इस्तंबूल येथे पार पडलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील शांतता बैठकीत किमान काहीतरी मानवतावादी दृष्टीने घेतलेले निर्णय बघायला मिळाले आहेत. दोन्ही देशांनी अधिकाधिक युद्धकैद्यांची देवाणघेवाण करण्यास आणि 12 हजार मृत सैनिकांचे मृतदेह परत करण्यास सहमती दर्शविली.
युद्ध करणारे हे दोन्ही देश तुर्की शहरात अवघ्या एक तासासाठी भेटले. मार्च 2022 नंतर वाटाघाटींची ही दुसरीच वेळ होती.
तुर्कीचे अध्यक्ष तैय्यप एर्दोगान यांनी बैठक उत्तमपणे पार पडली असे याचे वर्णन केले. याशिवाय रशियाचे व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे वोलोदिमिर झेलेन्स्की यांना तुर्कीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीसाठी एकत्र आणण्याची आशादेखील व्यक्त केली.
मात्र युक्रेन, त्याचे युरोपीय मित्र आणि वॉशिंग्टन या सर्वांनी रशियावर दबाव आणून जी प्रस्तावित युद्धबंदी स्वीकारण्याचा आग्रह केला आहे त्यावर मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.
रशियाच्या मते ते युद्धविराम नाही तर दीर्घकालीन तोडगा शोधत आहेत; युक्रेनने मात्र पुतीन यांना शांतता प्रस्थापित करण्यात जराही रस नसल्याचा आरोप केला आहे.
क्रेमलिनचे सहाय्यक व्लादिमीर मेडिन्स्की म्हणाले की रशियन वाटाघाटीकर्त्यांनी युक्रेनच्या वाटाघाटीकर्त्यांकडे पूर्ण युद्धबंदीसाठी मॉस्कोच्या अटींचे वर्णन करणारे एक तपशीलवार निवेदन सादर केले आहे.
रशियन पथकाचे प्रमुख असलेले मेडिन्स्की म्हणाले की मॉस्कोने “युद्धभूमीवरील काही भागात दोन ते तीन दिवसांची विशिष्ट युद्धबंदी” सुचवली आहे जेणेकरून मृत सैनिकांचे मृतदेह गोळा करता येतील.
दोन्ही देशांनी सांगितले की ते 6 हजार मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांचे मृतदेह एकमेकांना सोपवतील.
याव्यतिरिक्त, युद्धकैद्यांची मोठी देवाणघेवाण करायला उभय देशांनी मान्यता दिली आहे, कारण 15 मे रोजी इस्तंबूलमध्ये पहिल्या फेरीच्या चर्चेनंतर प्रत्येक बाजूच्या हजार युद्धकैद्यांची देवाणघेवाण झाली.
कीवच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तेम उमरोव्ह म्हणाले की, नवीन देवाणघेवाणीत युद्धात गंभीर जखमी झालेले आणि तरुण सैनिक यांना प्राधान्य दिले जाईल.
उमरोव्ह यांनी असेही म्हटले की मॉस्कोने युक्रेनला शांतता कराराचा मसुदा सुपूर्द केला आहे आणि कीव – ज्याने स्वतःचा एक मसुदा तयार केला आहे – या रशियन मसुद्याचे पुनरावलोकन करेल.
युक्रेनने जूनच्या अखेरीस अधिक चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला असला तरी झेलेन्स्की आणि पुतीन यांच्यातील बैठकच वादाचे अनेक प्रश्न सोडवू शकते असा आम्हाला विश्वास आहे, असे उमरोव्ह म्हणाले.
झेलेन्स्की यांचे चीफ ऑफ स्टाफ, आंद्री येरमाक यांनी सांगितले की कीवच्या शिष्टमंडळाने रशियाला हद्दपार करण्यात आलेल्या मुलांची यादी परत करण्याची विनंती केली होती.
मॉस्को म्हणतो की अशा मुलांना लढाईपासून वाचवण्यासाठी हलवण्यात आले होते. मेडिन्स्की म्हणाले की युक्रेनच्या यादीत 339 नावे आहेत. ही मुले चोरली गेलेली नसून त्यांना “वाचवण्यात आले आहे.”
इस्तंबूल बैठकीच्या यशस्वीतेची अपेक्षा खूपच कमी
युक्रेनने एक दिवस आधी युद्धातील सर्वात महत्त्वाकांक्षी हल्ल्यांपैकी एक हल्ला केला होता, ज्यामध्ये सायबेरिया आणि इतरत्र रशियन अणु-सक्षम लांब पल्ल्याच्या बॉम्बर विमानांना लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता. रशियानेही प्रत्युत्तरादाखल मोठा ड्रोन हल्ला केला होता.
दोन्ही देश वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रम्प यांना शांतता प्रक्रियेत गुंतवून ठेवण्यास उत्सुक असले तरी, सोमवारी झालेल्या बैठकीत यश मिळण्याची अपेक्षा कमी होती.
युक्रेन रशियाच्या आजपर्यंतच्या दृष्टिकोनाला शरणागती पत्करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न मानतो – कीव म्हणतो की ते कधीही करणार नाही – तर मे महिन्यात युद्धभूमीवर सहा महिन्यांत सर्वात वेगाने पुढे गेलेल्या मॉस्कोचे म्हणणे आहे की कीवने रशियन अटींवर शांततेला शरण जावे अन्यथा अधिक प्रदेश गमावावा लागेल.
गेल्या जूनमध्ये युद्धाच्या तात्काळ समाप्तीसाठी पुतीन यांनी सुरुवातीच्या अटी मांडल्या: युक्रेनने पश्चिम नाटो युतीमध्ये सामील होण्याची आपली महत्त्वाकांक्षा सोडून द्यावी आणि रशियाच्या ताब्यात असलेल्या आणि मोठ्या प्रमाणात नियंत्रित असलेल्या चार युक्रेनियन प्रदेशांमधून आपले सैन्य मागे घ्यावे.
युक्रेनने तयार केलेल्या प्रस्तावित रोडमॅपनुसार, कोणत्याही शांतता करारानंतर कीवला त्याच्या लष्करी ताकदीवर कोणतेही निर्बंध नकोत, मॉस्कोच्या सैन्याने ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या काही भागांवर रशियन सार्वभौमत्वाची आंतरराष्ट्रीय मान्यता नको आणि नुकसानभरपाई नको.
युद्ध करणाऱ्या पक्षांमध्ये शाश्वत शांततेच्या दिशेने होणारी अपेक्षित प्रगती कमी असली तरी, ते एकमेकांच्या विरुद्ध बसले आहेत ही वस्तुस्थिती कधीही न संपणाऱ्या युद्धामध्ये थोडीफार आशा निर्माण करणारी आहे.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)