अलिकडच्या काळात सीमापार दहशतवादाला दिलेला सर्वात आक्रमक लष्करी प्रतिसाद म्हणजे ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही तर केवळ स्थगित करण्यात आले आहे, असे भारताने परत एकदा स्पष्ट केले आहे. पाकिस्तानसोबत वाढलेला तणाव आणि अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या जोरदार शक्ती प्रक्षेपणाच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर तिन्ही सशस्त्र दलांच्या प्रत्युत्तरातून सुरू झालेली कारवाई भारताच्या धोरणात्मक सिद्धांतातील एक निर्णायक क्षण बनली आहे. हवाई आणि जमिनीवरील हल्ल्यांना लोकांचे लक्ष लागले असले तरी, भारतीय नौदलाच्या मूक पण शक्तिशाली उपस्थितीने प्रादेशिक सागरी समीकरण बदलले आहे.
गेल्या आठवड्यात, आयएनएस विक्रांतच्या नेतृत्वाखालील भारताच्या कॅरियर बॅटल ग्रुपने पाकिस्तानी नौदलाला त्याच्या बंदरांपुरते मर्यादित ठेवून महत्त्वपूर्ण प्रतिबंधक भूमिका बजावली.
वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्याने भारतरक्षकमध्ये आलेल्या वृत्तानुसार, नौदलाने पूर्व आणि पश्चिम दोन्ही किनाऱ्यांवर क्षेपणास्त्र आणि टॉर्पेडो कवायती केल्या, ज्यामुळे या संपूर्ण क्षेत्रात भारताची संघर्ष करण्याची तयारी दर्शविली गेली.
“फक्त स्थगित”
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या पहिल्या स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवरील अधिकारी आणि खलाशांना संबोधित करताना या गोष्टीला दुजोरा दिला की ऑपरेशन फक्त स्थगित करण्यात आले आहे.
“ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेले नाही. ते फक्त स्थगित करण्यात आले आहे, हा एक इशारा आहे. जर पाकिस्तानने पुन्हा तीच चूक केली तर भारताचे उत्तर आणखी कठोर असेल,” असे संरक्षणमंत्री म्हणाले. भविष्यातील लष्करी कारवाईचा विचार अजूनही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या या वक्तव्यातून भारताच्या दृष्टिकोनात व्यापक बदल झालेला दिसून येतो – प्रतिक्रियात्मक ते पूर्व-प्रतिक्रियात्मक – जिथे दहशतवादाचा प्रतिकार जमीन, हवा आणि समुद्र या दोन्ही ठिकाणी केला जातो. मंत्र्यांनी पुढे म्हटले की भारत “सीमेच्या दोन्ही बाजूने किंवा समुद्रात” दहशतवादी घटकांविरुद्ध कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही.
पाकिस्तानला संदेश: जबाबदारीशिवाय चर्चा नाही
भारतीय नेतृत्वाने पाकिस्तानला दिलेल्या संदेशात एकमताने सांगितले आहे की दहशतवादी गटांविरुद्ध ठोस कारवाई केल्याशिवाय संवाद होऊ शकत नाही. सिंह म्हणाले की जर पाकिस्तान चर्चेबाबत गंभीर असेल तर त्यांनी हाफिज सईद आणि मसूद अझहर यांना भारताकडे सोपवून सुरुवात करावी – जे भारतीय अधिकाऱ्यांना दीर्घकाळापासून हवे होते आणि संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
“दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकत नाहीत आणि पाकिस्तानने स्वतःच्या भूमीवरील दहशतवादाची पाळेमुळे उखडून टाकली पाहिजे,” असे ते इस्लामाबादने राजनैतिक सहभागासाठी केलेल्या अलिकडच्या आवाहनाला थेट संबोधित करत म्हणाले.
परराष्ट्र मंत्रालयानेही याच मताचा पुनरुच्चार केला की, भारत-पाकिस्तान संवाद द्विपक्षीय असायला हवा आणि दहशतवाद तसेच पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय भूभाग परत करण्यावर तो केंद्रित असावा. “दहशतवाद आणि व्यापार एकत्र जाऊ शकत नाहीत तसेच पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाहीत,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, जोपर्यंत पाकिस्तान “विश्वसनीय आणि अपरिवर्तनीयपणे” सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगित ठेवण्याच्या भारताच्या निर्णयाला त्यांनी दुजोरा दिला.
नौदल : एक धोरणात्मक संकेत
पारंपरिक प्रतिबंधात्मक शक्तीच्या पलीकडे जाऊन, ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय नौदलाची राष्ट्रीय जलक्षेत्राबाहेर परिणाम घडविण्यास सक्षम अशी एक धोरणात्मक शक्ती म्हणून विकसित होत असलेली भूमिका अधोरेखित केली आहे. पहलगाम हल्ल्याच्या ९६ तासांच्या आत, भारतीय युद्धनौका समुद्रात होत्या, एकात्मिक क्षेपणास्त्र कवायती करत होत्या आणि सागरी क्षेत्रातील वर्चस्व दाखवत होत्या.
“आमच्या पश्चिमी ताफ्याच्या जहाजांनी काही दिवसांतच क्षेपणास्त्रांचा मारा केला ज्यामुळे आमची लढाऊ तयारी आणि हेतू दिसून आला,” असे सिंह म्हणाले, नौदलाच्या समुद्रातील उपस्थितीमुळे पाकिस्तानी बाजूने होणाऱ्या कोणत्याही हालचाली निष्प्रभ झाल्या.
नौदलाच्या अभिमानाचे नवीन प्रतीक असलेल्या स्वदेशी बनावटीच्या आयएनएस विक्रांतने आपले महत्त्व गमावलेले नाही. ऑपरेशन सिंदूरमधील त्याच्या तैनातीने 1961 मध्ये गोवा मुक्तीदरम्यान त्याच्या ऐतिहासिक पूर्वसुरींनी पार पाडलेल्या भूमिकेचे प्रतिबिंब बघायला मिळाले, ज्यामुळे भारताच्या सागरी संकल्पाची सातत्यता बळकट झाली.
बंदुकीच्या गोळ्यांपलीकडे
भारताचा संदेश स्पष्ट आहे: दहशतवाद हा आता कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा म्हणून न पाहता राष्ट्रीय सुरक्षेला असणारा धोका म्हणून हाताळला जाईल आणि त्यासाठी लष्करी प्रतिसादाची आवश्यकता आहे.
सिंह यांनी आपल्या भाषणाचा शेवट या गोष्टीवर भर देऊन केला की भविष्यातील संघर्ष जमीन, समुद्र, हवाई, सायबर आणि डेटा अशा अनेक क्षेत्रांमध्ये लढले जातील.
“आज, नौदल केवळ हिंद महासागराचा पहारेकरी नाही तर तो जागतिक शक्ती म्हणून भारताच्या उदयाचे प्रतीक आहे,” असे ते म्हणाले. जलद तयारी, एकात्मिक क्षमता आणि धोरणात्मक प्रक्षेपण या गुणांसाठी त्यांनी नौदलाचे कौतुक केले.
टीम भारतशक्ती