भारतीय लष्कराने, दीर्घ पल्ल्याच्या फायरपॉवरला चालना देण्यासाठी स्वदेशी बनावटीच्या ‘धनुष’ टोव्हड आर्टिलरी तोफांच्या तिसऱ्या रेजिमेंटची उभारणी सुरू केली आहे. संरक्षण आणि सुरक्षा व्यवस्थेतील सूत्रांनी, दुसरी रेजिमेंट आधीच स्थापन झाल्याचे आणि तिसऱ्या रेजिमेंटसाठी तोफांची पूर्तता सुरू झाल्याचे पुष्टी केली आहे. प्रत्येक रेजिमेंटमध्ये 18 होवित्झर तोफा असतात. लष्कराच्या तोफखाना विभागाच्या आधुनिकीकरणामध्ये स्वदेशी प्रणालींचा समावेश करून टप्प्याटप्प्याने प्रगती होत असल्याचे हे प्रतीक आहे.
ही तोफ कोणी विकसित केली आहे?
‘धनुष’ ही 155 मिमी/45 कॅलिबरची दीर्घ पल्ल्याची टोव्हड आर्टिलरी तोफ, Advanced Weapons and Equipment India Limited (AWEIL) या भारतीय संस्थेने विकसित केली आहे. ही पूर्णत: स्वदेशी उत्पादन असलेली तोफ असून, तिच्यामध्ये वाढीव मारक पल्ला, स्वयंचलित लक्ष्य निर्धारण प्रणाली आणि सर्व हवामान व भूप्रदेशांमध्ये कार्यक्षमतेने काम करण्याची क्षमता आहे. ही तोफ जुन्या बोफोर्स प्रणालींची सुधारित आणि आधुनिक आवृत्ती मानली जाते.
या श्रेणीतील 114 तोफांच्या मूळ करारावर 2019 मध्ये स्वाक्षरी झाली होती, ज्याची एकूण किंमत ₹1,260 कोटी होती. मात्र, रशिया-युक्रेन संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक पुरवठा साखळीतील अडचणींमुळे, 2026 च्या मार्चपर्यंत वितरण पूर्ण होण्याची शक्यता आता कमी वाटते.
उत्पादनात विलंब झाला असूनही, ‘धनुष’ हा ‘लढाईतील सिद्ध व भूप्रदेश-स्वतंत्र प्लॅटफॉर्म’ असल्याचे, सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सर्वोच्च डोंगराळ भागात तसेच वाळवंटी भागातही ही प्रणाली प्रभावीपणे काम करू शकते.
सुमारे 38 किमी पर्यंतचा मारक पल्ला, ऑनबोर्ड संगणकीय प्रणाली, GPS-आधारित नेव्हिगेशन, आणि NATO मानकांच्या दारुगोळ्यांशी सुसंगतता यामुळे ही तोफ एक शक्तिशाली शस्त्र म्हणून सिद्ध होते.
सुमारे 14 टन वजनाच्या आणि 80% पेक्षा जास्त स्वदेशी घटकांनी बनवलेल्या, ‘धनुष’ तोफेने भारताच्या स्वदेशी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या वाटचालीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
लष्कराच्या अधिकाऱ्यांचा विश्वास आहे की, ही प्रणाली देशाच्या तोफखाना क्षमतेला बळकटी देणारी असून, तोफखान्याच्या फायरपॉवरमध्ये लवचिकता आणि अचूक मारक क्षमता आगामी काळात अधिक वृद्धिंगत होईल.
– टीम भारतशक्ती