फ्रान्स नेव्हल ग्रुप आणि MDL यांच्यातील पाणबुडी भागीदारीचा विस्तार

0

फ्रान्सचा नेव्हल ग्रुप आणि भारताची माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) कंपनी, यांनी पाणबुडी संदर्भातील आपल्या सामंजस्य कराराचे (MoU) नूतनीकरण केले असून, यामुळे दोन्ही संस्थांमधील भागीदारी अधिक दृढ झाली आहे. स्कॉर्पीअन श्रेणीतील पाणबुड्या मित्र राष्ट्रांना संयुक्तरित्या निर्यात करणे, हा या कराराचा उद्देश आहे.

जुलै 2023 मध्ये, या द्विपक्षीय करारावर प्रथम स्वाक्षरी झाली होती. हा करार भारताला पाणबुडी डिझाइन आणि उत्पादनासाठी जागतिक केंद्र बनविण्याच्या सामायिक बांधिलकीवर भर देतो. कराराच्या नूतनीकरणानंतर त्याची व्याप्ती विस्तारली असून, नेव्हल ग्रुप आणि MDL यांना फ्रेंच प्रगत तंत्रज्ञानासह भारतात निर्मिती करण्यात आलेल्या पुढील पिढीच्या पाणबुड्यांच्या निर्यातीसाठी, संयुक्तरित्या आंतरराष्ट्रीय संधी प्राप्त करण्याची मुभा मिळाली आहे.

भागीदारीतील हा विस्तार ‘इंडो-फ्रेंच होरायझन 2047 रोडमॅपशी’ सुसंगत आहे, ज्यामध्ये संरक्षण उत्पादन, नवोन्मेष आणि रणनीतिक स्वायत्ततेमध्ये सखोल सहकार्यावर भर देण्यात आला आहे. सोबतच, यानिमित्ताने भारत–फ्रान्स रणनीतिक भागीदारीच्या 25 वर्षांचा उत्सवही साजरा होत आहे.

“या नूतनीकृत करारातून, आम्ही साधलेली तांत्रिक भागीदारी किती दृढ झाली आहे हे अधोरेखित होते,” असे नेव्हल ग्रुपच्या कार्यकारी उपाध्यक्ष (विक्री आणि विपणन) मेरी-लॉर बुरजुआ, यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, “आम्ही MDL सोबत अधिक जवळून आणि खोलात जाऊन काम करत आहोत, जेणेकरून आमच्या विश्वासू आंतरराष्ट्रीय भागीदारांना प्रगत पाणबुडी क्षमता पुरवता येतील.” 

नेव्हल ग्रुप पाणबुडी डिझाइन आणि कॉम्बॅट सिस्टीम्स इंटिग्रेशनमधील एक्सपर्टीज उपलब्ध करून देतो, तर MDL आपली औद्योगिक क्षमता आणि भारताच्या स्वावलंबन कार्यक्रमांतर्गत पाणबुड्या वितरीत करण्यामध्ये पुढाकार घेते. दोन्ही संस्थांनी एकत्र येत, भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट 75’ अंतर्गत याआधी सहा स्कॉर्पीअन पाणबुड्या सुपूर्द केल्या आहेत.

MDL चे निवृत्त  संचालक (पाणबुड्या व हेवी इंजिनियरिंग) कमोडोर एस. बी. जमगावकर यांनी सांगितले की, “या कराराचा विस्तार हे आमच्या उच्च कार्यक्षमतेच्या प्लॅटफॉर्म्स निर्यात करण्याच्या तयारीचे प्रतीक आहे. भारतीय जहाजबांधणी क्षमतेचे जागतिक पातळीवर प्रदर्शन करण्याची ही एक संधी आहे, ज्यामागे एक विश्वासू तांत्रिक भागीदार आमच्यासोबत उभा आहे.”

स्वदेशी नवोपक्रम आणि आंतरराष्ट्रीय डिझाइनचा संगम

या MoU च्या नूतनीकरणानंतर, भारताच्या पाणबुडी आधुनिकीकरण कार्यक्रमात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे: डीआरडीओ (DRDO) द्वारे विकसित एअर-इंडिपेंडंट प्रॉपल्शन (AIP) प्रणाली भारतीय नौदलाच्या कलवरी वर्गातील पाणबुड्यांमध्ये समाकलित करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.

‘जंबोईझेशन’ (Jumboisation) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रक्रियेत, पाणबुडीच्या सिस्टीममध्ये बदल करून त्यात नवीन प्रॉपल्शन मॉड्यूल समाविष्ट केले जाते. ही अत्यंत गुंतागुंतीची अभियांत्रिकी प्रक्रिया असून, त्यासाठी अचूकता आणि तांत्रिक विश्वासार्हता आवश्यक असते. नेव्हल ग्रुप, जो या प्लॅटफॉर्मचा मूळ डिझायनर आहे, तो सिस्टीम अपग्रेड प्रक्रियेच्या या संपूर्ण काळात देखरेख, साहित्य आणि प्रशिक्षण पुरवत आहे.

“विद्यमान जागतिक प्लॅटफॉर्ममध्ये DRDO ची AIP प्रणाली समाविष्ट करणे, हे स्वदेशी नवोपक्रम आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे कसा विस्तारता येतो याचे उत्तम उदाहरण आहे,” असे लॉरेंट एस्पिनास, कार्यकारी उपाध्यक्ष – पाणबुड्या, नेव्हल ग्रुप यांनी सांगितले.

MDL ज्यांनी मूळ पाणबुड्यांची निर्मिती केली होती, ते या सुधारणा प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत आणि भारताचे मुख्य पाणबुडी निर्मिती केंद्र म्हणून आपली भूमिका पुन्हा अधोरेखित करत आहेत.

संरक्षण उत्पादन क्षमतेचा विस्तार

1960 मध्ये, शासकीय मालकीची संस्था बनल्यापासून, MDL आजच्या घडीला भारताचे आघाडीचे नौदल शिपयार्ड म्हणून नवारूपाला आले आहे. या शिपयार्डने, आतापर्यंत 800 हून अधिक जहाजे, ज्यात युद्धनौका आणि पाणबुड्यांचा समावेश आहे, त्यांची निर्मिती केली आहे. ‘प्रोजेक्ट 75’ मध्ये मिळालेल्या यशामुळे, जटिल प्लॅटफॉर्म्स सुपूर्द करण्याची क्षमता असलेली संस्था म्हणून MDL ची  आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा अधिक भक्कम झाली आहे.

भविष्यतील पाणबुडी तंत्रज्ञान

नेव्हल ग्रुपने, स्कॉर्पीअन श्रेणीमधील सुधारणा सादर केल्या आहेत, ज्यात लिथियम-आयन बॅटरी प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. या प्रणालीमुळे पाणबुडीची पाण्याखाली जास्त वेळ टिकून राहण्याची क्षमता अधिक वाढते, आवाजाची पातळी कमी होते आणि गती सुधारते. ही वैशिष्ट्ये पाणबुडीची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढवतात आणि तिच्या संभाव्य ग्राहकांना जागतिक स्तरावर आकर्षित करतात.

– टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleC-390 मिलेनियमसाठी एम्ब्रेअर-महिंद्रा यांची धोरणात्मक भागीदारी
Next articleकिशोरवयीन मुलांच्या पालकांना Meta चा विशेष अधिकार, सुरक्षेचा केला विचार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here