“ऑपरेशन सिंदूर हे आता भारताच्या धोरणात्मक दृष्टीकोनात निर्णायक बदल नोंदवत, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारताचे स्थापित धोरण झाले आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री उशीरा देशाला उद्देशून केलेल्या भाषणात घोषित केले. यावेळी पंतप्रधानांनी भारताच्या सुरक्षाविषयक सिद्धांताच्या तीन महत्त्वाच्या स्तंभांचे स्वरूप सांगितले :
पहिला स्तंभ म्हणजे निर्णायक प्रतिरोध, जेव्हा कोणताही दहशतवादी भारतावर हल्ला करेल तेव्हा त्याला प्रखर आणि निश्चयी प्रतिसादाला तोंड द्यावे लागेल. भारत स्वतःच्या अटींवर विरोधाची कारवाई करेल आणि दहशतवादी केंद्रांना मुळापासून उखडून टाकेल.
दुसरे म्हणजे अण्वस्त्रांच्या नावाखाली धमकी देणे; अण्वस्त्रांच्या धमक्या देऊन भारताला नमवता येणार नाही. अशी सबब सांगून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांच्या कोणत्याही सुरक्षित आश्रयस्थानांना अचूक आणि निर्णायक हल्ल्यांना तोंड द्यावे लागेल.
तिसरा मुद्दा म्हणजे दहशतवादाचे पुरस्कर्ते आणि दहशतवादी यांच्यात कोणताही फरक केला जाणार नाही; दहशतवादी नेते आणि त्यांना आश्रय देणारे सरकार यांना भारत वेगेवेगळे घटक मानणार नाही. ऑपरेशन सिंदूर सुरु असताना, संपूर्ण जगाने पुन्हा एकदा पाकिस्तानची सत्यता बघितली की कशा प्रकारे खात्मा झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेला मोठमोठ्या पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांनी खुलेआम उपस्थित राहून “पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादात” खोलवरचा सहभाग सिध्द केला आहे.
ते म्हणाले की जर पाकिस्तानला टिकून राहायचे असेल, तर त्याला त्यातील दहशतवादाचे अड्डे नष्ट करावेच लागतील — शांतीसाठी दुसरा कोणताही मार्ग नाही, असा इशाराही त्यांनी दिला. पाकिस्तानसोबतच्या चर्चेत यानंतर दहशतवादाचाच मुद्दा असेल आणि पाकिस्तानबरोबरच्या वाटाघाटी पाकव्याप्त काश्मीरच्या मुद्द्यावरच होतील.
नव्या युगातील युध्द तंत्रामध्ये देखील आपले वर्चस्व सिद्ध करतानाच भारताने युद्धात दाखवलेली उल्लेखनीय क्षमता पंतप्रधानांनी अधोरेखित केली. या मोहिमेदरम्यान आपल्या स्वदेशी संरक्षण सामग्रीची परिणामकारकता सिद्ध झाली यावर त्यांनी अधिक भर दिला. ते म्हणाले की आता जगाला 21 व्या शतकातील युध्द तंत्रातील मोठे सामर्थ्य म्हणून भारतात निर्मित संरक्षण सामग्रीच्या आगमनाचे दर्शन घडते आहे.
“ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक नाव नाही तर लाखो भारतीयांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे”, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. दहशतवाद्यांनी कधीच कल्पना केली नव्हती की, भारत इतके धाडसी पाऊल उचलेल, परंतु जेव्हा राष्ट्र प्रथम या मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्र एकजुटीने उभे राहते तेव्हा ठाम निर्णय घेतले जातात आणि परिणामकारक निकाल दिले जातात.
संपूर्ण देशाने, प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक समुदायाने, समाजातील प्रत्येक स्तराने आणि प्रत्येक राजकीय पक्षाने कशा प्रकारे एकजूट होत दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली ते पंतप्रधानांनी अधोरेखित केले. बहावलपूर आणि मुरीदके सारखी ठिकाणे दीर्घकाळापासून जागतिक दहशतवादाची केंद्रे म्हणून कार्यरत होती, त्यांचा संबंध जगभरातील मोठ्या हल्ल्यांशी जोडला गेला होता , ज्यात अमेरिकेतील 9/11 हल्ल्याचाही समावेश होता.
देशाच्या महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या प्रयत्नांचे परिणाम काय होतात, ते आता दहशतवादी संघटनांना पुरेपूर समजले असेल असे सांगत त्यांनी दहशतवादी संघटनांना कठोर इशारा दिला. दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य सरकारने सशस्त्र दलांना दिल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी खुलासा केला की, मोठ्या प्रमाणात नुकसान सहन केल्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने 10 मे रोजी दुपारी भारताच्या डीजीएमओशी संपर्क साधला. तोपर्यंत भारताने मोठ्या प्रमाणात दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या होत्या.
पाकिस्तानने त्याच्या आवाहनात भारताविरुद्ध सर्व दहशतवादी कारवाया आणि लष्करी आक्रमण थांबवण्याची हमी दिली आहे. भारत येत्या काळात पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीचे मूल्यांकन करत राहील, याची खात्री करून घेईल की, त्याच्या भविष्यातील कृती त्याच्या वचनबद्धतेशी सुसंगत आहेत.
ऐश्वर्या पारीख