शनिवारी पहाटे, इराण आणि इस्रायलने एकमेकांवर नव्याने हल्ले चढवले, याच्या एक दिवस आधी तेहरानने दबावाखाली अणु चर्चा नाकारल्याचे जाहीर केले होते, तरीसुद्धा युरोपीय देश शांततेसाठीचे प्रयत्न सुरू ठेवत होते.
स्थानिक वेळेनुसार, शनिवारी पहाटे 2:30 वाजता (शुक्रवारी रात्री 23:30 GMT), इस्रायलच्या लष्कराने इराणकडून मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्र हल्ला होणार असल्याचा इशारा दिला, त्यानंतर तेल अवीवसह मध्य इस्रायल व इस्रायलने व्यापलेल्या वेस्ट बँक परिसरात हवाई हल्ला सायरन्स वाजवले गेले.
इस्रायलने इराणच्या क्षेपणास्त्र साठ्यांवर केले हल्ले
तेल अवीवच्या आकाशात क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीने प्रतिसाद दिल्याचे दृश्य दिसले, आणि मोठ्या आवाजात स्फोट झाले. त्याच वेळी इस्रायलने इराणमधील क्षेपणास्त्र साठा व प्रक्षेपण स्थळांवर हल्ल्यांची दुसरी लाट सुरु केल्याचे लष्कराने जाहीर केले.
इस्रायलच्या दक्षिण भागातही सायरन्स वाजवण्यात आले, असे इस्रायलच्या आपत्कालीन सेवा ‘मगेन डेव्हिड अॅडोम’ने सांगितले. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, इराणने 5 बॅलिस्टिक मिसाइल प्रक्षेपित केले, परंतु त्यांचा थेट परिणाम झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही.
शेकडो लोकांचा मृत्यू
आपत्कालीन सेवांनी एका बहुमजली इमारतीच्या छपरावर आग लागल्याचे फोटो प्रसिद्ध केले. स्थानिक माध्यमांनी सांगितले की, ती आग मिसाईलच्या अडवलेल्या अवशेषांमुळे लागली. गेल्या शुक्रवारी इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले, कारण तो अण्वस्त्रे तयार करण्याच्या उंबरठ्यावर असल्याचा आरोप करण्यात आला होता.
इराणने दावा केला आहे की, त्याचा अणु कार्यक्रम शांततेच्या हेतूने आहे.
इस्रायलकडे अण्वस्त्रे असल्याचे मानले जाते, पण ते याबाबत ना कबूल करतात ना नकार देतात.
अमेरिकेतील Human Rights Activists News Agency या संस्थेच्या माहितीनुसार, इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 639 इराणी नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये लष्करी उच्च अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञांचा समावेश आहे.
इराणकडून इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांत 24 इस्त्राईली नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले.
रॉयटर्सने या मृत्यूच्या आकड्यांची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.
चर्चेला वाव नाही
इराणने वारंवार तेल अवीववर हल्ले केले आहेत, हा सुमारे 4 दशलक्ष लोकांचा आर्थिक व व्यापारी केंद्र असलेला भूभाग आहे, जिथे काही महत्त्वाची लष्करी साधनेही आहेत.
इस्रायलने शुक्रवारी, इराणमधील अनेक लष्करी स्थळांवर हल्ले केले, ज्यात क्षेपणास्त्र निर्मिती केंद्र, अण्वस्त्र संशोधन संस्थान, आणि पश्चिम व मध्य इराणमधील लष्करी तळांचा समावेश होता.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराकची यांनी सांगितले की, “इस्रायली आक्रमण थांबेल, तेव्हाच अमेरिकेसोबत चर्चा होईल.” मात्र ते शुक्रवारी युरोपियन परराष्ट्रमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी जिनिव्हाला पोहोचले, जिथे युरोपने शांतता प्रक्रियेला पुन्हा मार्ग देण्याचा प्रयत्न केला.
अमेरिका इस्त्राईलला थांबण्यास सांगण्याची शक्यता कमी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी शुक्रवारी सांगितले की, “अमेरिकेने इस्रायलच्या बाजूने युद्धात सामील व्हावे की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी त्यांना दोन आठवडे लागू शकतात.” त्यांनी म्हटले की, “तोपर्यंत बघूया, की दोघांपैकी कोणी समजूतदारपणे विचार करतो का.”
ट्रम्प म्हणाले की, “इस्रायलला हल्ले थांबवायला सांगणे या टप्प्यावर फार कठीण आहे. जर कोणी जिंकत असेल, तर मागे हटायला सांगणे कठीण होते. पण आम्ही तयार, इच्छुक आणि सक्षम आहोत, आणि आम्ही इराणशी संवाद साधत आहोत. बघूया काय होते.”
प्रगतीची थोडीफार चिन्हे
जिनिव्हा येथे झालेल्या चर्चांमध्ये फारशी प्रगती झाल्याचे दिसले नाही. ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितले की, “यावेळी युरोप इराणला मदत करू शकणार नाही. ते अमेरिकेशीच बोलू इच्छित आहेत.”
रॉयटर्सने पाहिलेल्या एका स्टेट डिपार्टमेंट केबलनुसार, हवाई संघर्ष सुरू झाल्यापासून अमेरिकेचे शेकडो नागरिक इराणमधून पळून गेले आहेत.
संयुक्त राष्ट्रांमधील इस्रायलचे प्रतिनिधी- डॅनी डॅनॉन यांनी सुरक्षा परिषदेला शुक्रवारी सांगितले की, “इस्रायलचे हल्ले तेव्हाच थांबतील, जेव्हा इराणचा अणु धोका पूर्णतः संपेल.” इराणचे यूएन प्रतिनिधी अमीर सईद इरावानी यांनी परिषदेला आवाहन केले आणि अमेरिकेच्या संभाव्य युद्ध सहभागामुळे इराण चिंतेत असल्याचे सांगितले.
एका वरिष्ठ इराणी अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की, इराण युरेनियम संवर्धनावर मर्यादा घालण्यावर चर्चा करण्यास तयार आहे, पण ते कोणतीही अशी योजना नाकारतील जी त्यांना युरेनियम संवर्धन पूर्णपणे थांबवायला लावेल — विशेषतः इस्रायलच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)