IMF ने (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) इस्लामाबादला नुकत्याच दिलेल्या 1 अब्ज डॉलर्सच्या कर्जाचा एक भाग ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी वळवला जाऊ शकतो असे सांगत, दहशतवादी संघटनांना पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक पाठिंब्याबाबत, संरक्षणमंत्री सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे IMF ने इस्लामाबादला नुकत्याच दिलेल्या 1 अब्ज डॉलर्सच्या कर्जाच्या हप्त्याचा पुनर्विचार करावा अशी विनंती संरक्षणमंत्र्यांनी केली आहे. हा अप्रत्यक्षपणे दहशतवादी वित्तपुरवठ्याचा एक प्रकार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गुजरातमधील भुज रुद्र माता हवाई दल तळावरून बोलताना संरक्षणमंत्री म्हणाले, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझर, याला संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे, तरीही पाकिस्तान, आपल्या नागरिकांकडून गोळा केलेला कर, मसूद अझर याला सुमारे 14 कोटी रुपये देण्यासाठी खर्च करणार आहे. पाकिस्तान सरकारने मुरीदके आणि बहावलपूर येथील लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी पायाभूत सुविधांच्या पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदतीची घोषणाही केली आहे. नुकत्याच झालेल्या सीमापार मोहिमेदरम्यान भारताने हल्ला केलेल्या नऊ लक्ष्यांपैकी ही दोन ठिकाणे होती.
“IMF ने दिलेल्या एक अब्ज डॉलरच्या मदतीचा मोठा भाग दहशतवादी पायाभूत सुविधांना निधी पुरवण्यासाठी वापरला जाईल. IMF या आंतरराष्ट्रीय संघटनेने अप्रत्यक्षपणे केलेली ही मदतच नव्हे का?” असेही सिंह यांनी विचारले. “पाकिस्तानला मिळणारी कोणतीही आर्थिक मदत टेरर फंडिंगपेक्षा (दहशतवादाला वित्त पुरवठा) कमी नाही,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
मुरीदके दौऱ्यानंतर पाकिस्तानचे मंत्री राणा तनवीर हुसेन यांनी घोषणा केली की सरकार स्वतःच्या खर्चाने या क्षेत्राची पुनर्बांधणी करेल. त्या पार्श्वभूमीवर सिंह यांनी नमूद केले की पाकिस्तानी करदात्यांकडून मिळणारा हा निधी पहलगाममधील हल्ल्यासारख्या अलीकडील हल्ल्यांमध्ये सामील असलेल्या गटांना थेट मदत करेल ज्या हल्ल्यात 26 लोक मारले गेले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने बजावलेल्या प्रभावी भूमिकेचा संरक्षण मंत्र्यांनी विशेष उल्लेख केला. ज्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ अवघ्या 23 मिनिटांत उद्ध्वस्त करण्यात आले. दहशतवादाचा सामना करण्याचा भारताचा निर्धार अबाधित राहील यावर भर देत त्यांनी हवाई दलाच्या धैर्य आणि परिणामकारकता या गुणांचे कौतुक केले. “दहशतवादावर हल्ला करणे आणि त्याचा नायनाट करणे ही न्यू इंडियाची’ ‘न्यू नॉर्मल’ गोष्ट आहे,” असे ते म्हणाले.
सिंह यांनी भाषणात व्यापक भू-राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केले आणि सध्याच्या संघर्ष विरामामुळे भारताने पाकिस्तानला प्रभावीपणे ‘प्रोबेशन’ वर ठेवले आहे, असा दावा केला. सध्याचा संघर्ष विराम म्हणजे, भारत पाकिस्तानची त्याच्या वर्तणुकीच्या आधारावर चाचणी घेत आहे. वागणूक सुधारली तर ठीक, पण त्यामध्ये कसूर झाली तर कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपले नाही, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. आमची कृती ही चित्रपटाची केवळ एक झलक होती. आवश्यकता भासली, तर आम्ही संपूर्ण चित्रपट दाखवू, असा दावा त्यांनी केला.
जम्मू – काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दलांच्या जवानांची भेट घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी संरक्षणमंत्र्यांनी भुज रुद्र माता हवाई दल तळाला भेट दिली. पाकिस्तानला लागून असलेले, 508 किलोमीटर लांबीची सीमा असलेले गुजरात हे चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान पाकिस्तानने ड्रोनचा वापर करून लक्ष्य केलेल्या राज्यांपैकी एक होते. पाकिस्तानने ड्रोनचा वापर करून भुजवर हल्ला केल्याचे वृत्त आहे.
टीम भारतशक्ती