गुरुवार, 15 मे रोजी सकाळी, जम्मू आणि काश्मीरमधील (J&K) अवंतीपोरा येथे सुरू झालेल्या जोरदार चकमकीत सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला.
ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख आणि त्यांचा कोणत्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ही चकमक, पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा उपजिल्ह्यातील नदर आणि त्राल भागात भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या शोध मोहिमेनंतर सुरू झाली.
दहशतवादी एका घरात लपलेले होते आणि सुरक्षा दलांनी अखेर त्यांचा खात्मा केला.
याबाबत, काश्मीर झोन पोलिसांनी X वर लिहिले की: “त्रालमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. शोध मोहीम सुरूच आहे. अधिक माहिती लवकरच दिली जाईल.”
ही चकमक गेल्या 48 तासांत झालेली दुसरी मोठी कारवाई आहे.
ऑपरेशन केल्लर
मंगळवारी (13 मे), शोपियन जिल्ह्यातील चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे (LeT) 3 दहशतवादी ठार करण्यात आले. ही कारवाई कुलगाममध्ये सुरू झाली होती आणि नंतर शोपियनमधील जंगलात हलवण्यात आली, जिथे गोपनीय माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी शोध मोहिम हाती घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, पाहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या लष्करच्या छद्म संघटनेचा प्रमुख- शाहीद कट्टे देखील या चकमकीत ठार झाला.
भारतीय लष्कराने X वर पोस्ट करत सांगतले की: “13 मे 2025 रोजी, शोपियनमधील शोएकल केल्लर भागात दहशतवादी असल्याची माहिती राष्ट्रीय रायफल युनिटला मिळाल्यानंतर, भारतीय लष्कराने शोध व विनाश मोहीम राबवली. दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर देताना तीन कट्टर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कारवाई अजूनही सुरू आहे.”
दहशतवादविरोधी मोहिमा तीव्र
22 एप्रिल रोजी पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत. त्या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला होता, जे सर्व पुरुष होते आणि बहुतेक हिंदू पर्यटक होते.
हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून, भारताने 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले आणि पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. यामुळे भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आणि परस्पर कारवाया सुरू झाल्या.
10 मे रोजी भारत आणि पाकिस्तानने, संघर्षविराम करण्यावर सहमती दर्शवली आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमीन, आकाश आणि समुद्रमार्गे लष्करी कारवाया थांबवण्याचे ठरवले. मात्र, काही तासांतच पाकिस्तानने या शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(IBNS च्या इनपुट्ससह)