आता परदेशी चित्रपटांवर 100 टक्के कर लावण्याची ट्रम्प यांची घोषणा

0
ट्रम्प
हॉलिवूड साइन. (रॉयटर्स/मारियो अँझुओनी/फाइल फोटो)

परदेश निर्मित चित्रपटांवर 100 टक्के कर लावण्याची घोषणा रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. त्यांनी म्हटले की हॉलिवूड “अतिशय जलद गतीने” मृत्युपंथाला लागले आहे कारण इतर देश चित्रपट निर्मितीला उदारतेने देत असलेले प्रोत्साहन चित्रपट निर्मात्यांना आकर्षित करत आहेत. 

“हा इतर देशांचा एकत्रित प्रयत्न आहे आणि म्हणूनच, राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे. इतर सर्व गोष्टींव्यतिरिक्त, हा एक संदेश आणि प्रचारतंत्र आहे,” असे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

पुन्हा एकदा अमेरिकेत चित्रपट बनवा

ट्रम्प म्हणाले की ते संबंधित सरकारी संस्थांना, जसे की वाणिज्य विभागाला, परदेशात बनवलेल्या आणि नंतर युनायटेड स्टेट्समध्ये पाठवल्या जाणाऱ्या सर्व चित्रपटांवर 100 टक्के  कर लादण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्याचे आदेश देत आहेत.

त्यांनी पुढे म्हटले: “आम्हाला पुन्हा एकदा अमेरिकेत बनवलेले चित्रपट हवे आहेत!” वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी एक्स वर पोस्ट करताना म्हटले आहे की: “आम्ही यावर काम करत आहोत.”

लुटनिक किंवा ट्रम्प दोघांनीही हे कर कसे लागू केले जातील याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

कोणतीही स्पष्टता नाही

हे कर स्ट्रीमिंग सेवा तसेच थिएटरमध्ये दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांना लागू होतील की नाही, किंवा ते उत्पादन खर्च किंवा बॉक्स ऑफिसच्या उत्पन्नाच्या आधारे मोजले जातील याबाबतचे चित्र अजूनही स्पष्ट  झालेले नाही. हॉलिवूडचे अधिकारी रविवारी रात्री तपशीलवार माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. प्रमुख स्टुडिओचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मोशन पिक्चर असोसिएशनने त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

जानेवारीमध्ये, ट्रम्प यांनी हॉलिवूडला “पूर्वीपेक्षा मोठे, चांगले आणि अधिक सक्षम बनवण्यासाठी हॉलिवूडचे दिग्गज जॉन व्होइट, सिल्वेस्टर स्टॅलोन आणि मेल गिब्सन यांची नियुक्ती केली.

इतरत्र चांगले प्रोत्साहन

चित्रपट आणि टीव्ही निर्माते गेल्या काही वर्षांपासून हॉलिवूडमधून बाहेर पडत असून  कर सवलती मिळत असलेल्या ठिकाणी जात आहे ज्यामुळे चित्रीकरण स्वस्तात होते.

जगातील विविध देशांनी निर्मिती आकर्षित करण्यासाठी आणि अँपिअर विश्लेषणाच्या अंदाजानुसार २०२५ मध्ये जगभरात सामग्री निर्मितीसाठी खर्च होणाऱ्या २४८ अब्ज डॉलर्समध्ये मोठा वाटा मिळविण्यासाठी क्रेडिट्स आणि रोख सवलती यांच्यात भरघोस वाढ केली आहे.

वॉल्ट डिस्ने, नेटफ्लिक्स आणि युनिव्हर्सल पिक्चर्ससह सर्व प्रमुख मीडिया कंपन्या कॅनडा आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये चित्रपट बनवतात.

2023 मध्ये, 40 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त बजेट असलेल्या चित्रपट आणि टीव्ही प्रकल्पांवर करण्यात आलेला सुमारे अर्धा खर्च अमेरिकेबाहेर गेला, असे संशोधन फर्म प्रोडप्रोने म्हटले आहे.

हॉलिवूड नगरी लॉस एंजेलिसमध्ये गेल्या दशकात चित्रपट आणि टेलिव्हिजन निर्मिती जवळजवळ 40 टक्क्यांनी कमी झाली आहे, असे या प्रदेशातील निर्मितीचा मागोवा घेणाऱ्या एक ना-नफा संस्था FilmLAने म्हटले आहे.

अमेरिकेला मिळणारी पसंती कमी होत आहे

जानेवारीच्या वणव्यामुळे निर्माते आता लॉस एंजेलिसच्या बाहेर पाहू शकतात. याशिवाय  कॅमेरा ऑपरेटर, पोशाख डिझायनर, ध्वनी तंत्रज्ञ आणि पडद्यामागील इतर कामगार त्यांच्या परिसरात   पुन्हा एकदा प्रयत्न करण्याऐवजी शहराबाहेर जाऊ शकतात अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रोडप्रो अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की  पुढील दोन वर्षांत टोरंटो, ब्रिटन, व्हँकुव्हर, मध्य युरोप आणि ऑस्ट्रेलियानंतर चित्रपटांसाठी कॅलिफोर्नियाला पसंतीचे ठिकाण म्हणून सहावा क्रमांक मिळाला आहे.

हॉलिवूडचे निर्माते आणि कामगार संघटना इतर ठिकाणांशी चांगली स्पर्धा करण्यासाठी राज्याच्या कर सवलतींमध्ये भरघोस वाढ करण्यासाठी गव्हर्नर गॅविन न्यूसम यांना विनंती करत आहेत.

‘आणखी खूप काही गमावायचे आहे’

ट्रम्प यांचे प्रस्तावित चित्रपट कर आकारणी निर्णय त्यांच्या प्रशासनाने सुरू केलेल्या शुल्कवाढीमुळे उडालेल्या व्यापार संघर्षांच्यानंतर आले आहे, ज्यामुळे बाजारपेठेत परत एकदा खळबळ उडाली असून अमेरिकेच्या मंदीची भीती निर्माण झाली आहे.

सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजचे वरिष्ठ सहकारी असलेले माजी वरिष्ठ वाणिज्य अधिकारी विल्यम रीन्श म्हणाले की, ट्रम्प यांचे चित्रपट शुल्काविरूद्ध सूड उगवणे विनाशकारी ठरेल.

“या प्रत्युत्तरामुळे आपल्या उद्योगाचा नाश होईल. आपल्याला मिळवण्यापेक्षा गमावण्यासारखे बरेच काही आहे,”  असे ते म्हणाले, चित्रपट हे राष्ट्रीय सुरक्षा किंवा राष्ट्रीय आणीबाणीचा विषय बनवणे कठीण होईल याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)


Spread the love
Previous articleIranian Foreign Minister In Islamabad Amid India-Pakistan Standoff
Next articleभारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्रमंत्री इस्लामाबादमध्ये दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here