अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात टेलिफोन संभाषण झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच रशियाने कीववर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात एकजण ठार तर किमान 23जण जखमी झाले. याशिवाय राजधानीतील अनेक इमारतींचे नुकसान झाले, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.
रशियाच्या हवाई दलाने एकूण 539 ड्रोन्स आणि 11 क्षेपणास्त्रे सोडली. त्यामुळे संध्याकाळपासून पहाटेपर्यंत हवाई हल्ल्याचे सायरन, कामिकाझे ड्रोन्सचे आवाज आणि जोरदार स्फोटांचे आवाज ऐकू येत होते असं युक्रेनच्या हवाई अधिकाऱ्यांनी सांगितले.
भीतीमुळे घाबरलेल्या कुटुंबांनी आश्रयासाठी भूमिगत मेट्रो स्टेशनचा आसरा घेतला. या हल्ल्यांनंतर शहराच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात धूर पसरला होता. कीवच्या लष्करी प्रशासन प्रमुखांनी शुक्रवारी दुपारी सांगितले की हल्ल्या झाल्यानंतर एका ठिकाणाच्या ढिगाऱ्यात एक मृतदेह सापडला आहे.
ड्रोनने नुकसान झालेल्या एका उंच इमारतीच्या बाहेर, आपात्कालीन कामगारांचे काम सुरू असताना रहिवासी घटनास्थळाचे निरीक्षण करत उभे होते. काही रडत होते. तर इतर शांतपणे हे सगळे पाहत होते.
“स्फोटांच्या आवाजाने मी जागी झाले, प्रथम शाहेद ड्रोन्सचे आवाज ऐकू यायला लागले आणि नंतर स्फोटांची मालिकाच सुरू झाली,” असे 40 वर्षीय रहिवासी मारिया हिलचेन्को म्हणाल्या.
“मग लोक बाहेर ओरडू लागले. शाहेद ड्रोन्सचा मारा होतच राहिला.” शाहेद ड्रोन हे इराणी डिझाइनचे आहेत, ज्याचा एक प्रकार आता रशियामध्ये बनवला जातो.
अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याला “जाणीवपूर्वक करण्यात आलेला प्रचंड नुकसान करणारा निंदनीय” हल्ला असे म्हटले, पुतीन आणि ट्रम्प यांच्या टेलिफोनिक कॉलची बातमी येताच पहिला सायरन वाजल्याची नोंद झाली आहे.
शुक्रवारी नंतर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत “अवकाश हल्ल्यांपासून रक्षण” करण्याच्या दृष्टीने कीवची क्षमता वाढवण्यावर काम करण्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले की संयुक्त संरक्षण उत्पादन, तसेच संयुक्त खरेदी आणि गुंतवणुकीवरही यावेळी चर्चा झाली. कमी साठ्याच्या चिंतेमुळे अमेरिकेने क्षेपणास्त्रांचे काही वितरण थांबवले आहे.
कीवच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हल्ल्यात कीवच्या 10 पैकी 6 जिल्ह्यांमधील सुमारे 40 अपार्टमेंट ब्लॉक, प्रवासी रेल्वे पायाभूत सुविधा, पाच शाळा आणि बालवाडी, कॅफे आणि अनेक गाड्यांचे नुकसान झाले. पोलंडने म्हटले आहे की मध्य कीवमध्ये त्यांच्या दूतावासाच्या कॉन्सुलर विभागाचे नुकसान झाले आहे. मात्र कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झालेली नाही.
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा म्हणाले की कीववर हल्ला करणाऱ्या शाहेद ड्रोनपैकी एका ड्रोनमध्ये चिनी पार्ट सापडला आहे, जो दक्षिणेकडील ओडेसा शहरातील चीनच्या वाणिज्य दूतावासावर झालेल्या एका वेगळ्या हल्ल्यात किरकोळ नुकसान झाल्यानंतर लगेचच सापडला.
अलिकडच्या आठवड्यात कीववरील रशियन हवाई हल्ले अधिक तीव्र झाले असून त्यात तीस लाख लोकसंख्येच्या शहरावर युद्धातील काही सर्वात घातक हल्ले समाविष्ट आहेत.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ड्रोन कारखाने, लष्करी हवाई क्षेत्र आणि तेल शुद्धीकरण हे लक्ष्य होते, ज्यावर त्यांनी कीवमध्ये उच्च-अचूक शस्त्रांनी हल्ला केला. युक्रेनने कोणत्याही लष्करीदृष्ट्या मौल्यवान लक्ष्यांचा तपशील दिलेला नाही.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)