शांतता चर्चेच्या पूर्वसंध्येला, युक्रेन आणि रशियाने त्यांच्या संघर्षातील सर्वात मोठ्या ड्रोन हल्ल्यांपैकी एका हल्ल्यात, रशियातील प्रवासी ट्रेनखालील पूल उडवत आणि सायबेरियामध्ये अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या बॉम्बर विमानांवर निशाणा साधत, युद्धाला अधिक तीव्र केले.
काही दिवसांच्या अनिश्चिततेनंतर, युक्रेन शांतता चर्चांमध्ये सहभागी होईल की नाही, हे स्पष्ट नव्हते. परंतु राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, “संरक्षणमंत्री रस्टेम उमेरोव, हे सोमवारी इस्तंबूलमध्ये रशियन अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील थेट शांतता चर्चांमध्ये सहभागी होतील.”
पहिल्या टप्प्यातील शांतता चर्चांना एक आठवड्याभरापूर्वीच सुरुवात झाली होती. ज्यामध्ये युद्धातील आजवरची सर्वात मोठी कैद्यांची देवाणघेवाण घडून आली, पण युद्ध थांबवण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.
एकीकडे शांततेबाबत चर्चा सुरू असताना, प्रत्यक्षात मात्र युद्ध सुरूच होते.
रशियाच्या ब्रायांस्क भागात, जो युक्रेनच्या सीमेला लागून आहे, एका प्रवासी ट्रेनखालील महामार्ग पुल उडवण्यात आला. ट्रेनमध्ये 388 प्रवासी होते. या स्फोटात किमान सात जण ठार झाले आणि 69 जण जखमी झाले.
युक्रेनने रशियाच्या सायबेरियामधील लष्करी बेसवर असलेल्या लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रधारी बॉम्बर्सवर हल्ला केला, असे युक्रेनच्या गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले. ही हल्ल्याची घटना प्रत्यक्ष युद्धरेषेपासून 4,300 किलोमीटर अंतरावर घडली.
युक्रेनच्या गुप्तचर संस्था SBU ने, ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ या नावाने हल्ला केल्याचे मान्य केले. ही योजना दीड वर्षांहून अधिक काळापासून आखण्यात आली होती.
गुप्तचर अधिकाऱ्यांच्या मते, ‘स्फोटकांनी भरलेले ड्रोन लाकडी शेडच्या छपरात लपवण्यात आले होते आणि ट्रकमधून हवाई तळाजवळ नेण्यात आले.’
एकूण 41 रशियन युद्धविमानांना या हल्ल्यात नुकसान झाले. SBU ने अंदाज केला की या हल्ल्यामुळे $7 अब्ज डॉलरचे नुकसान झाले असून रशियाचे 34% स्ट्रॅटेजिक क्रूझ मिसाईल वाहक विमाने उध्वस्त झाली.
झेलेन्स्की यांनी या “शानदार मोहिमे”बद्दल आनंद व्यक्त केला आणि या हल्ल्यासाठी 117 ड्रोन वापरल्याचेही सांगितले.
“हा हल्ला युक्रेनने पूर्णत: स्वतंत्रपणे केला आहे,” असे त्यांनी लिहिले. “ही आमची आतापर्यंतची सर्वात लांब पल्ल्याची कारवाई आहे.”
युक्रेनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “हल्ल्यापूर्वी याबाबत अमेरिकेला कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.”
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, “रविवारी युक्रेनने पाच भागांतील रशियन लष्करी विमानतळांवर ड्रोन हल्ले केले.”
मुरमन्स्क आणि इरकुत्स्क या भागांमध्ये ड्रोन हल्ल्यांमुळे काही विमाने पेटली. अन्य ठिकाणी हल्ले परतवले गेले. आगी विझवण्यात आल्या असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही लोकांना अटक करण्यात आली आहे.
युक्रेनच्या वायुसेनेच्या म्हणण्यानुसार, रशियाने रात्रभरात 472 ड्रोन युक्रेनवर सोडले, संख्येच्या तुलनेत हा युद्धातील आजवरचा सर्वोच्च हल्ला होता. याशिवाय 7 क्षेपणास्त्रेही डागण्यात आली.
रविवारी सायंकाळपर्यंत, रशियाने नवीन ड्रोन हल्ल्यांचे वृत्त दिले. दोन तासांमध्ये 53 ड्रोन हल्ले परतवण्यात आले, त्यापैकी 34 ड्रोन कुर्क्स सीमाभागात होते.
मे महिन्यात, रशियाने युक्रेनच्या सुमी भागात 450 चौ.किमी जमीन ताब्यात घेतली, जी गेल्या सहा महिन्यांतील सर्वात जलद प्रगती होती.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, रशिया आणि युक्रेनकडे तातडीने शांतता प्रस्थापित करण्याची मागणी केली असून, त्यांनी चेतावनी दिली की, “जर दोघांनी शांतता प्रस्थापित केली नाही, तर अमेरिका युद्धातून माघार घेईल, ज्यामुळे युरोपियन शक्तींवर युक्रेनला मदत करण्याची जबाबदारी येईल.”
ट्रम्प यांचे दूत कीथ केलॉग यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही पक्ष तुर्कस्तानमध्ये आपल्या प्रस्तावित शांततेच्या अटी मांडणारे दस्तऐवज सादर करणार आहेत. मात्र तीन वर्षांच्या युद्धानंतर रशिया आणि युक्रेन यांच्यात फारच मोठे मतभेद आहेत.
रशियाचे मुख्य वार्ताकार व्लादिमीर मेडिन्स्की यांनी TASS वृत्तसंस्थेला सांगितले की, युक्रेनकडून त्यांना एक कराराचा मसुदा मिळाला आहे.
झेलेन्स्की यांनी तक्रार केली होती की, रशियाने अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवलेला नाही.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांच्याशी चर्चांबाबत संवाद साधला आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनवर आक्रमण केले. त्याआधी आठ वर्षे रशियन समर्थक बंडखोर आणि युक्रेनियन सैन्य यांच्यात लढाई सुरू होती. अमेरिकेच्या मते, 2022 पासून आतापर्यंत 12 लाखांहून अधिक लोक मारले गेले किंवा जखमी झाले.
2023 च्या जूनमध्ये, पुतिन यांनी युद्ध तात्काळ थांबवण्यासाठी अटी ठेवल्या: युक्रेनने NATO मध्ये सामील होण्याचा विचार सोडावा आणि चार रशियाद्वारे ताब्यात घेतलेल्या प्रदेशांतून आपले सैन्य माघारी घ्यावे.
युक्रेनच्या प्रस्तावित दस्तऐवजानुसार: शांतता करारानंतर युक्रेनच्या सैन्यशक्तीवर कोणतीही मर्यादा राहणार नाही, रशियाने ताब्यात घेतलेल्या प्रदेशांवर त्यांचा सार्वभौमत्व मान्य केला जाणार नाही, रशियाने युक्रेनला नुकसानभरपाई द्यावी लागेल आणि वर्तमान युद्धरेषेपासून सीमाविषयक चर्चा सुरू केली जाईल.
टीम भारतशक्ती
(Reuters च्या इनपुट्ससह)