ईशान्य सीरियातील कुर्दिश सैन्याच्या नेत्याने शुक्रवारी सांगितले की त्यांच्या गटाने तुर्कीशी थेट संपर्क साधला असून तुर्कीचे अध्यक्ष तैय्यप एर्दोगान यांची भेट घेण्याची शक्यता आहे. याद्वारे संबंध सुधारण्याची आमची तयारी असल्याचे मत त्याने व्यक्त केले.
ही सार्वजनिक विधाने म्हणजे मजलूम अब्दी याच्याकडून एक महत्त्वपूर्ण राजनैतिक पुढाकार घेतला गेल्याचे दर्शवतात. त्याच्या सीरियन डेमोक्रॅटिक फोर्सेसने गेली १४ वर्ष सुरू असणाऱ्या गृहयुद्धात तुर्की सैन्य आणि अंकारा समर्थित सीरियन बंडखोरांशी लढा दिला आहे.
तुर्कीने म्हटले आहे की एसडीएफच्या केंद्रस्थानी असलेला मुख्य कुर्दिश गट दहशतवादी कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (पीकेके) पासून वेगळा नाही. याच गटाने या महिन्याच्या सुरुवातीला तुर्कीशी ४० वर्षांच्या संघर्षानंतर युद्धविराम करण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीत अब्दीने प्रादेशिक मीडिया शम्स टीव्हीला सांगितले की त्याचा गट तुर्कीशी संपर्कात आहे. मात्र हा संपर्क किती काळापासून आहे ते मात्र उघड करण्यात आलेले नाही.
“आम्ही थेट संबंध साधला आहे, तुर्कीशी संपर्क माध्यमातून, तसेच मध्यस्थांद्वारे, आणि आम्हाला आशा आहे की हे संबंध अधिक विकसित होतील,” असा विश्वास अब्दीने व्यक्त केला. तुर्कीने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
त्याने नमूद केले की आमचे सैन्य आणि तुर्की सैनिक यांनी “एकमेकांशी दीर्घकाळ युद्धे केली” परंतु गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षांना तात्पुरत्या युद्धबंदीमुळे विराम मिळाला आहे. अब्दी म्हणाला की त्यांना आशा आहे की युद्धबंदी कायमस्वरूपी होईल.
एर्दोगान यांच्याशी चर्चा?
एर्दोगान यांना भेटण्याचा तुमचा विचार आहे का असे विचारले असता, कुर्दिश नेत्याने सांगितले की सध्या आपला असा कोणताही विचार नाही. मात्र याला “मी विरोध करत नाही… आम्ही तुर्कीसोबत युद्धाच्या स्थितीत नाही आणि भविष्यात आमच्यात संबंध विकसित होऊ शकतात. आम्ही यासाठी प्रयत्नशील आहोत.”
अल-मॉनिटर न्यूज वेबसाइटने शुक्रवारी वृत्त दिले की तुर्कीने अब्दी आणि एका उच्च तुर्की अधिकाऱ्यामध्ये जे कदाचित तुर्कीचे परराष्ट्र मंत्री किंवा त्यांचे गुप्तचर प्रमुख असतील यांच्यात बैठक व्हावी असा प्रस्ताव ठेवला आहे.
डिसेंबरमध्ये, बंडखोर गटांनी दमास्कसकडे प्रगती केल्यानंतर आणि बशर अल-असद यांना पदच्युत केल्यानंतर उसळलेल्या संघर्षानंतर तुर्की आणि एसडीएफ यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धबंदीवर सहमती दर्शवली.
मार्चमध्ये अब्दी याने सीरियाचे अंतरिम अध्यक्ष अहमद अल-शारा यांच्याशी ईशान्य सीरियाच्या अर्ध-स्वायत्त प्रशासनाला दमास्कसमधील मुख्य राज्य संस्थांमध्ये समाविष्ट करण्यासाठी करार केला.
गुरुवारी, एर्दोगान यांनी एसडीएफवर त्या कराराची अंमलबजावणी “रद्द” केल्याचा आरोप केला.
मुलाखतीत, अब्दी याने एसडीएफ इस्रायलशी संपर्कात असल्याचा आरोप फेटाळून लावला.
“लोकांनी आमच्यावर हे आरोप केले आहेत. या मुलाखतीत, मी जाहीरपणे सांगत आहे की आमचे इस्रायलशी कोणतेही संबंध नाहीत,” असे तो म्हणाला.
आपला गट सीरियाच्या शेजाऱ्यांशी चांगल्या संबंधांना पाठिंबा देतो, असे त्याने मुलाखतीत सांगितले. त्यावर यामध्ये इस्रायलचा समावेश आहे का असे विचारले असता, अब्दी याचे उत्तर होते, “सर्वांशी.”
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)