ग्रेटा थनबर्ग घेऊन जाणारी गाझा मदत बोट इस्रायलकडून जप्त

0

गाझा पट्टीवरील नौदलाच्या नाकेबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका धर्मादाय जहाजाचा ताबा इस्रायली सैन्याने घेतला असून ही नौका, तिच्या 12 सदस्यांच्या क्रूसह आणि कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गसह – आता इस्रायली बंदरात नेण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

पॅलेस्टिनी समर्थक फ्रीडम फ्लोटिला कोलिशनद्वारे (FFC) चालवली जाणारी ब्रिटिश ध्वजांकित नौका मॅडलीनने, सोमवारी नंतर गाझाला थोड्या प्रमाणात मदत पोहोचवण्याचे आणि तेथील मानवतावादी संकटाबद्दल आंतरराष्ट्रीय जागरूकता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

मात्र, किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वीच रात्री सैनिक बोटीवर चढले होते, असे FFC ने त्यांच्या टेलिग्राम अकाउंटवर म्हटले आहे. इस्रायली परराष्ट्र मंत्रालयानेही नंतर ती इस्रायली नियंत्रणाखाली असल्याच्या बातमीला दुजोरा दिला.

‘सेल्फी यॉट’

“‘सेलिब्रिटीज’ची ‘सेल्फी यॉट’ इस्रायलच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे पोहोचत आहे. प्रवासी त्यांच्या मायदेशी परततील अशी अपेक्षा आहे,” असे मंत्रालयाने एक्सवर लिहिले.

सर्व प्रवासी सुरक्षित आणि सुखरूप होते, असे मंत्रालयाने नंतर म्हटले. “त्यांना सँडविच आणि पाणी देण्यात आले. शो संपला आहे,” असेही त्यात नमूद केले आहे.

मानवतावादी मार्गांनी हस्तांतरण

12 जणांच्या क्रूमध्ये स्वीडिश हवामान प्रचारक ग्रेटा थनबर्ग आणि युरोपियन संसदेच्या फ्रेंच सदस्य रिमा हसन यांचा समावेश आहे.

“फ्रीडम फ्लोटिलाच्या क्रूला इस्रायली सैन्याने पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास आंतरराष्ट्रीय पाण्यात अटक केली,” असे हसन यांनी एक्सवर पोस्ट केले. एका छायाचित्रात बोटीवर असलेले क्रू सदस्य बसलेले असून, सर्वांनी लाईफ जॅकेट घातले होते आणि त्यांचे हात हवेत होते.

या नौकेत तांदूळ आणि बाळांसाठी लागणाऱ्या अन्नासह अतिशय कमी प्रमाणात  मानवतावादी मदतीच्या दृष्टीने लागणारी साधनसामग्री आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की ही नौका गाझा येथे नेली जाईल. “यॉटवर असलेली आणि ‘सेलिब्रिटी’ वापरत नसलेली थोडीशी मदत खऱ्या मानवतावादी मार्गांनी गाझा येथे हस्तांतरित केली जाईल,” असे त्यात लिहिले आहे.

प्रचारतंत्र (Propaganda)

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी रविवारी लष्कराला मॅडलीनला गाझापर्यंत पोहोचण्यापासून रोखण्याचे आदेश दिले. ही मोहिम म्हणजे हमासच्या समर्थनार्थ Propaganda चे प्रयत्न म्हटले.

2007 मध्ये हमासने गाझावर ताबा मिळवल्यानंतर इस्रायलने किनारपट्टीवरील एन्क्लेव्हवर नौदल नाकेबंदी लादली.

इस्रायली लोकांच्या आकडेवारीनुसार, 7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलवर हमासच्या नेतृत्वाखालील हल्ल्यानंतर सुरू झालेल्या सध्याच्या युद्धासह अनेक संघर्षांमधून ही नाकेबंदी कायम आहे.

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इस्रायलच्या लष्करी मोहिमेला सुरुवात झाल्यापासून 54 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. संयुक्त राष्ट्रांनी इशारा दिला आहे की गाझाच्या 20 लाखांहून अधिक रहिवाशांपैकी बहुतेकांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे.

इस्रायली सरकार म्हणते की हमासपर्यंत शस्त्रसाठा पोहोचू नयेत म्हणून ही नाकेबंदी आवश्यक आहे.

‘मिशन अजून संपलेले नाही’

पॅलेस्टिनी प्रदेशातील मानवाधिकारांवरील संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधी फ्रान्सिस्का अल्बानीज यांनी FFC ऑपरेशनला पाठिंबा दिला आहे. रविवारी त्यांनी इतर बोटींना गाझा नाकेबंदीला आव्हान द्या असे आवाहन केले आहे.

“मॅडलीनचा प्रवास संपला असेल, पण मिशन अजून संपलेले नाही. प्रत्येक भूमध्य बंदराने गाझाला मदत आणि एकता असलेल्या बोटी पाठवल्या पाहिजेत,” असे तिने एक्स वर लिहिले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


+ posts
Previous articleDRDO Transfers Technology of 9 Defence Systems to Boost Indigenous Manufacturing
Next articleDRDO ने केले 9 संरक्षण प्रणालींचे तंत्रज्ञान हस्तांतरीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here