पुढील महिन्यात पंतप्रधान मोदी जेव्हा ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांची भेट घेतील तेव्हा त्यांच्या ब्राझील दौऱ्याचा मुख्य उद्देश धोरणात्मक भागीदारी मजबूत करणे हा असेल.
ही बैठक पंतप्रधान मोदींच्या रिओ दि जानेरो येथे होणाऱ्या 17 व्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर 5 ते 8 जुलै दरम्यान होणाऱ्या ब्राझीलच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींच्या चर्चेत व्यापार विस्तार, संरक्षण सहकार्य, ऊर्जा सहकार्य, तांत्रिक नवोपक्रम आणि लोकांमधील संबंध या मुद्द्यांचा समावेश असेल.
धोरणात्मक प्राधान्ये
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष लुला यांच्यात भारत – ब्राझीलमधील ऊर्जा, कृषी, संरक्षण, आरोग्यसेवा आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. दोन्ही देश संस्थात्मक संबंध मजबूत करण्याचा तसेच अंतराळ संशोधन आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या क्षेत्रात नवीन उपक्रमांचा शोध घेण्याचा विचार करत आहेत.
ब्राझीलच्या एरोस्पेस प्रमुख एम्ब्रेअरने अलीकडेच नवी दिल्लीत पूर्ण मालकीची उपकंपनी सुरू करून भारतात आपला विस्तार केला आहे. हे पाऊल भारताच्या ‘मेक इन इंडिया’ मोहिमेशी सुसंगत असून भारतीय एरोस्पेस तसेच संरक्षण परिसंस्थेत एम्ब्रेअरची वाढती भूमिका प्रतिबिंबित करणारे आहे.
दोन्ही देश महिंद्रा डिफेन्स सिस्टम्सच्या सहकार्याने भारताच्या मध्यम वाहतूक विमान कार्यक्रमासाठी एम्ब्रेअरच्या C90 मिलेनियम विमानासारख्या संयुक्त उपक्रमांवर देखील काम करत आहेत.
दरम्यान, भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड रिओ दि जानेरो येथे आपले पहिले दक्षिण अमेरिकन कार्यालय उघडण्यास सज्ज आहे, ज्यामुळे संरक्षण औद्योगिक संबंध मजबूत होतील.
ब्राझील सध्या त्याच्या हवाई संरक्षण आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताच्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीचे मूल्यांकन करत आहे. हे क्षेपणास्त्र त्याच्या उच्च-उंची आणि बहु-लक्ष्य संलग्नता क्षमतांसाठी ओळखले जाते.
ऊर्जा आणि अन्न सुरक्षा
इथेनॉल उत्पादन आणि फ्लेक्स-फ्युएल वाहन तंत्रज्ञानात ब्राझील हा जागतिक स्तरावर आघाडीवर असल्याने, भारत त्याच्या अक्षय्य ऊर्जा आणि वाहतूक इंधन धोरणांमध्ये ब्राझीलचे कौशल्य एकत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि ब्राझीलच्या सीएनपीईएममध्ये जैवऊर्जा संशोधनावर आधीच सहकार्य सुरू आहे.
कृषी क्षेत्रात, भारताच्या व्यापक अन्न सुरक्षा अजेंडाचा भाग म्हणून, ब्राझीलमधून सोया तेल, डाळी आणि इतर कृषी उत्पादनांची आयात वाढवण्यासाठी चर्चा सुरू आहे. दोन्ही देश भारतीय वंशाच्या झेबू गुरांच्या प्रजननात ब्राझीलच्या प्रगतीचा फायदा घेत, गुरांच्या जीनोमिक्सवरील सहयोगी प्रकल्पांमध्ये देखील गुंतलेले आहेत.
ब्राझीलमधील एक्झिम बँक
भारताची एक्झिम बँक देखील द्विपक्षीय व्यापाराला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहे, पुढील महिन्यात साओ पाउलो येथे त्यांची पहिली लॅटिन अमेरिकन शाखा उघडण्याची योजना आहे. हे कार्यालय संरक्षण आणि पायाभूत सुविधांमधील संयुक्त उपक्रमांना आर्थिक पाठबळ प्रदान करेल, ज्यामुळे दशकाच्या अखेरीस एक प्रमुख संरक्षण निर्यातदार बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेला बळकटी मिळेल.
हुमा सिद्दीकी