब्द वापरणे राजकीयदृष्ट्या योग्य नाही, परंतु जर सध्याची इराणी राजवट इराणला पुन्हा महान बनवू शकत नसेल, तर सत्तेमध्ये बदल का होणार नाही??? MIGA!!!” असे त्यांनी लिहिले.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांच्यासह त्यांच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी इराणचे सरकार उलथवून टाकण्यासाठी कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर ट्रम्प यांची ही पोस्ट आली.
13 जून रोजी इराणवर अचानक हल्ला करून शत्रुत्व सुरू करणारे इस्रायली अधिकारी कट्टरपंथी शिया मुस्लिम धर्मगुरूंना उलथवून टाकण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेबद्दल उघडपणे बोलू लागले आहेत.
तेहरान विविध पर्यायांचा विचार करत असताना, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची सोमवारी मॉस्कोमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. क्रेमलिनची इराणशी धोरणात्मक भागीदारी आहे, परंतु इस्रायलशीही जवळचे संबंध आहेत.
रविवारी इस्तंबूलमध्ये बोलताना अराक्ची म्हणाले की त्यांचा देश सर्व संभाव्य प्रतिसादांचा विचार करेल आणि जोपर्यंत ते प्रत्युत्तर देत नाहीत तोपर्यंत राजनैतिक पातळीवरील चर्चेकडे परतणार नाही.
रशियाने केला अमेरिकन हल्ल्यांचा निषेध
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या हल्ल्यांचा निषेध केला. यामुळे अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचे उल्लंघन झाल्याचे त्याने म्हटले असून यामुळे मध्य पूर्वेमध्ये संघर्ष आणखी वाढेल असा इशारा दिला आहे.
रशिया, चीन आणि पाकिस्तानने मध्य पूर्वेमध्ये तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीचे आवाहन करणारा ठराव 15 सदस्यीय संस्थेने स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला त्यावेळीअमेरिकेच्या हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची रविवारी बैठक झाली.
रशिया, चीन आणि पाकिस्तानने मध्य पूर्वेमध्ये तात्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीचे आवाहन करणारा ठराव १५ सदस्यीय संस्थेने स्वीकारण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा अमेरिकेच्या हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची रविवारी बैठक झाली.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी सुरक्षा परिषदेला सांगितले की इराणमध्ये अमेरिकेने केलेल्या बॉम्बहल्ल्यांमुळे या प्रदेशातील परिस्थितीला धोकादायक वळण लागले आहे. त्यामुळे त्यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावर वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले.
अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर मध्यपूर्वेतील उड्डाणे किती काळ स्थगित करावीत याचा विचार व्यावसायिक विमान कंपन्या करत होत्या. युरोप आणि आशिया दरम्यानच्या उड्डाणांसाठी मध्य पूर्व मार्ग महत्त्वाचा आहे परंतु फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार 24 ने रविवारी इराण, इराक, सीरिया आणि इस्रायलच्या हवाई हद्दीतून एकाही विमानाचा प्रवास झाला नसल्याचे सांगितले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)