अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यांनी शनिवारी जाहीर केले की, ते सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करणार आहेत. ही चर्चा तुर्कस्तानमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात झालेल्या थेट चर्चेनंतर होणार आहे. युक्रेनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “रशियन चर्चापथकाने युद्धविरामास पूर्वशर्त म्हणून युक्रेनने डोनेत्स्क, झापोरीझ्झिया, खेरसोन आणि लुहान्स्क या रशियाने दावा केलेल्या प्रदेशांतून आपले सैन्य मागे घ्यावे,” अशी मागणी केली.
मॉस्कोमध्ये क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी सांगितले की, “ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील चर्चेसाठी तयारी सुरू आहे.” मात्र, त्यांनी चर्चेच्या अटींवर भाष्य करण्यास नकार दिला. शुक्रवारी रशिया-युक्रेन प्रतिनिधींमध्ये, मार्च 2022 नंतर प्रथमच प्रत्यक्ष बैठक झाली. ही बैठक केवळ 1 तास 40 मिनिटांची झाली आणि त्यात प्रत्येकी 1,000 युद्धकैद्यांच्या अदलाबदलीवर सहमती झाली, मात्र अदलाबदलीची तारीख अद्याप ठरवली गेलेली नाही.
Truth Social द्वारे ट्रम्प यांनी सांगितले की, “ते सोमवारी सकाळी 10 वाजता (पूर्व अमेरिकन वेळेनुसार) पुतिन यांच्याशी बोलणार आहेत आणि त्यानंतर ते झेलेन्स्की आणि NATO सदस्यांशी चर्चा करतील. गेल्या आठवड्यात आखाती देशांमध्ये असताना, यासंबंधीच्या चर्चेसाठी तुर्कस्तानात येण्याची तयारी दर्शवली होती, जर पुतिनही तिथे आले असते. मात्र, पुतिन यांनी चर्चेसाठी आपले पथक पाठवले.”
रशियन परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि अमेरिकेच्या ‘सकारात्मक भूमिकेचे’ स्वागत केले. रुबिओ यांनी CBS ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “रशियन बाजू युद्धविरामासाठी काही अटी आणि कल्पना पुढे आणत आहे. माझ्या मते तुमचा प्रश्न असा आहे की, ते आपल्याला फसवत आहेत का? त्यांनी पुढे म्हटले, ‘हेच आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत.” रुबिओ रोममध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “व्हॅटिकन हे भविष्यातील रशिया-युक्रेन चर्चेसाठी एक संभाव्य स्थळ ठरू शकते.”
अमेरिका आणि युरोपियन देशांसह, युक्रेनने रशियाकडून त्वरित आणि कोणत्याही अटींशिवाय किमान 30 दिवसांसाठी युद्धविराम स्विकारण्याची मागणी केली आहे. मात्र युक्रेनच्या एका स्रोताने सांगितले की, “रशियन चर्चापथकाने युक्रेनी सैन्याने डोनेत्स्क, झापोरीझ्झिया, खेरसोन आणि लुहान्स्कमधून माघार घेण्याची मागणी केली आणि युद्धविराम हा केवळ त्यानंतरच होऊ शकतो,” असे त्यांनी म्हटले. या आणि इतर मागण्या, अमेरिकेने गेल्या महिन्यात मॉस्कोशी सल्लामसलत करून सुचवलेल्या मसुदा शांतता कराराच्या अटींपेक्षा अधिक आहेत.
पेस्कोव्ह यांनी युक्रेनच्या म्हणण्यावर भाष्य करण्यास नकार दिला आणि सांगितले की, “चर्चा पूर्णपणे बंद दरवाजामागे व्हायला हवी. चर्चेचा पुढील टप्पा असेल, युद्धकैद्यांची अदलाबदल पूर्ण करणे आणि दोन्ही देशांमध्ये पुढील काम करणे.” पेस्कोव्ह म्हणाले की, “पुतिन आणि झेलेन्स्की यांच्या भेटीची शक्यता आहे, पण ‘विशिष्ट करार’ झाल्यानंतरच,” ज्याबाबत त्यांनी अधिक बोलणे टाळले.
तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप एर्दोगान यांनी सांगितले की, “चर्चेसाठी यजमान देश म्हणून तुर्कस्तानने मध्यस्थी सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे. शुक्रवारी झालेल्या चर्चेनंतर, युक्रेनने रशियाविरोधात अधिक कठोर कारवाईसाठी आपल्या सहयोगी देशांमध्ये पाठिंबा मागायला सुरुवात केली.”
ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लाम्मी यांनी रॉयटर्सला पाकिस्तान दौऱ्यादरम्यान सांगितले की, “पुन्हा एकदा रशिया याबाबत गंभीर नाही. आपण पुतिनला ‘बस, पुरे झाले’ कधी म्हणणार?”.. याशिवाय फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही, इस्तंबूलमधील चर्चा निष्फळ ठरल्याचे सांगितले.
“आज आपल्याकडे काय आहे? काहीच नाही. आणि म्हणूनच मी सांगतो की, पुतिन यांच्या या दांभिकतेपुढे अमेरिकेची विश्वसनीयता लक्षात घेता ट्रम्प योग्य प्रतिसाद देतील, याची मला खात्री आहे,” असे मॅक्रॉन यांनी सांगितले.
युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला फॉन डेर लायन यांनी सांगितले की, “युरोपियन युनियन रशियावर नवीन निर्बंधांची तयारी करत आहे.” फ्रान्सने याच आठवड्यात सुचवले होते की, हे निर्बंध रशियन अर्थव्यवस्थेचा “दम घोटवणारे” असावेत. मात्र गेली तीन वर्षे सातत्याने निर्बंध लादल्यानंतरही, आता त्याचा प्रभाव किती शिल्लक राहिला आहे हे स्पष्ट नाही.
पश्चिम देश आणि युक्रेन पुतिनला युद्धविराम स्वीकारण्यासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करत असताना, ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळे अनेकदा त्यांची रणनीती डगमगली आहे. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना तुर्कस्तानमध्ये रशियाशी थेट चर्चा स्विकारण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यानंतर ते म्हणाले की, ‘शांततेच्या दिशेने पुढे जायचे असेल, तर प्रथम पुतिन यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीशिवाय ते शक्य नाही.’
क्रेमलिनचा अधिकृत दृष्टिकोनानुसार, पुतिन ट्रम्प यांची भेट घेतील, पण हे शिखरसंमेलन अगदी काळजीपूर्वक नियोजनानंतरच घडवून आणले जाईल.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)